Sunday 19 November 2017

फडताड नाळ -भिक नाळ रायगडाच्या घाटवाटांची उतराई चढाई

भिकनाळेतून समोर दिसणारी जननी नाळ..उंच दिसणाऱ्या डोंगरापलीकडे फडताड नाळ

पायलट ट्रेकला ८ जणांची टीम तयार झाली अन सर्व भिडु पट्टीचे त्यामुळे अवघ्या १० मिनिटांत शेवटच्या क्षणी मोहिमेत बदल करून फडताड नाळ अन भिक नाळेचा फडशा पाडायचं ठरलं.आजपर्यंत वाचनात अन ऐकण्यात आल्याप्रमाणे फडताड म्हणजे पडताल अन भिकनाळ म्हणजे भिक मागायला लावत असावी असा अंदाज होता.
नेहमीप्रमाणे प्रसादने आवश्यक तेवढेच टेक्नीकल साहित्य घेतलं.याबाबतीत प्रसादच्या अनुभवाला/अभ्यासाला तोड नाही.प्रत्येक सदस्य अनुभवी असल्याने प्रत्येकाने आवश्यक तेवढेच साहित्य घेतले होते.रात्री ठरल्याप्रमाणे ११.४५ ला पुणे सोडले अन आमच्या दोन गाड्या भट्टीच्या वाटेला लागल्या.पहाटे २ ला सुंदर अश्या भट्टीतील राम मंदिरासमोर गाड्या पार्क केल्या.पथाऱ्या पसरून ओळीत आडवे झालो.
                   भट्टी गावातील सुंदर राम मंदिर 

दिवस १-११-११-२०१७
पहाटे ६ ला उठुन आन्हिकं उरकली.डांगे सरांनी चहाची सोय बघून ठेवल्यामुळे लागलीच चहा घेऊन कुसूरपेठेकडे मोर्चा वळवला.तोरणा-राजगडाचे रूप न्याहाळत तासाभरात कुसूरपेठेत दाखल झालो.लागलीच बच्चे कंपनी अन काही गावकरी जमा झाले.बराच वेळ चर्चा करूनही वाटाड्या काही मिळेना.एकलगावतून वाटाड्या मिळेल ह्या अंदाजाने गाड्या एकलगावच्या वरच्या बाजूला असलेल्या रस्त्यापर्यंत नेल्या.प्रसाद,निळू भाऊ(निलेश वाघ) अन विनायक एकलगावात उतरून वाटाड्या बघेपर्यंत नाष्टयाची तयारी केली.एक चूल मांडून मॅग्गी बनवण्यात आली तोपर्यंत कचरे मामा अन बाकीचे मंडळ आले.पोटोबा आवरून एकलगावच्या अलीकडे असलेल्या रोझ हाईट्स रस्त्याने साधारण १ किमी आतपर्यंत गाड्या आणून एका शेडजवळ पार्क केल्या. वेळ सकाळी:९.४५

        सिंगापूर गावाच्या रस्त्यावरून दिसणारे एकलगाव,लिंगाणा 
    डोंगरयात्रेच्या सुरुवातीला..डावीकडून आण्णा,निराद,प्रसाद,निळु,टॅंगो अन डांगे सर 

भ्रमणमंडळाने १० मिनिटांतच आपापल्या शाका पाठीवर चढवत गाडयांना पाठ दाखवत जननीच्या ठाण्याकडे वाटचाल सुरु केली.सुरुवातीला पायवाट मळलेली असून उजवीकडे एकलगाव,आग्या नाळ,तवीच्या नाळ अन लिंगाणाचे सुरेख दर्शन होत राहते.समोर दुर्गदुर्गेश्वर रायगडाचे दर्शन सुखावून जाते.अर्ध्या तासात मळलेली वाट पुसटशी होऊन जंगलात शिरते.लांबलेल्या पावसामुळे कारवी अन झाडी रस्ता आडवू पाहत होती पण टॅंगो अन प्रसाद कोयत्याने छान रस्ता बनवत होते त्यामुळे मागचे मंडळ निवांत मार्गक्रमण करत जननीच्या ठाण्याजवळ पोहोचलो.वेळ:११.१५
इथून उत्तर/वायव्येला  फणशीच्या नाळेने उतरून आग्या नाळेने एकलगाव गाठता येते किंवा तवीच्या नाळेने सिंगापूर गाठता येईल.जननीच्या ठाण्यापासून दक्षिणेला जननीची नाळेच्या तोंडाला जाऊन आलो.जननीच्या नाळेने उतरून भीक नाळेने देशावर चढता येते.वरील सर्व वाटांसाठी अनुभव/कौशल्य अन वाटाड्या हवा हे विसरता कामा नये नाहीतर इथल्या जंगलात नीरव शांततेशिवाय तुम्हाला कोणीही भेटणार नाही याची शाश्वती नक्कीच मी देतो.
                                आग्या नाळ 
     रायगड,तवीची नाळ,लिंगाणा अन रायलिंग पठार 
                         जननीचे देवस्थान 

जननीची पूजा करून भयानक वाढलेल्या कारवीतून वाट काढत मध्यान्हाला दुर्गाच्या माळावर पोहोचलो.आजचा मुक्काम फडताड उतरून पाणवठा बघून करायचा असल्याने भ्रमणमंडळाने निवांत भोजन करण्यासाठी पाठीवरच्या शाका माळावर असलेल्या एकमेव झाडाखाली उतरवल्या.इथून फडताड नाळेच्या वाटेवर काही अंतरावरच छोटा झऱ्यावर पाण्याची सोय झाली.पाणी भरून परत झाडाखाली आलो.उत्तर/वायव्येला लिंगाणा,कोकणदिवा अन रायलिंग पठार तर पश्चिमेला रायगड असा कॅनव्हास बघत शिदोऱ्या उघडल्या.फडताड उतरायची असूनही त्याची तमा न बाळगता भरगच्च जेवण झालं.वेळ:दुपारी १.३०
               दाट कारवीतून वाट काढताना मंडळ 
               दुर्गाचा माळ ..समोर लिंगाणा 

पाणी भरून परत कारवीतून वाट काढत फडताड नाळेच्या मुखाशी आलो अन कचरे मामानी इथून पुढची वाट माहित नाही म्हणून बॉम्ब टाकला.प्रसाद अन डांगे सर १० मिनिटे खाली जाऊन वाटेचा अंदाज घेऊन परत आले.काही वेळ चर्चा करून परत दुर्गाच्या माळावर परत आलो.वाटाड्या मामांना पुढची वाटच माहीत नसल्याने आज फडताड उतरून खाली मुक्काम करायच्या प्लॅन रद्द करण्यात आला.कचरे मामांना काही मानधन देऊन पुढच्या वेळी असं कोणत्याही व्यक्तीबरोबर करू नका अशी विनंती केली.आता पुढचा मार्ग आम्हालाच शोधायचा असल्याने कचरे मामांना निरोप दिला अन मामांनी एकलगावचा रस्ता धरला.वेळ दुपारी:४
काही वेळ चर्चा करून उद्या लवकर फडताड उतरून भीक नाळ चढण्याचा ठराव मंजुर झाला.माळावर गवत अन झाडी माजली होती.तासाभरात कॅम्पसाईट तयार केली.रात्री शेकोटीसाठी लाकूडफाटा जमा करताना टॅंगोने ग्रीन पेट वायपर साप हेरला.सापाने पण वेग-वेगळ्या पोझ दिल्यामुळे त्याचे बरेचशे फोटो काढण्यात वेळ गेला.टॅंगो खुश.
                आजची आमची कॅम्पसाईट 
          टॅंगोने हेरलेला ग्रीन पेट वायपर साप

आता सांजवेळ दाटून आली अन आम्ही पथाऱ्या पसरुन छोटोशी शेकोटी पेटवली.बऱ्याच दिवसांनी डोंगरयात्रेमधे असा निवांत वेळ मिळाला होता.पूर्ण पठारावर फक्त आम्ही ८ डोंगरयात्री अन समोर दुर्गदुर्गेश्वर रायगड,लिंगाणा असा त्रिवेणी संगम.डोंगरकड्यावरून जाऊन मस्त सूर्यास्त अनुभवला.रायगडावरील जगदीश्वर मंदिरावरचा दिवा लुकलुकयाला लागला होता त्याची ऊर्जा घेऊन आम्ही परतलो.रम्य सांजवेळी गुलाबी थंडीत शेकोटीजवळ मस्त गप्पांचा फड रंगला.दूरवर रायलिंग पठारावर विजेऱ्यांच्या झगमगाट दिसला बहुतेक कोणता तरी ग्रुप उद्या लिंगाणा चढाईसाठी आला असावा.आमच्या ग्रुपने केलेल्या लिगांणा चढाईच्या आठवणी घोळवत जेवणं उरकली.सकाळी ६ चा वेकअप कॉल ठरवून निद्रिस्त झालो. वेळ रात्री:९
              सांजवेळी लिंगाणा,तवीची नाळ दृश्य 
        गुलाबी थंडीत शेकोटीजवळ मस्त गप्पांचा फड 
         गुलाबी थंडीत शेकोटीजवळ मस्त गप्पांचा फड 
              स्लीपींग बॅगमध्ये ..शुभरात्री 

दिवस २-१२-११-२०१७
सकाळी ६ ला उठून पाहतो तर प्रत्येकाची डब्यासाठी पळापळ चालली होती.बहुतेक कालच्या भरगच्च जेवणामुळे अन आरामामुळे पोट जड झाली असावीत असो.कॅम्पसाईट नीट साफ करून पाण्याच्या ठिकाणी जाऊन पाणी भरून घेतले(२ लिटर प्रत्येकी).अशा डोंगरयात्रेत प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार पाणी घेणं आवश्यक.फडताडच्या मुखाशी असलेल्या घसारायुक्त वाटेने काळजीपूर्वक फडताडच्या खिंडीत पोहोचलो.डावीकडे जात काही झाडांच्या आधार घेत ५ मिनिटांच्या उतराई नंतर एका मोठया झाडाजवळ पोहोचलो.प्रसादने दोन झाडांचा बेस बनवत रोप फिक्स केली.टॅंगोला बिले देत पहिला ३० फुटाचा कातळटप्पा टॅंगोने काही मिनिटांतच उतरला.उतरतानाच रस्ता साफ केल्याने दगड गोटे पडण्याची भीती नव्हती.पुढचे सदस्यही हार्नेस घालून तयार होतेच साधारण तासाभरात प्रसाद व्यतिरिक्त सर्वजण हा सोपा कातळटप्पा उतरून खाली पोहोचलो.प्रसादने शेवटी उतरत रोप अडकणार नाही याची काळजी घेत रोप ओढून घेतला.वेळ सकाळी:९
         फडताडच्या मुखाशी असलेला घसारायुक्त टप्पा 
            पहिला सोपा कातळटप्पा साफ करताना टॅंगो 

कातळटप्पा उतरताना.. विडिओ पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 

पुढील वाट नाळेतून असुन आरामके साथ टुणूक टुणूक करत नाळेतून डावी-उजवी घेत तासाभरात एका सुकलेल्या धबधब्यापाशी पोहोचलो. इथून उजवीकडची वाट पंदेरीत उतरते हे आम्हाला ठाऊक होत.याच उंचीवरून पूर्वेकडून जात भिकनाळ गाठायचा प्रसादचा प्लॅन होता.तासभर रस्ता करूनही मनासारखी वाट सापडेना तेव्हा निळू,टॅंगो,प्रसाद अन मी,डांगे सर असे दोन मंडळ वेगळ्या मार्गाने जात वाट बनवायाचा प्रयत्न केला.काही वेळाने दोन्ही मंडळ रस्ता करत एका ठिकाणीच पोहोचलो.वेळ दुपारी:११.३०
                 फडताड नाळेतून उतराई 

इथून परत फिरावे अन पंदेरीत उतरावे किंवा परत फडताड चढून एकलगाव गाठावे अशी पाल माझ्या मनात चुकचूकली.प्रसादच्या मनात भिकनाळच असल्याने टॅंगो,निळू,प्रसाद अन डांगे सर पुढे रस्ता बनवत एकदाचे पठार गाठले.२० मिनिटे परत मागे येऊन शाका उचलल्या.बाकीच्या सदस्यांना घेऊन सपाटीवर पोहोचलो.निबिड रान अशा जंगलात प्राणांच्या विष्टेशिवाय काही दिसत नव्हतं. सपाटीवरून चालणं सुसह्य होत पण वाढलेल्या झाडीमधून रस्ता बनवण्यासाठी कसरत करावी लागत होती.टॅंगो अन प्रसादने मस्त वाट मोकळी करत मागच्या मंडळींची सोय करून दिली होती.भले मोठी झाडे पाहून आश्चर्य वाटत होते.असे जंगल सह्याद्रीत फार कमी ठिकाणी पाहायला मिळत.वेळ दुपारी :१२.३०
    फडताड नाळ-भिक नाळ मधील निबिड जंगलटप्पा 
                     भले मोठी झाडे
साधारण अर्ध्या तासात काल पाहिलेल्या जननीच्या नाळेच्या बरोबर खाली पोहोचलो.घनदाट जंगलामुळे भिकनाळ अजून किती लांब आहे याचा अंदाज येत नव्हता.प्रसाद अन डांगे सर जननीच्या नाळेच्या वाटेपर्यंत जाऊन उंचावरून रस्त्याचा अंदाज घेतला.साधारण अजून तासाभरात भिकनाळे पर्यंत पोहोचता येईल असा अंदाज होता.अर्धा तास जंगलातून वाटचालीनंतर उजवीकडे भिकनाळेने दर्शन दिले.२ तास त्या जंगलात वाट बनवल्यानंतर भिकनाळेच्या दर्शनाने सर्व मंडळाचा उत्साह वाढला.वाट उजवीकडे वळत एका नाळेत उतरलो.डावीकडून येणाऱ्या नाळेतून पाण्याचा झरा गवसला.पाणी पिऊन तृप्त झालो. इथेच बसून उरलेला शिधा संपवायचा ठराव झाला.पोटोबा उरकून पाण्याचा साठा परत भरून घेतला.वेळ दुपारी:२.४५

              भिकनाळ प्रथम दर्शन 
           पोटोबासाठी क्षणभर विश्रांती 
पुढच्या अर्ध्या तासात दक्षिणेकडे जात तुफान साफ सफाई करत भिकनाळेला भिडलो.मागच्या २-४ तासापासून पायाला लागलेले ब्रेक निघाले.भिकनाळेचा तीव्र चढाईही त्या घनदाट जंगलापुढे फिकी होती.तालात चढाई करून २० मिनिटांत कातळटप्प्याजवळ पोहोचलो.मंडळातल्या सर्वात हलक्या निळुला मंडळातल्या सर्वात भक्कम अशा अण्णांच्या खांद्यावर चढवून वर पोहोचवले.मागून डांगे सर अन प्रसादने वर पोहोचून रोप फिक्स केली.शाका रोपने ओढून वर घेण्यात आल्या.हार्नेस परीधान करून सर्व जण काही मिनिटांतच वर पोहोचलो.वेळ:संध्याकाळी ४.४५
                 भिकनाळ सोपा कातळटप्पा 

भिकनाळ आता हरिचंद्रगडाच्या नळीच्या वाटेशी साधर्म्य असल्यासारखी वाटते फरक फक्त भिकनाळ ऐसपैस असून दगड स्थिर आहेत.मंडळाने ताल धरत २० मिनिटांत भिकनाळेची सर्वोच्च खिंड गाठली.मागे खोलवर दुपारी ट्रॅव्हर्स केलेला जंगलटप्पा बघून वेगळेच समाधान वाटत होते.दूरवर दुर्गाचा माळ अन त्याच्यामागे लिंगाणा आपला माथा उंचावून दर्शन देत होता.फडताड नाळ मात्र इथून दिसत नाही. वेळ:संध्याकाळी ५.०५
                         भिकनाळ चढाई 
       भिकनाळ चढाई..समोर जननीची नाळ 

भिकनाळेच्या खिंडीतून डावीकडे जाणारी वाट पकडली इथून एकलगावपर्यंत मळलेली वाट आहे खरं पण ७-८ फूट वाढलेल्या कारवीतून वाट काढणे तेवढे सोपे नव्हते.वरून एखाद लांबड असलं तर ती भीती वेगळीच.सह्यमाथ्यावरुन उत्तरेकडे जात सर्वोच्च माथ्यावर पोहोचलो.भिकनाळ मागे पडली होती.दूरवर कुसूरपेठ दिसायला लागलं होत.पश्चिमेला कलत्या सूर्याची किरणे रायगड अन लिंगाणा उजळवून टाकत होती.फडताड अन दुर्गाचा माळ बुटके वाटतात. 
कारवीतून कसाबसा रस्ता बनवत अजून एका पठारावर पोहोचलो.तोरणा किल्ल्याचे वेगळ्याच बाजूने दर्शन झाले.इथून पुढची वाट ऐसपैस असून तासाभरात काल गेलेल्या फडताडच्या वाटेला गाठलं.अंधारून येता-येता गाड्या पार्क केलेल्या पठारावर पोहोचलो.वेळ:संध्याकाळी ६.४०
    भिकनाळ माथ्यावरून..रायगड,फडताड,लिंगाणा,दुर्गाचा माळ अन जननी नाळ 
     भिकनाळ माथ्यावरून कुसूरपेठेकडे वाटचाल 
  
             घोणस दर्शन 
मोठ्या गाडी रस्त्याने लगबगीत चालता चालता पाऊल पडणार एवढ्यात वेटोळे घातलेलं जाडसर पांढर काहीतरी दिसलं दचकून तसेच उडी मारून पलीकडे गेलो तर पुढे अजून एक काळा साप.उड्या मारतच पुढे गेलो.मागच्यांना सावध केलं.साप म्हणल्यावर त्यांचं कुतूहल वाढलं अन त्यांनी फोटोही काढले.मी मात्र अचानक आलेल्या या संकटातून वाचलो म्हणत गाडीजवळ अजून काही नाहीना हेच शोधत होतो.आवरा-आवार करून परतीचा प्रवास सुरु केला.वेळ:संध्याकाळी ७.१५
रात्री १० ला खेड शिवापूर जवळ पोटोबा उरकला.१०.३० ला पुण्यनगरीत प्रवेश केला. 

नोट:फडताडला न पडता अन भिकनाळेला भिक न मागता सहजतेने ही डोंगरयात्रा पूर्ण करण्यात प्रसाद अन टॅंगोने मोलाचे योगदान दिले.
प्रसादच्या सह्याद्रीच्या सखोल अभ्यासाची चुणुक परत एकदा अनुभवायला मिळाली.
वाटाड्याविना हा ट्रेक करता येत नाही असेच आजपर्यंतच्या वाचनात आलेलं होत पण केवळ उच्च अनुभव अन अचाट साहस यांची सांगड घालत हा ट्रेक सहजरित्या पूर्ण.
या घाटवाटाना मळलेली पायवाट अशी नाहीच त्यामुळे या घाटवाटा करताना टेक्निकल तसेच सह्याद्रीचा सखोल अभ्यास गरजेचा.


महत्वाच्या नोंदी :

सुरवात :रोझ हाइट्स एकलगाव शेवट :रोझ हाइट्स एकलगाव
मार्ग: रोझ हाइट्स एकलगाव-जननीचे ठाणे-दुर्गाचा माळ-फडताड नाळ-भिक नाळ-रोझ हाइट्स एकलगाव
एकूण चढाई उतराई:८४४ मीटर्स 
श्रेणी:मध्यम

चढाई उतराईतील टप्पे:
रोझ हाइट्स एकलगाव(८३१ मीटर्स)-फडताड नाळ माथा(७४५ मीटर्स)-भिकनाळ जंगलटप्पा (५२५ मीटर्स)-भिकनाळ सुरुवात(५६० मीटर्स)-भिकनाळ माथा(८५० मीटर्स)-सर्वोच्च माथा(९३५ मीटर्स)-रोझ हाइट्स एकलगाव(८३१ मीटर्स)

प्रसन्न वाघ 
वाईल्ड ट्रेक ऍडव्हेंचर 













Monday 25 September 2017

कोकणदिवा-कावळ्या-बोचेघोळ..रायगडाच्या घाटवाटांची उतराई चढाई

    खानूचा डिगा...गायनाळ अन निसणीच्या वाटेने इथून पाने गावात उतरता येते                                         
दिवस १:१७ फेब्रुवारी २०१७
महाराष्ट्रातील रायगड किल्ल्या जवळच्या घाटवाटांचं आम्हाला नेहमीच वेगळं आकर्षण वाटत.रायगडाच्या घाटवाटांचं वैशिष्टय म्हणजे या घाटवाटांची दुर्गमता,पाणी शोषुन घेणारी आर्द्र्ता,पाण्याची कमतरता अन सरळसोट कडे.आता तर या घाटवाटांवरचे जंगलटप्पे ही नामशेष होत आल्यामुळे या घाटवाटा आव्हानात्मक अन शरीराचा कस बघणाऱ्या ठरतात.  
          
यावेळी कोकणदिवा-कावळ्या-बोचेघोळ-निसनी-गायनाळ असा आव्हानात्मक बेत ठरला.ठरल्याप्रमाणे रात्री १० ला पायलट मंडळींना पिकअप करून बसने घोल गावाकडे उड्डाण केले.पानशेत धरणाला वळसे घालत एकदाच घोल खिंड पार करून घोल गावाच्या अलीकडे डाव्या बाजूला गारजाईवाडीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याला लागलो.धडाम-धडाम करत गारजाईवाडीत पोहोचलो.शाका काढुन हनुमानाच्या मंदिरासमोर असलेल्या छानश्या शेडमध्ये पथाऱ्या पसरल्या.रात्रीचे साधारण २ वाजले होते तरीही आजोबा अन आजीबाईंनी आपुलकीने चौकशी करत पाण्याचा हंडा दिला.सकाळी ५.३० ला वेकअप ठरवुन शांतपणे डोळे मिटले.
            डोंगरयात्रेच्या सुरुवातीला भ्रमणमंडळ 

दिवस २:१८ फेब्रुवारी २०१७:
डांगे सरांनी पहाटेच उठुन गावकऱ्यांशी वार्तालाभ करून वाटाड्याची अन चहाची सोय केली.आन्हिकं उरकुन शाका आवरल्या.आजचा टप्पा मोठा असल्याने खाण्याचं बरचस सामान घेऊन कोकणदिव्याकडे वाटचाल सुरु केली अन टुमदार छोटंसं गारजाईवाडी मागे पडलं. वेळ सकाळी:७
                कोकणदिवा किल्ल्याकडे वाटचाल 
एक वॉर्म उप चढ चढला की उत्तरेकडे तेल्याची खिंड,घोल खिंड अन सुंदर जंगलटप्पे दिसतात.वाटेत पाण्याचं टाक अन एक देवस्थान लागत नमस्कार करून मोकळ्या पठारावर पोहोचलो.डावीकडे कोकणदिवा माथा ५०-७० मीटर्स उंचावलेला दिसतो.तीव्र चढाई करत १५ मिनिटांत कोकणदिव्याच्या पोटात असलेल्या लहानश्या गुहेत पोहोचलो.गुहा ५-७ जणांसाठी मुक्कामास योग्य आहे.गुहेच्या उजव्या बाजुने सोपा कातळटप्पा चढून माथा गाठला.ह्या टप्प्यावर पावसाळ्यात काळजी घेणं आवश्यक.वेळ सकाळी:७.५०
           कोकणदिवा चढाईआधी लागणारे पठार
कोकणदिवा हा किल्याची निर्मिती रायगडाच्या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी केली गेली अन त्यासाठी कारण म्हणजे माथ्यावरून चौफेर दिसणारे दृश्य.दक्षिणेकडे भव्य रायगड,पश्चिमेला पुनाड(कणा),तवली डोंगर,उत्तरेला कावळ्या घाट,पूर्वेला लिंगाणा अन बऱ्याच घाटवाटांवर इथून लक्ष ठेवता येत असावं.खाली कोकणातील सांदोशी अन छत्री निजामपूर गाव सुंदर दिसतात.आल्या वाटेने घसरगुंडी करत १० मिनिटांत मोकळ्या पठारावर पोहोचलो.वेळ सकाळी:८.३०
                 कोकणदिवा तीव्र चढाई टप्पा 
       कोकणदिवा किल्ल्याच्या पोटात असलेली गुहा 
    कोकणदिवा किल्ल्याचा शेवटचा कातळटप्पा ..इथे काळजी घेणं आवश्यक
         कोकणदिवा किल्ला उतराई 
पठारावरून साधारण उत्तरेला एक वाट जंगलात शिरते त्या वाटेने ५ मिनिटे खाली उतरत कावळ्या घाटाच्या खिंडीत पोहोचलो. ऐसपैस बांधलेल्या कावळ्या घाटाने दरमजल करत बरोबर कोकणदिव्याच्या दक्षिण पायथ्याला पोहोचलो.वाटाड्या मामांना टाटा करून सांदोशीची वाट धरली.काही घर शेताडी पार करत सांदोशीत असलेल्या शाळेत पोहोचलो.छान स्वच्छ आवार अन पाण्याची सोय बघुन इथेच पोटोबा करायचा ठरलं.शिदोऱ्या सोडुन उदरभरण कार्यक्रम उरकला.पाणी भरून वारंगी गावाकडे निघालो. वेळ सकाळी:१०.३०
                 कावळ्या घाटाची सुरुवात 
               सांदोशी गावातून कोकणदिवा 
               सांदोशी गावातील सुंदर शाळा 
सकाळची वेळ असूनही कोकणातल्या उन्हाने अन उकाड्याने आमची परीक्षा बघायला सुरुवात केली होती.मागे कोकणदिवा अन उजवीकडे दुर्गदुर्गेश्वर रायगड दर्शन सुखदायक होत.सांदोशी गावाबाहेर बऱ्याच वीरगळी नजरेस पडतात.फुफाटा भरलेल्या रस्त्याने चालत बावले गाव पार केलं.सूर्य आता चांगलाच तळपत होता.उन्हाचा चटका लागायच्या आधी धापा टाकत वारंगी गाठलं.थंडगार लोकल ब्रँडचे शीतपेय पोटात ढकललं अन दुकानाच्या आवारातच थोडा आराम केला.साधारण पाऊण एक तास शरीर थंड केली.वारंगीतून बोचेघोळने खानू गाठायला वाटाड्या काही मिळेना.शेवटी एका बाबांनी रस्त्याला लावतो म्हणल्यावर तडक वारंगी सोडलं.वेळ दुपारी:१२.३०
    सांदोशी-वारंगी मार्गावरून दूरवर गेलेला कोकणदिवा 
बोचेघोळ घाटातल्या पहिला टप्प्यात म्हणजे हेदमाचीपर्यंत झाडोरा दिसत होता.कोरडी काळ नदी पार करून हेदमाचीच्या दिशेने निघालो.पहिल्या १५ मिनिटांत सपाटीच्या रस्त्यावरच तळपत्या उन्हाने भाजुन निघालो.एक डेरेदार झाड बघून विसावलो नव्हे काही मंडळी झोपली सुद्धा.मंडळातील सारीका या पायलटची तब्बेत थोडीशी ठीक नसल्यामुळे १५ मिनिटे चर्चा करून दुपारी २ च्या लाल डब्ब्याने तिने महाड अन तिथून पुणेला जायचा निर्णय घेतला.वाटाडे बाबांबरोबर तिने परत वारंगीचा रस्ता धरला अन बाकीचे मंडळ हेदमाचीकडे निघालो.
वाट आता चढाईला लागली.तीव्र चढ अन रखरखत उन्हाने चांगलीच परीक्षा घेतली.जवळचे पाणी कोमट होऊन पिण्यापेक्षा अंग ओल करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ लागला.हेदमाचीपर्यंत झाडोरा असूनही वाऱ्याची झुळूकही अंगावर येईनाशी झाली.चांगली दमदार चढाई करत पाण्याच्या छोट्याशा कुंडाजवळ पोहोचलो.इथून उजवीकडे वाट हेदमाचीत जाते तर डावीकडची वाट खानूला.पाण्याचा साठा भरून घेतला अन डावीकडची वाट धरली.वेळ दुपारी:२
    रखरखत्या उन्हात वारंगीतुन बोचेघोळकडे प्रस्थान 
वाट आता पदरातून असल्यामुळे चढ-उतार नाही.साधारण १० मिनिटांनी वाट उजवीकडे वळते अन चढाई टप्पा सुरु होतो.छान जंगलातून वाट असल्यामुळे थकवा जाणवत नाही.अर्ध्या तासात हा टप्पा पार करून परत उघड्या-बोडक्या वाटेवर आलो.टळटळीत ऊन,आडोश्याला एकही झाड शोधून सापडेना अन वार हे पडलेलंच त्यामुळे लय काही सापडेना.मागे रायगडचा माथा अन रायगडावरील वास्तू पाहून रायगडाची उंची गाठल्याची जाणीव झाली.१५ मिनिटांत वाऱ्याची झुळूक अंगावर आली अन सह्याद्री माथा जवळ आल्याची चाहूल लागली.एक उजवी घेत माथ्यावर पोहोचलो अन झाडाखाली विसावलो.इथून दोन वाट फुटतात डावीकडची वाट खानूसाठी शॉर्टकट असून सरळ जाणारी वाट समोरच्या डोंगररांगेवरून खानूला जाते(निसणी घाटासाठी).थोडासा पोटोबा करून सरळ जाणारी वाट धरली.वेळ दुपारी:४
    पाण्याची कमतरता,आग ओकणारा सूर्य अन खडतर प्रवास 
    सह्याद्री माथ्यावरून बोचेघोळ अन दुर्गदुर्गेश्वर रायगड 
समोरच्या डोंगरधारेवर पोहोचून पलीकडे लिंगाणा अन निसणीच्या घाटमाथ्याचे सुंदर दृश्य दिसते.डावीकडे जात खानूच्या अलीकडे काही घर लागतात तिथे विसावलो.थंडगार पाणी पिऊन गायनाळेसाठी वाटाड्याची चौकशी केली असता,वाट अशी नाहीच गेल्या ३०-३५ वर्षात कोणी गेलं नाही अशी माहिती मिळाली.प्रसाद,डांगे सर खानू गावात वाटाड्या मिळतोय का बघण्यासाठी गेले अन अर्ध्या तासात परत आले.एक कणखर व्यक्तिमत्व त्यांच्यासोबत होत.चर्चेअंती २०१७ च्या हिवाळ्यात गायनाळ करायची ठरलं.आता टेकपवळेकडे निघालो.सूर्यनारायण दिवसभराचे कामकाज संपवून अस्ताला निघाले होते.अंधारात चढाई-उतराई करून टेकपोवळे(टेकपोळे) गाठण्यापेक्षा खानूचा डिगा कडून फिरून जाणारी पण सोपी वाट धरली.वेळ संध्याकाळी:६.१५
           रायलिंग अन लिंगाण्याचे सुंदर दृश्य
           डोंगराच्या कोंदणात वसलेलं खानू गाव 
खानूच्या डिग्यापासून कच्चा गाडीरस्ता पकडला.तासाभराने गाडीरस्ता सोडून डावीकडे जंगलात वर चढणारी पायवाट धरली. काही घर पार करत माथ्यावर पोहोचलो.टेकपवळे गावातील लाईट्स दूरवर दिसायला लागल्या होत्या.५-१० मिनिटांची उतराई करत काही घरांजवळ पोहोचलो.पुढची वाट विचारून एक छोटा डोंगर उतरत डांबरी रस्ता गाठला.एक कोरडा ओढा पार करून पलीकडे टेकपोळे-पानशेत रस्त्याला लागत टेकपोळे गाठायला रात्रीचे ९ वाजले.
गावात काही जेवणाची सोय झाली नाही.उरला सुरल्या शिदोऱ्या संपवत टेकपोळेतील शाळेत पथाऱ्या पसरल्या.बोचेघोळ घाटाला असं नाव का पडलं असावं याचा अंदाज दिवभरच्या कडक उन्हाने नक्कीच करून दिला.दुसऱ्या दिवशीचा प्लॅन ऑक्टोबर/नोव्हेंबर २०१७ पर्यंत लांबणीवर टाकून सकाळीच आवरून टेकपोळे सोडले.पानशेतला हॉटेल संस्कार मध्ये हादडून पुण्यात सकाळी ११ ला पोहोचलो.

महत्वाच्या नोंदी :
सुरवात :गारजाईवाडी शेवट :टेकपोळे 
मार्ग : गारजाईवाडी-कोकणदिवा-कावळ्या घाट-सांदोशी-बावले-वारंगी-हेदमाची-खानूचा डिगा-टेकपोळे  
एकूण चढाई उतराई:१३६०मीटर्स 
श्रेणी :मध्यम

चढाई उतराईतील टप्पे:
गारजाईवाडी(६७०मीटर्स)-कोकणदिवा(७८० मीटर्स)-वारंगी-११० मीटर्स-टेकपोळे(६६० मीटर्स)

प्रसन्न वाघ 
वाईल्ड ट्रेक ऍडव्हेंचर 


Saturday 23 September 2017

भैरवगड-घनचक्कर-गवळदेव चढाई उतराई

         गवळदेव शिखरावर भ्रमणमंडळ

दिवस १:१५ सप्टेंबर २०१७
सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर रांगेचा सन्मान घनचक्कर-गवळदेव  या रांगेला जातो.ही रांग भैरवगड पासुन सुरु होऊन घनचक्कर-गवळदेव -मुडा-कात्राबाई-करंडा-आजोबा जवळ संपते.गवळदेव(१५२५ मीटर्स)-घनचक्कर (१५१० मीटर्स) हे महाराष्ट्रातील अनुक्रमे तिसऱ्या,चौथ्या उंचीचे शिखरे गाठण्याचा बेत अचानकच ठरला.पायलट ग्रुपवर मेसेज टाकता ९ जणांची टीम झटक्यात तयार झाली.आमचे प्रिय धडाडीचे गिर्यारोहक डांगे सर सोलापूरहून तातडीने या मोहिमेत सामील झाले.रात्री ११.४५ ला शिवाजीनगरहुन भ्रमणमंडळाने पुण्यनगरीतून शिरपुंजेकडे (ता.अकोले जि.अहमदनगर) प्रवास सुरु केला.
नारायणगावला मसाला दुध ब्रेक घेऊन ओतूर-कोतूळ-माणिक ओझरमार्गे शिरपुंजे गाठायला पहाटेचे ४.३० वाजले.छानश्या मंदिराच्या प्रांगणात पथाऱ्या पसरून स्लिपींग बॅगमध्ये शिरलो.
                      शिरपुंजे गावातून दिसणारा भैरवगड
             शिरपुंजे गावातून घनचक्कर शिखर

दिवस २:१६ सप्टेंबर २०१७
सकाळी ६.३० ला जाग आली तर बाकीची मंडळाने आधीच आवरा-आवार सुरु केली होती.डांगे सर नेहमीप्रमाणेच पहाटेच थंड पाण्याने आंघोळ करून रेडी.आन्हिकं उरकली.मॅग्गीचा हलका नाश्ता करत बॅगा आवरल्या.धिंदळे मामा यांना वाटाड्या म्हणुन घेतले अन आमच्या भ्रमणमंडळाने नुकत्याच सुरु केलेल्या प्रथेप्रमाणे गावात लहान मुलांना खाऊ वाटप केला.काही मुलांना वही-पुस्तक भेट देऊन शिरपुंजे गावातून भैरवगडाकडे कूच केलं.वेळ सकाळी:८.२०
                            छोट्या मित्रांसोबत छान क्षण
शिरपुंजे गावातून  दक्षिणेला भैरवगडाची कातळभिंत अन माथ्यावर कातळात कोरलेली गुहा लक्ष वेधून घेते.गावातून ५मिनिटांच्या गाडीरस्त्याने चालल्यावर वाट डोंगराला भिडते.भैरवगड हे प्रसिद्ध देवस्थान असल्यामुळे वाट चांगली ऐसपैस आहे.साधारण अर्ध्या तासात बऱ्यापैकी उंचीवर आल्यावर कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात.मागे शिरपुंजे गाव,सिंदोळा(शिरपुंजे)डोंगर छान दिसतात.वाट आता भैरवगड अन पतवडी डोंगरमधील खिंडीकडे वळते. बारीकशी वाट रेलिंग लावून सुरक्षित केलेली आहे.संपूर्ण डोंगर सोनकीच्या फुलांनी बहरला असल्यामुळे फोटो काढण्याचा मोह आवरणे जरा कठीणच. शिरपुंजेतून साधारण तासाभरात खिंडीत पोहोचलो.खिंडीतून दक्षिणेला उतरणारी वाट आंबित गावात उतरते.वेळ सकाळी:९.२५
                        भैरवगडाकडे जाणारी सुंदर वाट
    भैरवगड खिंड..पलीकडे जाणारी वाट आंबित गावात उतरते
खिंडीतुन पूर्वेला सुंदर रेखीव अशा कातळात कोरलेल्या पायऱ्या या गडाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.माथ्यावर पोहोचताना तटबंदीचे थोडे अवशेष दिसतात.माथ्यावर पोहोचताच बऱ्याच पाण्याच्या टाक्या नजरेस पडतात. या गडावर साधारण १७ पाण्याच्या टाक्या असून काही टाक्या ह्या गुहेत कोरलेल्या आहेत.या गुहा अन त्यांचे खांबाची रचना बघण्यासारखी असून त्यातील पाणी हे वर्षभर टिकते.भैरवगडावरील मुख्य आकर्षण म्हणजे भैरोबाची अश्वारूढ मूर्ती अन गुहा. या गुहेच्या थोड खालच्या बाजूला शिरपुंजेतुन दिसणारी गुहा असून तिचा टेहळणीसाठी उपयोग होत असावा.
             भैरवगड माथ्यावरून दिसणारे शिरपुंजे गाव
                           भैरोबाची अश्वारूढ मूर्ती
                     सुंदर असं पाण्याचं टाक
भैरवगडाच्या सर्वोच्च्य माथ्यावर जाताना ४-५ फुटाची सुंदर वीरगळ नजरेस पडते. धुक्यामुळे सभोवतालचा परिसर दिसू शकला नाही.पश्चिमेला घनचक्कर माथा ढगांमधून अधूनमधून दर्शन देत होता.ग्रुप फोटो अन थोडासा पोटोबा उरकून आल्या वाटेने उतराई सुरु केली.वेळ सकाळी:१०.३०
                             सुंदर वीरगळ ..भैरवगड
      भैरोबा मंदिराकडून भैरवगड माथ्याकडे जाणारी वाट
खिंडीतून शिरपुंजेकडे उतरताना ५ मिनिटांत एक बारीकशी वाट पतवडी डोंगराच्या पोटातून आडवी पश्चिमेला जाते.फारशी वापरात नसल्याने वाट साफ करत पुढे निघालो.वाटेत १-२ छोट्या गुहा लागतात.भैरवगड नजरेआड झाल्यावर काही वेळातच २ भव्य गुहा लागतात.काही कुटुंब या गुहेत फार पूर्वीपासून राहत असून दूध दुभत्याचा व्यवसाय करतात.या गुहा पार केल्यावर मळलेल्या गायी-गुरांच्या वाटेने जात पतवडी डोंगर-घनचक्कर रांगेवर पोहोचलो.वेळ सकाळी:११.४५
                     भैरवगड खिंडीतील पायऱ्या
    भैरवगडाकडून घनचक्करकडे..मागे भैरवगड
      घनचक्कर  वाटेवर लागणारी भव्य गुहा
पश्चिमेला जाणारी वाट धरली अन सौम्य चढाई टप्पा पार करत डोंगर धारेवर पोहोचलो.उत्तरेला आर्थर जलाशय-पाबरगड नजरेस पडले.पश्चिमेला घनचक्कर चा माथा ठेंगणा वाटतो.भव्य सपाट माथ्यावर फुलांच्या राशीतून चालत घनचक्करच्या शेवटच्या टेकडीखाली पोहोचलो.कमरेएवढ्या झाडीतुन ५ मिनिटांची तीव्र चढाई करत महाराष्ट्राच्या या चौथ्या उंच शिखरावर पाऊल ठेवले. सभोवतालचा नजारा केवळ अप्रतिम.पश्चिमेला गवळदेव-कात्रा-अग्निबाण-रतनगड अन रतनगड खुट्टा यांनी अधूनमधून दर्शन देत सर्वांची वाहवा मिळवली.उत्तरेला अ-म-कु अन कळसू माथ्याचे धुरकट दर्शन झाले.मध्यानाची वेळ साधत घरून आणलेल्या शिदोऱ्या सोडल्या.पोटोबा उरकून ५-१० मिनिटांची विश्रांती घेतली.माथ्यावरून सभोवताली पाहतो तर दाट धुक्यांनी सर्व शिखरांना कवेत घ्यायला सुरुवात केली होती.अजून बराच टप्पा गाठायचा असल्याने काढता पाय घेतला.वेळ दुपारी:१.२५
          घनचक्कर माथ्याकडे वाटचाल
            घनचक्कर माथ्याकडे वाटचाल
   घनचक्कर माथ्याजवळून मागे पाहता भैरवगड
    घनचक्कर माथ्यावरून आर्थर जलाशय..उजवीकडे धुक्यात पाबरगड
घनचक्कर माथ्यावरून गवळदेव माथा समांतर उंचीवर दिसत होता त्यामुळे जास्त वेळ नाही लागणार असा आमचा अंदाज पुढच्या ५ मिनिटांतच वाट तीव्र उताराला लागल्यावर फोल ठरला.साधारण दक्षिण-पश्चिमेकडे वाट उतरत १० मिनिटांत खालच्या पठारावर पोहोचलो.झुळझुळ वाहणाऱ्या ओढ्यांमुळे पाण्याची कमतरता नव्हती.दाट धुक्यामुळे कुठे उतरतोय याचा अंदाज लागत नव्हता.पावसाने काही दिवसापूर्वीच उघडीप दिल्याने वाटेवर चांगलीच घसरट होती. जपून चालत दुसऱ्या पठारावर उतरलो. आडवे जात छोटासा धबधबा समोर आला अन वाट उजवडीकडे वळली.आतापर्यंत धुक्यात असलेली घनचक्कर-गवळदेवला जोडणारी खिंड नजरेस पडली.पावलांचा वेग वाढला डावीकडे खोल दूरवर कुमशेत गाव दिसायला लागलं होत.पुढच्या ५ मिनिटात खिंड गाठली.मागे वळून पाहत भव्य घनचक्करावर नावाप्रमाणेच घन (ढग) चकरा मारत होते.वेळ:दुपारी २.१०
     घनचक्कर माथ्यावरून गवळदेव माथा
       घनचक्कर-गवळदेवला जोडणारी खिंडीकडे उतराई
      घनचक्कर-गवळदेवला जोडणारी खिंड
         भव्य घनचक्कर गवळदेव वाटेवरून
गवळदेव माथा मात्र अजूनही धुक्यातच असल्याने किती उंच आहे याचा अंदाज येत नव्हता.गवळदेव डोंगराला डावीकडून वळसा घालत पुढे निघालो.वाट ट्रॅव्हर्सिंगची असल्याने चढ-उतार नाहीत.मागे घनचक्कर डोंगराची भव्यता पाहून डोळे दिपले.साधारण अर्धा तास पायपीट केल्यावर धुक्याची दाट चादर बाजूला झाली अन गवळदेवाची उंची पाहून डोळे विस्फारले.पल्ला बराच लांबचा आहे याची जाणीव झाली.गवळदेवला जाणारी वाट अजून पुढून होती पण आम्ही मधूनच चढाई करायचं ठरवलं.तीव्र चढ अंगावर घेत अन बऱ्याचदा छातीएवढा पाय उचलत सर्व टीमने ताल धरला.अर्ध्या तासात पहिले पठार गाठल अन देवकृपेने सोनेरी उन्हाच्या किरणांनी सर्व परिसर उजळला.वेळ :दुपारी ३.१५
    पहिल्या पठारावरून गवळदेवकडे वाटचाल
     पहिल्या पठारावरून गवळदेवकडे वाटचाल
अजूनही साधारण १००-१२० मीटर्सची चढाई बाकी होते. पुढच्या १५ मिनिटांत डावीकडून मुडा डोंगराकडून आलेली वाट मिळाली. छोटासा कातळटप्पा पार करून माथ्यावर पोहोचलो तरी सर्वोच्च माथा अजूनही वर होता. आता वाट बऱ्यापैकी सौम्य चढाची असून २० मिनिटांत गवळदेव या महाराष्ट्राच्या तिसऱ्या उंच शिखरावर पाऊल ठेवले.काय नजारा होता ...अहाहा यालाच म्हणायचं सुख.कात्राबाई-रतनगड अगदीच जवळ भासत होते.अथांग आर्थर जलाशय अन त्यामागची कळसुबाई रांग एखाद्या चित्रासारखी दिसते.काही वेळ फोटो काढत वातावरण निवळण्याची वाट पहिली पण काही यश आलं नाही.आल्यावाटे खाली उतरायला सुरुवात केली. वेळ दुपारी:४
                       सोपा कातळटप्पा
             गवळदेव माथा अन देवस्थान
सोपा कातळटप्पा पार केल्यावर मगाशी मुड्याकडून आलेली वाट धरली.एका झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यावर थोडासा पोटोबा केला.वाट आता समांतर जात कात्राबाई खिंडीत नेऊन सोडेल असा आमचा अंदाज होता. धुकं दाटून आल होत त्यामुळे पूर्ण टीम एका वेगात चालत होती.साधारण १५-२० मिनिटांनी प्रसादने आवाज देऊन सांगितले उजवीकडे जाणारी वाट पकडा.आम्ही धिंदळे मामांच्या मागेच असल्यामुळे बिनधास्त चालत होतो.काही वेळातच प्रसादचा परत आवाज आल्यावर थांबलो.आपण चुकीच्या दिशेने जातोय दरीच्या टोकाला चाललोय इति प्रसाद. धिंदळे मामांनीही दाट धुक्यामुळे अंदाज येत नाही म्हणल्यावर प्रसादने परत जीपीएस मॅप बघुन मागे जायचा निर्णय घेतला.साधारण २०-२५ मिनिटे मागे येऊन गवळदेव-मुडा खिंडीत उतरणाऱ्या वाटेला लागलो.
      गवळदेव सोपा कातळटप्पा उतरताना
संध्याकाळचे ५.३० झालेले असल्याने आता झपाझप चालण्याशिवाय पर्याय नव्हता.पुढच्या ५ मिनिटांत परत पायवाट गर्द जंगलातुन धुक्यात गडप झाली.२-३ टीम बनवून पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण रस्ता शोध घेण्यात आला.धुक्यात एका ठिकाणी काहीतरी बांधकाम असल्याचा भास झाला.बघतो तर दगड रचुन एक भिंत उभी केली होती पण रस्ता काही भेटेना.संध्याकाळचे ६ वाजले अन धुकं अजुनच गडद व्हायला लागलं तस बॅकअप प्लॅन म्हणुन इथंच रात्र काढण्यासाठी जागेचा शोध घेण्यास सुरुवात केली.पाण्याची अन खाण्याची कमतरता नव्हती पण आडोसा असा कुठेच नव्हता.काही सदस्यांनी सरपण गोळा करायला सुरुवात केली अन तेवढ्यात दूरवरून प्रसाद अन निळु भाऊंचा आवाज आला.आवाजाच्या अंदाजाने धुक्यातून वाट काढत त्यांच्याजवळ पोहोचताच एकावर एक ३मोठे दगड रचलेले दिसले.तिथूनच एक ठळक पायवाट बघून मंडळ खुश.प्रसादने परत एकदा रस्ता शोधून मांझी मॅनची भूमिका पार पाडली.वेळ संध्याकाळी:६.१०
पुढची वाट बऱ्यापैकी मळलेली होती.विना-थांबा एका तालात चालत कात्रा खिंड गाठायला ६.४० झाले अन अंधारून आलं.इथून पुढचा रस्ता माहिती असल्यामुळे १० मिनिटांचा ब्रेक घेण्यात आला.थोडासा पोटोबा केला.सर्व सदस्यांकडे टॉर्च असल्यामुळे अंधारात उतरण्यास तशी काही फारशी अडचण येणार नव्हती.
        मुडा शिखराकडून गवळदेवकडे जाणारी वाट
आता उतराईची  जबाबदारी मी(प्रसन्न) अन डांगे सरांनी घेत पुढे निघालो.अंधार अन वाढलेल्या झाडीमुळे रस्ता शोधण्यास अडचणी येत होत्या अन एका ठिकाणी परत रस्ता चुकला.२० मिनिटे वेळ वाया गेला.परत येऊन योग्य रस्त्याला लागलो.निसरडी पायवाट अन उतार यामुळे थोडं जपूनच उतरत रात्री ९.१५ ला कुमशेतच्या डांबरी रस्त्याला लागलो.सर्वांगसुंदर अशी डोंगरयात्रा करून सर्व मंडळ धन्य झालं होत.आमची बस समोर उभी होतीच.५ मिनिटांत कुमशेत इथे पोहोचून श्री.अस्वले यांच्याकडे फ्रेश झालो अन त्यांच्याच घरात पथाऱ्या पसरल्या.चुलीवरचे पिठलं चपाती भात वरण खाऊन तृप्त झालो.पाठ टेकताच झोप लागली हे काही वेगळं सांगायला नको.

या ट्रेकचा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 

या ट्रेकचा नकाशा 



महत्वाच्या नोंदी :
सुरवात : शिरपुंजे शेवट : कुमशेत 
मार्ग : शिरपुंजे-भैरवगड-पतवडी डोंगर-घनचक्कर शिखर-गवळदेव शिखर-मुडा-कात्राबाई खिंड-कुमशेत 
एकूण चढाई उतराई: १४५० मीटर्स 
श्रेणी :मध्यम
एकूण डोंगरयात्रा:२२.३ कि.मी 

चढाई उतराईतील टप्पे:
शिरपुंजे(९३५ मीटर्स)-भैरवगड माथा(१२५० मीटर्स)-घनचक्कर(१५१० मीटर्स)-गवळदेव खिंड(१२६० मीटर्स)-गवळदेव माथा(१५२५ मीटर्स)-कात्राबाई खिंड(११७० मीटर्स)-कुमशेत(८५० मीटर्स)

प्रसन्न वाघ 
वाईल्ड ट्रेक ऍडव्हेंचर