Saturday 21 April 2018

माकडनाळ हरिश्चंद्रगड

   खुबी गावातून दिसणारा हरिश्चंद्रगड..उंच शिखर तारामती..डावीकडे माकडनाळ खिंड 

दिवस १:२४ मार्च २०१८
हरिश्चंद्रगड म्हणजे जातीवंत भटके,नवखे,हौशी अन ट्रॅकिंग वाल्यांमध्ये गिर्यारोहणासाठी आदर्श जागा.हरिश्चंद्रगडाला खिरेश्वर,पाचनई आणि नळीची वाट या प्रसिद्ध अन अगदीच वापरात असलेल्या वाटा तर जुन्नर दरवाजा राजमार्ग,सादडे घाट,बैल घाट,कोथळे(लव्हाळे) या कमी वापरातल्या वाटांनीही काही मंडळी हरिश्चंद्रगडावर पोहोचतात.
     खिरेश्वर गावातील प्रसिद्ध नागेश्वर मंदिर 
वरील सर्व वाटा पायाखालून गेल्या होत्या त्यामळे राहिलेल्या दोन वाटा ज्यांचं नावही फार क्वचितच घेतलं जात अशा माकडनाळ अन तारामती घळ वाटांपैकी एका वाटेला भिडायचं प्रसादने ठरवलं अन ठरल्याप्रमाणे पुण्यनगरीतून रात्री १२ ला १२ जणांचं भ्रमणमंडळ वालीवरे गावाकडे मार्गस्थ झालो.पहाटे झुंजूमुंजू व्हायच्या वेळी वालीवरे गाठले अन तडक कमळूच्या घरी जाऊन आजचा मनसुबा सांगितला.कमळू सांदणला गेल्यामुळे काशीदादा बरोबर येणार होता.
      वालीवरे गावातून दिसणारा नाफ्ता 
मॅग्गी अन चहाचा नाश्ता करून पाणी भरून घेतले.माकडनाळ चढून खिरेश्वर गाठेपर्यंत पाणी कुठेच नसल्यामुळे प्रसाद,निळू भाऊ,योगिता अन अविनाश सरांनी विविध पाणीदार फळे घेतली होती.अविनाश सावंत सरांनी ७-८ लिटर पाणी,४-५ खरबूज अन बाकीचा शिधा घेऊन रकसॅक चांगलीच जड केली होती.नेपाळमधील आयलंड शिखर(६१८९ मीटर्स) मोहिमेसाठी पूर्वतयारी म्हणून गेल्या बऱ्याच ट्रेकमध्ये अविनाश सरांनी घाम गाळला होता अन त्याचच फळ म्हणून मागच्याच आठवड्यात आयलंड शिखर पादांक्रात करण्यात त्यांना यशही मिळालं.

सकाळी ७ ला वालीवरे-मुरबाड मुक्कामी येष्टी मुरबाडकडे अन आम्ही माकडनाळेकडे निघालो.डावीकडे नाफ्ताने सुंदर दर्शन दिले.सुरुवातीला तासभर नळीच्या वाटेनेच कोकणकड्याच्या पायथ्याला पोहोचलो.नळीच्या वाटेतला तीन टप्प्यात पडणारा छोटासा धबधबा पार केल्यावर डावीकडची नळीची वाट सोडून सरळ मोठ्या ओढ्यातून पुढे निघालो.२० मिनिटांत मोठ मोठ्या दगडांमधून वाट काढत भव्य कोकणकड्याच्या अगदीच पायथ्याला पोहोचलो अन कोकणकड्याचं वेगळंच रूप बघायला मिळालं.डाव्या बाजूला नळीची वाट बघून या वाटेने बऱ्याचदा गेलोय यावर विश्वास बसेना एवढ रौद्र तीच रूप होत.समोर सरळसोट कोकणकड्याचा माथा अन उजवीकडे उंचच गेलेली माकडनाळ असा कॅनवास बघताना मानेचा चांगलाच व्यायाम झाला.मागे वालीवरे अन दूरवर नानाचा अंगठा दर्शन देत होता.वेळ सकाळी:८.२०
         वालीवरे गावातून दिसणारा कोकणकडा  
                      कोकणकड्याचं पायथ्यातून दर्शन 
काही क्षण विसावल्यानंतर उजवीकडून येणाऱ्या माकडनाळेला भिडलो.बऱ्याच माकडांचा आवाज नाळेत घुमत होता त्यात आमचे दोन वानर टॅंगो अन शेखर आण्णा त्यांचीच नक्कल करून माकडांना अजून प्रोत्साहन देत होते.या माकडांमुळेच या नाळेला माकडनाळ म्हणत असावेत असा पहिला अंदाज काढला. छोट्या-छोट्या कोरड्या धबधब्यातून,नाळेच्या भिंतीवरून अन मोठाल्या दगडांवरून चढताना हात अन पायांचा उपयोग माकडनाळेत करावाच लागत होता.म्हणजे एकूणच ही नाळ चढायची तर बऱ्याच ठिकाणी माकडांसारखं चढाई करावी लागत होती म्हणून ही माकडनाळ असा दुसरा अंदाज काढला असो. 
                     नळीची वाट हरिश्चंद्रगड 
नाळेची वाट अन सकाळची वेळ असल्यामुळे छानसा गारवा जाणवत होता.नळीच्या वाटेपेक्षा माकडनाळेतील दगड अगदीच स्थिर असल्यामुळे भराभर उंची गाठत पुढच्या तासाभरात एका अवघड कातळटप्प्याच्या खाली पोहोचलो.वेळ सकाळी:९.१५
काशी दादांनाही होल्ड्स लवकर सापडत नव्हते म्हणजेच या टप्प्यावर नविन माणसाला वेळ लागणार हे नक्कीच होतं.काशी दादांनी काळजीपूर्वक हा ७०-८० फूट टप्पा चढुन रोप खाली सोडला.सर्वात आधी काही हलकी मंडळी वर चढून बाकीच्यांना बिले द्यायचं ठरलं.मंडळामध्ये वजनाला सर्वात हलके पण हिंमतीने चांगलेच जड निळू भाऊंना पहिला मान देण्यात आला.दुसऱ्या रोपने लॉकिंग सिस्टिम बनवत टॅंगोने त्याला अधिक सुरक्षित केले.निळू भाऊंनी काळजीपूर्वक चढाई करत कुठेही न धडपडता १५ मिनिटांत हा टप्पा पूर्ण केला.नंतर अमोल,मी,शेखर आण्णा,टॅंगो यांनी २५-३० मिनिटांत माथा गाठल्यावर वरून बिले दयायला मजबूत टीम तयार झाली.बाकीचे मंडळ पोहोचल्यावर सर्वांच्या सॅक रोपने ओढून घेतल्या अन शेवटी प्रसादने चढाई करून रोप काढून घेतला.काही मंडळींना हा अवघड टप्पा जास्तच आवडल्याने त्यांनी या टप्प्याची चांगलीच गळाभेट घेत चढाई केली त्यात थोडा अधिक वेळ गेला.सर्व मंडळाने कुठेही न धडपडता न खरचटता सुरक्षितपणे हा टप्पा पार केला. वेळ दुपारी:दुपारी:१२.३०
      माकडनाळेतुन  नळीची वाट हरिश्चंद्रगड 
      माकडनाळ अवघड कातळटप्पा 
      माकडनाळ माथ्यातून नळीची वाट हरिश्चंद्रगड
थंडगार माकडनाळ आता उन्हाने तापून निघाली होती.२०-२५ मिनिटांची तीव्र चढाई करत माकडनाळ माथा गाठला. उत्तरेला नळीच्या वाटेचा माथा अन माकडनाळ माथा समांतर उंचावर भासत होता.रौद्र दिसणारे हरिचंद्रगडाची शिखरे,नळीची वाट अन माकडनाळ दृश्य माकडनाळेच्या खिंडीतून सुखावह होते.माथ्यावर चांगला झाडोरा बघून शिदोऱ्या उघडल्या.पोटोबा करून बराचसा फलाहार झाला.वेळ दुपारी:२
         माकडनाळ खिंड अन शेंडी सुळका 
माकडनाळ माथ्यापासूनच पश्चिमेला रोहिदास शिखराकडे जायला वाट आहे(२-२.१५ तास).आम्ही मात्र प्लॅननुसार पूर्वेला खिरेश्वरकडे उतराई सुरु केली.काही वेळ जंगलातून उतरल्यावर डावीकडे शेंडी सुळका लक्ष वेधून घेतो.उजवीकडे माळशेज घाटाचं सुंदर दृश्य अजून बराच वेळ सोबती राहणार होत.डावीकडे तारामती शिखर ५२० मीटर उंचावलेले दिसते.आता तापत्या उन्हात हरीशचंद्रगडाला वळसा घालून राजमार्गाला गाठायचे होते.वाट चढाईची नसल्याने तितकासा त्रास जाणवत नव्हता पण एवढ्या मोठ्या पठारावर बराच वेळ चालूनही सावलीसाठी झाड मिळेना.अखेर तासाभराने जंगलटप्पा आल्यावर गर्द सावलीत आडवेच झालो.निळू भाऊंनी आणलेलं कलिंगड मार्गी लावल.शरीर थंड झाली.वेळ:दुपारी:३.१५
        खिरेश्वर वाटेवर...मागे रोहिदास शिखर
       खिरेश्वर वाटेवर..हरिश्चंद्र शिखर अन नेढं 
                             क्षणभर विश्रांती 
१० मिनिटात बालेकिल्ल्याच्या डावीकडून येणाऱ्या नाळेत पोहोचलो.या नाळेतून ४०० मीटर चढाई करून बालेकिल्ल्याचा पायथा गाठता येतो.(२ ते २.३० तास).तसंच या नाळेने खाली कोकणात उतरून थिटबी गाठता येत(तारामती घळ वाट) या वाटेचा शोध लवकरच घ्यायचा असं ठरवून नाळेतून उजवी घेत एक चढाई टप्पा पार केला.आता डावीकडे जुन्नर दरवाजाची खिंड तर समोर नेढं दिसत.एका खिंडीत चढून राजमार्ग गाठला.वेळ:दुपारी:४
          तारामती घळ वरचा टप्पा अन बालेकिल्ला 
   जुन्नर दरवाजा वाटेवरून खिरेश्वर अन पिंपळगाव धरण 
खिरेश्वर गाव आता हाकेच्या अंतरावर दिसत.पिंपळगाव जोगा धरणाचे सुंदर दृश्य बघत खिरेश्वर गावात लँडिंग सुरु केले.मळलेल्या ऐसपैस राजमार्गाने ३० मिनिटांत खिरेश्वर गाठले.उजवीकडे टोलार खिंड गर्द जंगलात विसावली होती.डावीकडे तारामती शिखरापर्यंत नजर फिरवली हरिश्चंद्रगड भव्य दिसत होता.  माकडनाळेने आज हरिश्चंद्रगडाची भव्यता अजूनच जवळून चाखायला मिळाली होती. 

 अविनाश,अमोल,विजय,मंदार,मुकुंद,कीर्ती,योगिता,शेखर,रवी,निळू अन प्रसन्न ..फोटो:प्रसाद 

या डोंगरयात्रेचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 


नोट:
 १.माकडनाळेतील कातळटप्पा अवघड असुन कातळारोहणासाठी आवश्यक सर्व साहित्य गरजेचे. 
 २.नळीच्या वाटेपेक्षा माकडनाळीतील दगड स्थिर असून घसारा अन दृष्टीभय देणारे ट्रॅव्हर्स नाहीत.

महत्वाच्या नोंदी :

सुरवात:वालीवरे शेवट:खिरेश्वर 
मार्ग: वालीवरे-माकडनाळ-जुन्नर दरवाजा मार्ग-खिरेश्वर 
श्रेणी:अवघड
एकूण डोंगरयात्रा: १३.२ किमी

चढाई उतराईतील टप्पे:
वालीवरे (२६०मीटर्स)-माकडनाळ माथा(८९५ मीटर्स)-खिरेश्वर(७०० मीटर्स)

प्रसन्न वाघ
वाईल्ड ट्रेक ऍडव्हेंचर

Saturday 14 April 2018

अंगठेसरी-नाळेची वाट

    अंगठेसरीच्या वाटेवरून कांदोशी,रसाळ-महीपत रांगेचे सुंदर दृश्य 

या ट्रेकचा पूर्वार्ध कोंडनाळ-हातलोट घाट इथे वाचा
कोंडनाळ-हातलोट घाट

दिवस २:११ मार्च २०१८
कालच्या कोंडनाळ-मकरंदगड-हातलोट डोंगरयात्रेनंतर सह्याद्रीच्या कोंदणात वसलेल्या कांदोशीच्या हनुमान मंदिरात जी काही समाधानी झोप लागली त्याला तोड नव्हती.पहाटेच्या थंडगार वाऱ्यामुळे जाग आली.रात्री सांगितल्याप्रमाणे बर्गे मामा चहा घेऊन सकाळी ६ ला हजर.पूर्वेला ९०० मीटर उंचावलेला सह्याद्री बघून उगवत्या सूर्याबरोबर त्यालाही नमस्कार करून आन्हिकं उरकली.आजची डोंगरयात्रा साधारण ११ ते १२ तासांची होणार होती म्हणून बऱ्यापैकी खाण्याचा शिधा अन पाण्याचा पुरेसा साठा घेऊन कांदोशी सोडलं.वेळ सकाळी:७.१५
    कांदोशी गावातील प्रसिद्ध रामवरदायिनी मंदिर 
     डावीकडून:प्रजेश,निलेश,प्रसन्न,मुकुंद,विनायक,योगिता,कीर्ती अन प्रसाद
अंगठेसरी घाटाची सोंड बघून चढाई अतितीव्र असणार यात शंकाच नव्हती.अंगठेसरी हा पूर्ण नाकाडावर कोरलेली घाटवाट असून माथ्याशिवाय झाडोरा कुठेच दिसत नव्हता त्यामुळे उन्हं माथा ओलांडून आम्हाला गाठायच्या आत अंगठेसरी माथा गाठायचा आमचा प्लॅन होता.कांदोशी गावाबाहेर पडल्यावर ५ मिनिटांत एक सिमेंटचा पूल ओलांडला की डावीकडे अंगठेसरीची चढाई सुरु होते.याच पुलावर अंगठेसरी,नाळेची वाट अन तेलीसरी घाटवाटांचा त्रिवेणी संगम होतो. 
     पहिल्या पठारावरून अंगठेसरीची डोंगरधार 
एक-दोन घर ओलांडून ठळक अशी पायवाट वरच्या छोट्या पठारावर घेऊन जाते.तोडलेल्या झाडांच्या राशी बघून खिन्नता वाटत होती.संपूर्ण डोंगर लाकूडतोडीने उघडा-बोडका झालेला आहे.साधारण पाऊण तास तीव्र चढाई केल्यावर डोंगरसोंडेवरुन चढणारी वाट डावीकडे वळते.एक मजबूत ट्रॅव्हर्स मारत बारीकशी वाट घळीतून यू टूर्न घेऊन परत डोंगरसोंडेवर घेऊन गेली.वेळ सकाळी:८.४०                      
     डावीकडे वळसा घेतल्यावर लागणारी बारीक स्क्री वाट 
         अंगठेसरी घाटातील तीव्र चढाई 
आता वाट सोंडेवरून असेल असा अंदाज फोल ठरून वाट डोंगरसोंडेच्या उजव्या बाजूने वळसा घालत वर चढते.इथपर्यंत पोहोचल्यावर चांगलीच उंची गाठलेली होती अन वाट परत पदरातून डावीकडे वळत डोंगरसोंडेला भिडली.पाऊल बसेल एव्हढ्या वाटेवर स्क्री भरपूर असून डावीकडे दिसणाऱ्या २००० फूट खोल दरीमुळे नवख्यांचे डोळे इथे नक्कीच फिरू शकतात.डोंगराला बिलगत हे अवघड वळण पार करून डोंगरसोंडेवर विसावलो.पश्चिमेला दूरवर रसाळ-सुमार-महीपत रांग खोलवर खाली कांदोशी,डावीकडे नाळेची वाट अन तेलीसरी घाट बघून डोळे सुखावले.वेळ:९.५०

     अंगठेसरी घाटातील किंचित अवघड वळण..डावीकडे साधारण २००० फूट दरी
     अंगठेसरी घाटातील किंचित अवघड वळण..डावीकडे साधारण २००० फूट दरी
उन्हाची कोवळी किरणे आता अंगठेसरी माथा ओलांडून आली होती.धारेवर आरूढ होऊन एक तीव्र चढ चढला अन वाट उजवीकडे वळाली.मागच्या ३ तासाच्या तीव्र चढाईनंतर पदरातून वळसा घालताना वेगळीच मजा येत होती.बारीकशा नळीच्या वाटेतून वर चढताना माथा गाठल्याचा आनंद सर्वांच्या तोंडावर ओसंडून वाहत असतानाच मामांनी समोरच्या डोंगर माथ्याकडे बोट केल्यावर एक झाड बघून थोडस विसावलो.उन्ह आता चांगलीच तापली होती.शेवटचा ११० मीटरचा टप्पा भर उन्हात चढून अंगठेसरीचा माथा गाठला.वेळ सकाळी:१०.४०
                अंगठेसरी घाटातील शेवटचा टप्पा
     तीव्र चढाईनंतर पदरातून वळसा घालणारी वाट
शेवटची छोटीशी नळीची वाट
           अंगठेसरी माथ्यावरून दिसणार दृश्य 
१० मिनिटे थंड सावलीत आराम करून शरीराचं इंजिन थंड केलं.सह्याद्री माथ्यावरून रौद्र कोकणकडा अन कांदोशीच सुंदर दृश्य बघून पूर्वेकडे निघालो.दूरवर जंगल दिसत होत खर पण वाट उघड्या पठारावरून वळसा घालत होती.दरीपलीकडे दिसणार एकमेव घर गाठलं.घरात सध्या कोणीही राहत नाही.उत्तरेला मकरंदगड-घोणसपूर आणि कोंडनाळेचा माथा बघून कालच्या डोंगरयात्रेच्या आठवणीने तृप्त झालो.इथून जवळच डावीकडे उतरून दाभे मार्गे मकरंदगड गाठता येतो.आम्हाला नाळेची वाट गाठायची असल्याने साधारण दक्षिणेकडे झाडणीकडे जाणारी वाट धरली.पाऊण तासात मुख्य पायवाट सोडून उजवीकडे थोडंसं खाली उतरून घनदाट जंगलात शिरलो.समोरच गर्द सावलीत बारमाही पाण्याचा झरा गवसला.पोटोबासाठी चांगलं तासभर विसावून उदरअग्नी शांत केला.अतिशय रम्य अशा घनदाट जंगलात हा पाण्याचा झरा असून त्याला कोथळीच पाणी म्हणतात.काही जणांच्या डोक्यात इथेच वामकुक्षी घेण्याचा विचार येणं साहजिकच होत पण अजून बरीच डोंगरयात्रा बाकी असल्यामुळे पाणी भरून काढता पाय घेतला. वेळ दुपारी:१
         अंगठेसरी माथ्याजवळील कोकणकडा 
      अंगठेसरी-झाडणी दरम्यान लागणारे एकमेव घर 
       मकरंदगड-घोणसपूर आणि कोंडनाळ दृश्य 
         कोथळीच पाणी..थंड अन चवदार 
आता दक्षिणेला सपाटीवरून कधी जंगलातून कधी उघड्यावरून मार्गक्रमण करत झाडणीकडे निघालो.इथून नाळेची वाट गाठायला दोन मार्ग आहेत.
१.झाडणीतून तांबटधारेने निरपजी मंदिर बघून नाळेची वाट गाठता येते.हा मार्ग लांबचा असून २-३ तास अधिक वेळ लागतो.
२. झाडणीच्या साधारण १ किमी अलीकडे पश्चिमेला एक डोंगरधार थेट नाळेच्या वाटेवर नेऊन सोडते.निरपजी मंदिर अन कांदाट बायपास करायचे असल्यास हा मार्ग खूपच जवळचा अन कमीत कमी वेळेत कांदोशीत पोहोचण्यास उपयोगी.
आम्ही मागच्या तेलीसरीच्या वेळी कांदाट खोरे अन निरपजी मंदिर बघितले होते त्यामुळे यावेळी दुसरा मार्ग पायाखालून घालायच्या संधीच आम्ही सोन करायचं ठरवून उजवीकडे जाणाऱ्या पुसटश्या वाटेने माथ्यावर पोहोचलो.साधारण दक्षिणेला दूरवर तांबटधार अन त्याखाली निरपजी मंदिर परिसर दिसतो.समोर खोलवर एक घर दिसत त्याच घराची दिशा पकडून उतरायला सुरुवात केली. वेळ दुपारी:२.३० 
    झाडणीच्या अलीकडे पश्चिमेला नाळेच्या वाटेकडे उतरणारी डोंगरधार
   झाडणीच्या अलीकडे पश्चिमेला नाळेच्या वाटेकडे उतरणारी डोंगरधार
मस्त मळलेल्या वाटेने धारेवरून उतरताना चोरकणा घाटाची आठवण झाली.पाऊण तासात मगाशी वरून पाहिलेल्या घराजवळ पोहोचलो.काळे कुटुंब या घरात राहतात,मामांचे नातेवाईकच ते.लागलीच ताक समोर आले.मुकुंद सर,प्रजेश अन विनायक यांनी नेहमीप्रमाणे हावऱ्याप्रमाणे ताकावर हात आडवा केला.प्रसाद अन निळू भाऊंनी लिंबू सरबत बनवले.गप्पा टप्पा करत सह्याद्रीच्या कुशीत निवांत विसावलो.थोडंसं पाणी घेऊन पुढची उतराई सुरु केली.
      नाळेच्या वाटेवर असलेलं एकमेव घर
                   नाळेच्या वाटेवर..
तीव्र उताराच्या वाटेने उतरताना उजवीकडे काही खिंडी दिसतात अन हीच नाळेची वाट असा समज होऊ शकतो.अशा ३ खिंडी मागे टाकून जंगलात शिरलो.किर्रर्र जंगलात निरपजी मंदिराकडून येणाऱ्या वाटेला गाठलं.माथ्यापासून ४६० मीटर्सची उतराई झाली होती.नाळेची वाट उंचीला बुटकीअसून एक छोटासा सोपा कातळटप्पा उतरून नाळेत शिरलो.तासाभरात नाळेतील दगदगडांवर टुणूक-टुणूक उतरत पायथा गाठला. वेळ:संध्याकाळी:५
                     नाळेची वाट सुरुवात 
           नाळेची वाटेतील सोपा कातळटप्पा 
       पायथ्यातून नाळेची वाट 
जगबुडी नदीच्या काठाने सपाटीने आता कांदोशीकडे निघालो.एक-दोनदा जगबुडी नदी पार करत तेलसरी घाटाच्या पायथ्यातून सकाळी गेलेल्या सिमेंटच्या पुलावर पोहोचलो.रामवरदायिनी मंदिर अन रसाळ-सुमार-महीपत रांगेच्या बरोबर मागे सूर्यास्त होत होता अन आमच्यामागे अंगठेसरी माथा अधिकच उंच  भासत होता.
      सुंदर सूर्यास्त अन रम्य कांदोशी गाव 

या डोंगरयात्रेचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 

 नोट:
 १.अंगठेसरी घाट हा कुशलतेने सह्याद्रीच्या नाकाडावर बनवलेला असून वाट बारीक अन स्क्रीयुक्त असून चढाई/उतराई करताना काही ठिकाणी काळजी घेणं आवश्यक.
२.शक्यतो सकाळी लवकर चढाई/उतराई करावी.अंगठेसरी घाटात सावलीसाठी कुठेही मोठं झाड नाही.
३.फक्त ३ किमी च्या अंतरामध्ये ८०० मीटर चढाईची मजा देणाऱ्या फार मोजक्याच डोंगरयात्रा महाराष्ट्रात आहेत.त्यातील अंगठेसरी एक आहे.(खुट्टेदार-रामपूर ते दुर्ग किल्ला अजून एक अशीच दमदार चढाई आहे)

महत्वाच्या नोंदी :
सुरवात:कांदोशी शेवट:कांदोशी

मार्ग: कांदोशी-अंगठेसरी-झाडणी-नाळेची वाट-कांदोशी
श्रेणी:मध्यम
एकूण डोंगरयात्रा:१७.९ किमी

चढाई उतराईतील टप्पे:
कांदोशी (८४मीटर्स)-अंगठेसरी माथा(८८४ मीटर्स)-झाडणी(९४५ मीटर्स)-नाळेची  वाट खिंड(४७० मीटर्स)
  
प्रसन्न वाघ
वाईल्ड ट्रेक ऍडव्हेंचर