Friday 28 July 2017

खुट्याचं दार-दुर्ग किल्ला-ढाकोबा-दाऱ्या घाटांची चढाई उतराई-उत्तरार्ध

                    दुर्ग किल्ल्याकडून ढाकोबाच्या वाटेवरचा रम्य प्रवास 

या डोंगरयात्रेचा पूर्वार्ध येथे वाचा
खुट्याचं दार-दुर्ग-ढाकोबा-दाऱ्या घाटांची चढाई उतराई पुर्वार्ध

दिवस २:६ नोव्हेंबर २०१६
पहाटे ५ ला कोणाच्यातरी खुडबुडण्याने जाग आली.मंदिरापासून लांबवर योग्य जागा बघून आन्हिकं उरकली.दुर्गवाडीतील अमोल पारधे हा मुलगा वाटाड्या म्हणून येणार होता म्हणून यदु मामांनी भांडी दुर्गवाडीत पोहोचवायची जबाबदारी घेतली.यदु मामांना टाटा करून दुर्गा देवीच्या मंदिरापासून पूर्वेकडे जाणाऱ्या (दुर्ग उजव्या हाताला ठेवत)पायवाटेने १० मिनिटं दुर्ग किल्ल्याला वळसा घालत सपाटीवर चालल्यावर बरोबर दुर्ग किल्ला पाठीमागे दिसतो अन वाट डावीकडे उताराला लागते.वेळ सकाळी:७
५ मिनिटांच्या उतराई नंतर काही शेती नजरेस पडते.शेताडी पार करून डाव्या अंगावरून एक मळलेली वाट पुढे जाते.काही वेळातच एक खळाळणारा ओढा समोर येतो.मिळालेल्या माहितीप्रमाणे या ओढ्यात चांगलं उन्हाळ्यापर्यंत पाणी टिकत.या ओढ्यावरच पुढे भिवडे गावाजवळ रामजेवाडी पाझर तलाव बांधलेला आहे.सुंदर अशा पाऊलवाटेने पायवाट ओढ्याच्या काठाकाठाने चढउतार करत पुढे घेऊन जाते.आता आम्ही खळग्यात पोहोचल्यामुळे ढाकोबा नजरेआड होतो.इथे एक निसर्गाचा चमत्कार बघायला मिळाला.निघोजच्या रांजणखळग्यासारखे बरेचसे खळगे इथं बघायला मिळाली.त्या निवांत ठिकाणी १०-१५ मिनिटं विसावून सभोवतालच्या निसर्गाचा आस्वाद घेतला.मागे दुर्ग किल्ल्याचा माथा कमळगडाचीआठवण करून देत होता. वेळ:सकाळी ८.१५
                 ढाकोबाच्या वाटेवर दिसणारे रांजणखळगे 
रांजणखळग्या नंतर काही वेळात पाणी कमी असलेल्या बाजुने ओढा पार केला.पावसाळ्यात हा टप्पा टाळलेलाच बरा.वाट लगेच जंगलात शिरते अन चढाई टप्पा सुरु होतो.साधारण १० मिनिटांचा वार्म अप चढ चढून पठारावर पोहोचताच ढाकोबा शिखर समोर अगदीच जवळ भासते.मागे दुर्गदूरवर गेल्याची जाणीव होते.बाकीचे मंडळ अजूनही फोटो काढत येत असल्यामुळे पोटोबा करण्याचे ठरले.काही फळ अन प्रजेश स्पेशल खाकरा खाऊन कोवळ्या उन्हात क्षणभर विश्रांती झाली.वेळ सकाळी:९
     ढाकोबाजवळ पोहोचताना ..इथून पूर्वेला १० मिनिटांच्या अंतरावर ढाकोबा मंदीर आहे 
डावीकडे ढाकोबा माथा खुणावत होता पण आम्हाला ढाकोबा दर्शन घेऊन ढाकोबा माथा गाठायचा असल्याने उजवीकडे(पूर्वेला) जाणाऱ्या वाटेने एक जंगलटप्पा पार करत १५ मिनिटांत ढाकोबा मंदिराजवळ पोहोचलो.सकाळच्या प्रसन्न वातावरणात ढाकोबाचे दर्शन घेऊन भ्रमणमंडळाचा ग्रुपफोटो घेण्यात आला.मंदिरासमोरच पठार भव्य असून डावीकडे अंबोली गावात जाणारी वाट आहे(१.३० ते २ तास ही वाट पुढे ढाकोबा मार्गाला मिळते).
              ढाकोबा मंदीर..मागे ढाकोबा शिखर 
आल्यावाटेने १० मिनिटे मागे फिरून उजवीकडे जंगलात चढणारी वाट धरली.१० मिनिटांच्या चढाईनंतर छोटस पठार लागते.पठारावर गोल खडकांच्या राशी पसरलेल्या आहेत.ढाकोबा शिखर इथून हाकेच्या अंतरावर दिसत असले तरी ढाकोबाच्या दक्षिणेकडील धारेवरून माथा गाठायला २० मिनिटे लागली.भन्नाट वाऱ्याने आमचे स्वागत करत समोरचा नजारा खुला केला.
समोर दिसणारी भीषण दरी जीवाचा थरकाप उडवते.उजवीकडे जीवधन,वानरलिंगी दृश्य केवळ अवर्णनीय.मला नाही वाटत ढाकोबापेक्षा इतर कुठूनही जीवधन एवढा सुंदर दिसत असावा.नाणेघाट,अंजनावळेचे डोंगर,त्यामागे हरिश्चंद्रगड असा बराचसा मुलुख नजरेस पडतो.दाऱ्या घाटाची खिंड बरीच खोलवर दिसते.पळू गाव बघून अजून बराच पल्ला आहे याची जाणीव होते.मागे दूरवर दुर्ग किल्ला काल व्यतीत केलेल्या रम्य संध्याकाळची आठवण करून देत होता.१५मिनिटे स्तब्ध होऊन हे दृश्य डोळ्यात साठवले.काही फोटोज काढून शिदोऱ्या उघडल्या.पोटोबा उरकून पूर्वेकडून अंबोलीला उतरणाऱ्या वाटेने उतराई सुरु केली.वेळ सकाळी:११.१५
     ढाकोबा मंदीराकडून ढाकोबा शिखराकडे वाटचाल
       ढाकोबा शिखर नजरेच्या टप्प्यात येताना    
      ढाकोबा शिखरावरून जिवधन किल्ल्याचे दृश्य 
            ढाकोबा शिखरावर भ्रमणमंडळ 
थोड्याश्या अडचणीच्या वाटेने १० मिनिटांत खालच्या पठारावर पोहोचलो.थोडं उजवीकडे सपाटीने चालल्यावर ढाकोबा मंदिराकडून येणारी मळलेली वाट गवसली.ढाकोबा शिखर वेगाने मागे टाकत त्या सोप्या वाटेने थोडा वेळ चालल्यावर वाट उताराला लागते अन अंबोली गाव दृष्टीक्षेपात येत.एका झुळझुळणाऱ्या ओढ्यावर मिनी अंघोळ करून तापलेली शरीरं थंड केली.इथून एक वाट (शॉर्टकट म्हणा)डायरेक्ट दाऱ्या घाटाच्या मुखाशी पोहोचते असं आम्हाला नंतर समजलं.आम्ही नेहमीच्या धोपट मार्गाने अंबोलीकडे जाणारा मार्ग धरला.एक सोपा कातळटप्पा पार केल्यावर उजवीकडे भली मोठी निसर्गनिर्मित गुहा नजरेस पडते.आडवाट करून गुहा पाहून परत आलो.अंबोली जवळ येताच डावीकडे खिंडीकडे जाणारा ओढ्याचा मार्ग आहे त्याने साधारण १५-२० मिनिटात दाऱ्या घाटाच्या माथ्यावर पोहोचलो.वेळ दुपारी १२.४५
                  दाऱ्याघाट माथा व देवस्थान 
दाऱ्या घाटाच्या सुरुवातीलाच देवाचं छोटस स्थान आहे.थोडासा पोटोबा उरकण्यात आला.ब्रह्मा सरांनी नेहमीप्रमाणे फावल्या वेळात वामकुक्षी घेतली.इथूनच डावीकडची पायवाट ढाकोबाला शॉर्टकट आहे असं आम्हाला समजलं असो.ठरल्याप्रमाणे आमच्या वाटाड्याने आम्हाला टाटा करत अंबोलीची वाट धरली.आम्ही 
शाका पाठीवर चढवून या डोंगरयात्रेच्या शेवटच्या आव्हानाकडे निघालो.
                    दाऱ्याघाट सुरुवात 
सुरुवातीला सह्यकडे पाहून डोळे विस्फारतात अन नंतर कड्यातून जाणारी बारीकशी वाट पाहून ज्याने या वाटा शोधल्या त्याचे कौतुक वाटते.वाट कड्यातून यु टूर्न घेत घळीत पोहोचते अन सुरु होतो मोठं मोठाल्या दगडमधून टुणून टुणूक उतराईचा प्रवास.आपल्या आवडीने प्रत्येक सदस्य दगड निरखून मार्गक्रमण करत होते.साधारण तासभर उतरल्यावर एक डावीकडे जाणारी पण अस्पष्ट अशी वाट दिसली ही वाट असावी असा समज झाला अन आम्ही घळीतील वाट सोडून चुकीची(हे नंतर कळालं) जंगलात घुसणारी वाट धरली.बरीचशी झाडे वाटेवर आडवी पडलेली पाहून ही वाट नाही याचा अंदाज पहिल्यांदाच आला तरीही अर्धा तास त्या जंगलात नाही त्या वाटा धुंडाळत आम्ही बरोबर ढाकोबा शिखराच्या खाली आलो.उजवीकडे जाऊन पहिले तर कातळकडे अन डावीकडे ढाकोबाची भव्य भिंत अन मध्ये आम्ही.बाकीच्या पायलट्सना एका जागी बसवून मी,निलेश सूर्यवंशी(एक),प्रसाद,डांगे सर,निलेश वाघ (दोन) असे पथक बनवून रस्त्याच्या शोध  घ्यायला सुरुवात केली.जिपीएस नुसार इथून रस्ता असणार असा अंदाज असल्यामुळे मागे न जाण्याचा निर्णय पहिलेच झाला होता.
                    दाऱ्याघाट सुरुवात    
मच्छरांची संख्या चांगलीच असल्यामुळे ओडोमॉसचा प्रयोग सर्वाना करावा लागला.साधारण २०-२५ मिनिटे पुढे मागे आडवे तिडवे फिरल्यावर टाकटाक आवाज प्रसादने हेरला.पळत जाऊन पाहता काही गावकरी झाड तोडायला तिथे आली होती.निलेश वाघ ने मागे जाऊन सर्व मंडळ बोलावून घेतले. १० मिनिटे दाट जंगलातून घसरगुंडी करून मळलेल्या पायवाटेला लागलो हुश्श..नंतर कळाले घळीतुनच खाली उतरून मग डावी घायची होती असो असे अनुभवपण गाठीशी असणं महत्वाचं.पुढे भल्या मोठया धोपट मार्गाने साधारण तासभर चालत डांबरी रस्ता गाठला.मागे वळून पाहता दाऱ्या घाटाची खिंड अन ढाकोबाच  शिखर बरंच उंचावर राहील होत.काही फोटो काढत डांबरीवर चालत बस गाठली.शेजारीच असलेल्या डोहात अंघोळी उरकून परतीचा प्रवास सुरु केला.वेळ:संध्याकाळी ५.३०    
            पळु गावातून दाऱ्या घाटाची खिंड 
          झक्कास जोडी ..ब्रह्मा सर अन डांगे सर 
          पळु गावातून जीवधन अन दाऱ्या घाट 
पळू मधून कल्याण-नगर रोड  गाठून उजवीकडे परत दाऱ्या घाटाची खिंड अन उंच ढाकोबाचे दर्शन दुरूनच घेऊन धन्य झालो.माळशेज घाट पार करून खुबीत एका हॉटेलमध्ये थांबून पोटोबा उरकला.२ दिवसांची आनंददायी चढाई उतराई संपवुन रात्री १० ला पुण्यनगरीत पोहोचलो.
दुर्ग ढाकोबा ला जाण्यास कोकणातील धसई वरुन खालीलपैकी एक घाटाने सह्याद्री घाटावर चढ़ावे अणि दुर्ग ढाकोबा करून दुसऱ्या घाटाने परत कोकणात उतरावे. 
१. धसई वरुन मढ़वाड़ी गाठून त्रिगुणधारा (डोणीदार ) घाटाने ३ ते ४ तासात डोण गावातून १.३० तासाने दुर्ग मंदिराजवळ पोहचता येते.हा सोपा पण लांबचा मार्ग आहे. 
२.धसई वरुन रामपुर गाठून खुटेदार घाटाने ४ ते ५ तासात दुर्ग मंदिराजवळ पोहचता येते.दुर्ग मंदिरजवळून २० च मिनिटात दुर्ग किल्ल्यावर पोहचता येते.
३.धसई वरुन पळु गाठून दाऱ्या घाटाने ६ ते ७ तासात ढाकोबा गाठता येतो. 



महत्वाच्या नोंदी :
सुरवात : रामवाडी शेवट: पळू 
मार्ग :रामवाडी-खुट्याचं दार-दुर्ग किल्ला-ढाकोबा मंदिर-ढाकोबा शिखर-दाऱ्या घाट(अंबोलीचं दार)-पळू 
एकूण चढाई उतराई :२३१८ मीटर्स
श्रेणी :मध्यम

चढाई उतराईतील टप्पे:
रामवाडी-२२० मीटर्स-खुट्टा दार माथा:१०८० मीटर्स -दुर्ग किल्ला माथा:११७५ मीटर्स-ढाकोबा माथा:१२६४ मीटर्स-दाऱ्या घाट माथा:९०० मीटर्स-पळू:२३० मीटर्स(सर्वोच्च पॉईंट:१२६४ मीटर्स)

या ट्रेकचा पूर्वार्ध खुट्याचं दार-दुर्ग किल्ला 

नोट:आजकाल बरेच ट्रेकर मंडळी जीपीएस वापरतात .वरील दिलेली माहिती ही सह्याद्रीत ट्रेक करणाऱ्या अनुभवी ट्रेकर्स ना उपयोगी पडू शकते म्हणून देत आहे. 

प्रसन्न वाघ 
वाइल्ड ट्रेक ऍडव्हेंचर 
                                                                         

Monday 24 July 2017

खुट्याचं दार-दुर्ग किल्ला-ढाकोबा-दाऱ्या घाटांची चढाई उतराई-पूर्वार्ध

        खुट्ट्याचं दार घाटमाथ्यावर भ्रमणमंडळ..मागे ढाकोबा शिखर 

प्रसादने मांडलेल्या पायलट ग्रुपच्या संकल्पनेने बरेचशे कसलेले ट्रेकर्स वाइल्ड ट्रेक ऍडव्हेंचर पायलट ग्रुपला जोडले गेले.प्रसादने खुट्याचं दार,दुर्ग,ढाकोबा अन दाऱ्या घाट डोंगरयात्रा पक्की केल्यावर पायलट मंडळी आपल्या पहिल्या टेक-ऑफला रेडी झाली.
दुर्ग ढाकोबा बऱ्यापैकी ट्रेकर्समधे परिचित आहे.घाटावरुन दुर्ग आणि ढाकोबा शिखर आरामात एका दिवसात पाहून होतात पण कोकणातून जुन्या घाट वाटांनी दुर्ग ढाकोबा ह्या ठिकाणी भेट द्यायचे तर ७०० ते ९०० मि.खड़ा सह्याद्री चढ़ावा लागतो.

दिवस १:५ नोव्हेंबर २०१६
सकाळी ६.१५ च्या दरम्यान तळेगावमध्ये बाकीच्या पायलट मंडळींना भेटून आमचा प्रवास मढ-रामपूरकडे सुरु झाला.कर्जतच्या अलीकडे भजी,वडे,समोसे पोटात ढकलून दुपारच्या जेवणाची चिंता मिटवली.साधारण ११ च्या सुमारास रामपूरला पोहोचून वाटाड्याची चौकशी केली असता पुढच्या वाडीपर्यंत गाडी जाते तिथून वाटाड्या मिळेल असं समजलं.कच्या रस्त्याने १० मिनिटात पुढच्या वाडीत पोहोचलो.
या भागातील सह्याद्रीची रांग साधारण ९००-१००० मीटर उंचावलेली असल्याने ट्रेकर्ससाठी इथल्या डोंगरयात्रा नेहमीच आनंददायी ठरतात.वाडीतून सह्याद्रीकडे पाहिल्यास डावीकडे नाणेघाटाची पुढे आलेली मान,अभेद्य जीवधन,रोद्र वानरलिंगीसुळका अन या रांगेतील उंच असे ढाकोबा दर्शनाने मन तृप्त झाले.दुरवरूनच उजवीकडे डोणीदार,पोशीची नाळ अन माडाची नाळेचे दर्शन घेतले.वेळ सकाळी ११.३०
        डावीकडून निलेश,आदित्य,निलेश वाघ,प्रसन्न,प्रजेश,ब्रह्मा सर,यदु,विनायक,सुनील अन डांगे सर
यादव वाघ(यादव हे नाव आहे)उर्फ यदु वाघ यांनी वाटाड्या व्हायची तयारी दाखवली.पाणी भरून तापल्या उन्हात सह्याद्रीमाथा नाकासमोर ठेऊन आम्ही चालू लागलो.आतापर्यंत केलेल्या घाटवाटांपेक्षा खुट्याचं दार ही वाट फारच वेगळी असणार अशी जाणीव सुरुवातीलाच झाली.खालून पाहिले तर इथून वाट असेल याचा थांगपत्ताही लागत नाही.एक खळाळणारा ओढा पार करून वाट भुरट्या जंगलात शिरली.सुरुवातीचा सौम्य चढ आता तीव्र चढाईचा झाला अन चढाईची खरी मजा येऊ लागली.एक सोपा कातळटप्पा पार करत मागे वळून पाहिल्यावर दूरवर हिरवीगार शेत पाहून डोळे सुखावले.उजव्या बाजूला पळू गावाजवळचा तलाव अन पळू गाव दिसतं जिथे उद्या आम्ही लँडिंग करणार होतो.काही वेळात पुन्हा जंगलटप्पा सुरु झाला अन यदु मामांनी इथं झराआहे म्हणल्यावर गर्द सावलीत आम्ही घरून आणलेल्या शिदोऱ्या उघडल्या.मुख्य पायवाटेपासून डावीकडे काही अंतरावर हा झरा बारमाही डोंगरयात्रींची तहान भागवत असावा.थोडस जेवणउरकून परत चढाईला सज्ज झालो.
सुरुवातीला लागणारा ओढा 
                                                      पहिला कातळटप्प्पा
                                   जेवणासाठी क्षणभर विश्रांती
इथून पुढचा टप्पा तीव्र चढाईचा असून बरेच सोप्या श्रेणीचे कातळटप्पे पार करावे लागतात.पावसाळ्यात ह्या घाटवाटेला न लागलेलंच बरे.यातल्याच एका कातळटप्प्यावर चांगला छातीपर्यंत पाय उचलून वर टाकताना आधाराला वरच्या बाजूस खुट्या ठोकलेल्या आहेत म्हणून या वाटेला खुट्याच दार म्हणतात असं यदुमामांकडुन कळलं.एकदोन कातळटप्प्यावर चांगल्या पायऱ्या (पावट्या)खोदलेल्या दिसतात.ह्या कोणी केल्यात विचारल्यावर स्वातंत्र्यापूर्वी बरेचशे क्रांतिकारी या भागाचा उपयोग लपण्यासाठी करत होते त्यांनीच याखोदल्यात इति यदु वाघ.
           दुसरा कातळटप्पा.. इथे काळजी घेणं आवश्यक आहे 
    तिसरा कातळटप्पा.अवघड वाटेत नेमक्या ठिकाणी लाकडी खुट्टा दगडांच्या खोबणीत रोवला आहे    
                    चौथा कातळटप्पा
          कातळटप्प्यावर कोरलेल्या पावट्या (पायऱ्या) 
आता बारीकशी वाट पहिले उजवी अन मग डावीकडे जात वर चढत राहते.इथपर्यंत आल्यावर चांगलीच उंची गाठलेली होती पण कातळटप्पे काही संपत नव्हते.चढाई ही तीव्रच यामुळेच ही वाट बऱ्याच घाटवाटांपेक्षा वेगळीअसून चढाईची वेगळीच मजा देऊन जाते.खोलवर रामपूर अन धसई अन दूरवरचा परिसर दृष्टीक्षेपात येतो.यदु मामांनी झाडीभरला टप्पा लागल्यावर हा शेवटचा म्हणल्यावर पायांची गती वाढली.झाडीभरला टप्पा पार करताच भन्नाट वाऱ्याने माथा जवळ आल्याची जाणीव करून दिली.डावीकडेवळत दरीच्या काठाने ५ मिनिटे आडवे जात माथा गाठला.वरून खाली पाहता इथून कुठली वाट वर येते यावर विश्वास बसत नाही.माथ्यावर पोहोचताच समोर दिसणार दृश्यकेवळ १ नंबर.उजवीकडे ढाकोबाचा माथा उंचावलेला दिसतो.दुर्ग माथा मात्र इथून दिसत नाही.
         ३-४ कातळटप्पे पार केल्यावर बारीक वाट उजवीकडे वळते.मागे पळू गावातील तलाव     
           प्रजेश चौथ्या कातळटप्प्यावर 
     हुश्श ..बरच वर आलो ..इथून पुढे १-२ कातळटप्पे अजून बाकी राहतात 
            खुट्याच्या दाराची बारीकशी वाट 
               खुट्याचं दार माथा 

बाकीचे मंडळ आल्यावर फोटोसेशन उरकून ढाकोबाकडे पाठ करून दक्षिणेकडे चालू लागलो.सह्यरांगेवरून जाणारी वाट काही वेळात डावीकडे उताराला लागली.पुढच्या१५ मिनिटात एक छोटासा वॉर्म उप चढ चढुन पठारावर पोहोचताच गर्द झाडीभरल्या जंगलातून डोकं वर काढणारा दुर्ग किल्ल्याचा माथा दिसला.डझनभर फोटो काढतपायलट मंडळाने दुर्ग किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या दुर्गा देवीच्या मंदिरात लँडिंग केले.तिथंच असलेल्या मुलाला रात्रीच्या जेवणासाठी बटाट्याची आमटी करायला सांगितलीअन येताना किलो २ किलो तांदूळआणायला सांगितले.रात्री आमटी भाताचा प्लॅन फिक्स केला.शाका मंदिराबाहेर ठेऊन दमलेला पायलट आदित्य याला तिथेच देखरेखीसाठी बसवून बाकीच्यांनी दुर्ग किल्ल्याकडे प्रयाण केले.           
     दुर्ग किल्ल्याकडे वाटचाल..मागे ढाकोबा,सुंदर जंगलपट्टा  
          गर्द जंगलानी वेढलेला दुर्ग किल्ला माथा

साधारण सूर्यास्तासाठी तासभर शिल्लक होता त्यामुळे जास्त वेळ न दवडता मळलेल्या वाटेने १५ मिनिटांत दुर्ग माथा गाठला.माथा छोटा असून पूर्ण माथ्यावर मोठं मोठालेदगड पडलेले आहेत.उत्तरेला ढाकोबा अन आजूबाजूचं दाट जंगल असं सुंदर दृश्य फक्त बघतच बसावं असं दिसत.दक्षिणेला दुर्गवाडी अन हातवीज ही छोटीशी गावचित्रातल्या गावासारखी भासतात.एवढी मोठी डोंगरयात्रा करून आम्हाला वाटलं आपण दूर जंगलात आहोत अन तेवढ्यात समोरच्या डांबरी रस्त्यावरून काही वाहन पाहूनआम्ही एकमेकांकडे आश्चर्याने बघून हसू लागलो.पूर्ण गडफेरी करत फोटोसेशन केले.अतिशय मोक्याच्या ठिकाणावर असलेल्या दुर्ग किल्ल्याचा उपयोग टेहळ्णीसाठी होतअसावा कारण इथून जवळच नाणेघाट असून कोकणातून त्याकाळी बराचसा व्यापार या मार्गाने चालत असे.पश्चिमेकडे कलत्या सूर्यनारायणाबरोबर आम्हीही रम्य अशा दुर्गमाथ्यावरुन उतरू लागलो.

      दुर्ग किल्ल्याच्या माथ्यावर रमणीय अशा वातावरणात एका निवांत क्षणी भ्रमणमंडळ..मागे ढाकोबा  
                      उद्याचे पहिले लक्ष ढाकोबा शिखर 
          दुर्ग किल्ल्यावरून पाहिलेला रम्य सूर्यास्त 
 
               दुर्गा देवीचे मंदिर 
      कडकडीत थंडी,शेकोटी अन डोंगरयात्रींबरोबर गप्पांचा फड अजून काय हवंय या आयुष्यात 

दुर्गा देवीच्या मंदिरात पथाऱ्या पसरून मंदिराशेजारी शेकोटी करण्यात आली.सर्व पायलट मंडळींनी गप्पांचा फड सुरु केला विषय अर्थातच डोंगरयात्रा.दुर्गवाडीतला मुलगाआमटी अन तांदूळ घेऊन आला.चुलीचा ताबा घेत भात बनवायला सुरुवात केली.साधारण अर्ध्या तासात गरमागरम आमटी भात अन डांगे सरांनी आणलेल्या सोलापुरी कडकभाकऱ्या चोपून आवराआवर केली अन आधीच तयारी केल्यामुळे लागलीच स्लीपिंग बॅग मध्ये शिरलो.कडकडीत थंडीत जी काही झोप लागली..अहाहाहा !!!

दुर्ग ढाकोबा ला जाण्यास कोकणातील धसई वरुन खालीलपैकी एक घाटाने सह्याद्री घाटावर चढ़ावे अणि दुर्ग ढाकोबा करून दुसऱ्या घाटाने परत कोकणात उतरावे. 
१. धसई वरुन मढ़वाड़ी गाठून त्रिगुणधारा (डोणीदार ) घाटाने ३ ते ४ तासात डोण गावातून १.३० तासाने दुर्ग मंदिराजवळ पोहचता येते.हा सोपा पण लांबचा मार्ग आहे. 
२.धसई वरुन रामपुर गाठून खुटेदार घाटाने ४ ते ५ तासात दुर्ग मंदिराजवळ पोहचता येते.दुर्ग मंदिरजवळून २० च मिनिटात दुर्ग किल्ल्यावर पोहचता येते.
३.धसई वरुन पळु गाठून दाऱ्या घाटाने ६ ते ७ तासात ढाकोबा गाठता येतो. 

महत्वाच्या नोंदी :
सुरवात : रामवाडी शेवट: पळू 
मार्ग :रामवाडी-खुट्याचं दार-दुर्ग किल्ला-ढाकोबा मंदिर-ढाकोबा शिखर-दाऱ्या घाट(अंबोलीचं दार)-पळू 
एकूण चढाई उतराई :२३१८ मीटर्स
श्रेणी :मध्यम

चढाई उतराईतील टप्पे:
रामवाडी-२२० मीटर्स-खुट्टा दार माथा:१०८० मीटर्स -दुर्ग किल्ला माथा:११७५ मीटर्स-ढाकोबा माथा:१२६४ मीटर्स-दाऱ्या घाट माथा:९०० मीटर्स-पळू:२३० मीटर्स(सर्वोच्च पॉईंट:१२६४ मीटर्स)

या ट्रेकचा उत्तरार्ध ढाकोबा-दाऱ्या घाट-पळु 

नोट:आजकाल बरेच ट्रेकर मंडळी जीपीएस वापरतात.वरील दिलेली माहिती ही सह्याद्रीत ट्रेक करणाऱ्या अनुभवी ट्रेकर्स ना उपयोगी पडू शकते म्हणून देत आहे. 

प्रसन्न वाघ 
वाइल्ड ट्रेक ऍडव्हेंचर 

Friday 14 July 2017

पायरी घाट-कोथळीगड-कौल्याच्या धारेची उतराई चढाई

    कौल्याच्या धारेवरून कोथळीगड,पदरगड,सिद्धगड अन भीमाशंकर     

दिवस १ -२० मे २०१७
साधारण महिन्याभरापूर्वी फेण्यादेवी घाटाची उतराई करताना कळकरायवाडीतून कोथळीगडाने दुरूनच दर्शन देऊन आमच्याकडेही या असं निमंत्रण दिल होत.आम्हीही नेहमीच्या मार्गाने कोथळीगड गाठता वाट वाकडी करून पायरी अन कौल्याच्या धारेने उतराई चढाई करायचं पक्कं केलं.रवी खोबरे (टॅंगो) अन शेखर (आण्णा) यांना शिफ्ट मध्ये बसवून आम्ही माळेगावकडे कूच केलं(सावळा गावाजवळील).वेळ संध्याकाळी:
      मुक्कामाच्या ठिकाणावरून दिसणारा ढाकचा किल्ला 

कलत्या सूर्यनारायणाबरोबर माळेगावात पोहोचलो.छोटयाश्या गावात असलेल्या भव्य मंदिरासमोर गाडी पार्क करून गावातल्या मंडळींबरोबर वाटाड्या अन उद्या करायच्या असलेल्या घाटवाटांची चर्चा सफल करण्यात आली.एक तरुण व्यक्तिमत्व वाटाड्या म्हणून यायला तयार झालं.थोडस पाणी बरोबर घेऊन गावासमोर असलेल्या टेकडीवर जाऊन मुक्कामाची जागा ठरवण्यात आली.खरंच अतिशय रम्य अशी जागा होती.आंध्रा धरणाच्या पाणी फुगवट्यामागे ढाकचा बहिरी दर्शन देत होता.थोडस सरपण गोळा करून चूल पेटवली.पूजाने चुलीचा ताबा घेत गरम जेवण बनवले.उद्याचा पल्ला मोठा असल्याने उद्या दुपारच्या जेवणासाठी अंडी उकडून घेण्यात आली.सर्व आवरून शाका भरून ठेवल्या.काजव्यांच्या झगमगाटात बरीचशी झाडे मधूनच उजळून निघत होती.पथाऱ्या पसरल्या अन स्लीपिंग बॅगमध्ये शिरलो.वेळ रात्री:.४५
            मुक्कामाची जागा अन सूर्यास्त

दिवस २: २१ मे २०१७
भल्या पहाटे ला उठून आन्हिकं उरकली. मॅग्गीचा अल्पोपहार करून इतर सामान गाडीत ठेवलं.काही अपरिहार्य कारणामुळे आमचे वाटाडे यांनी अचानक नाही जमणार म्हणल्यावर दिशांची अन डोंगररांगेच्या अभ्यासाची चाचणी घेण्यासाठी मस्त मोका मिळाला.काही खुणा लक्षात घेऊन आम्ही माळेगावच्या उत्तरेला असलेल्या छोट्याश्या टेकडीवरील मळलेल्या वाटेला लागलो.वेळ सकाळी:६.१५
एक ओढा अन काही घरटी गोठे पार केल्यावर एक बैलगाडी रस्ता आडवा आला.इथून समोर जाणारी वाट सोडून उजवी घेतली.वॉर्मअप चढ चढून माथा गाठला.इथून एक ठळक पायवाटेने उजवीकडे बैलघाट,कौल्याची धार,नाखिंदा घाट अन वांद्रे खिंडीकडे जाता येते.यासाठी सह्याद्रीच्या धारेपासून समांतर साधारण २५-३० फूट आतून पायवाटेने जावे.समोरच भव्य असे पायरीचे झाड दिसते म्हणून या घाटाला पायरी घाट म्हणतात.सह्यमाथ्यावरुन खाली उजव्या हाताला कोथळीगडाचा माथा ढगांच्या गर्दीतून उंचावलेला दिसला.बाकी ढगाळ वातावरणामुळे थोडी निराशाच झाली.वेळ सकाळी:.५०
          पायरी घाटातून दिसणारा कोथळीगड 
            पायरी घाटाची वाट 

लागलीच मोठ्या झाडापासून खाली उतरणारी ऐसपैस वाटेने उतराई सुरु केली.वाट अजूनही वापरात असल्यामुळे चुकण्याची शक्यता नाही अन कुठेही अवघड नाही.जंगलातून ३०-३५ मिनिटांत खालच्या पठारावर आलो अन बऱ्याच वेळानंतर सूर्यदर्शन झाले.पठारावरून डावीकडची वाट कळकरायवाडी घेऊन जाते.( तास)
              कोथळीगडाकडे वाटचाल 

उजवीकडे जाणाऱ्या पायवाटेने मिनिटांत एक सुंदर अशी प्राचीन बारव (चौकोनी विहीर) नजरेस पडते.पाणी अतिशय खराब असून पिण्यालायक नव्हते.पुढे वाटा फुटतात.उजवीकडची वाट हि बैलघाटाकडे जाते अन डावीकडे पेठ गावाकडे.आम्ही उजवी घेऊन बैलघाटाच्या सुरुवातीला जाऊन आलो.घाटाच्या सुरुवातीच्या आधीच डावीकडे वाट दाट जंगलात शिरली.पुढे भैरोबा देवस्थान गर्द जंगलात वसलेलं आहे.इथून आम्हाला परत पेठ गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागायचे होते.एक अस्पष्ट अशी पाऊलवाट शोधत डावीकडे (उत्तरेला) मिनिटं उतरत मगाशी सोडलेल्या वाटेला येऊन मिळालो.वेळ सकाळी:.१५
                 प्राचीन बारव 
                       भैरोबा देवस्थान

समोर कोथळीगडाचा माथा आता जवळ भासू लागतो.समोरच उंचावर पदारवाडीतील पवनचक्क्या अन परतीचा कौल्याच्या धारेचा मार्ग आता सोबती होता.खालच्या पठारावरून कोथळीगडाचा माथा समोर ठेऊन पदरातून सोपी अशी तासाभराची वाटचाल करत किल्ल्याच्या पदरात पोहोचलो.मागे दूरवर पायरी घाट,फेण्यादेवी घाटाचा डोंगर अन जंगल टप्पा अप्रतिम दिसतात.थोडासा चाऊ माऊ खाऊ खाऊन क्षणभर विश्रांती घेतली.
       क्षणभर विश्रांती.. समोर पायरी घाटाची वाट 
         कोथळीगडाजवळ पोहोचताना 

कोथळीगडाच्या उजव्या बाजूला दिसणारी खिंड समोर ठेऊन एक छोटासा चढाई टप्पा पार करत खिंडीत पोहोचलो.इथून पुढे सरळ पेठ गाव उजवीकडे कौल्याची धार अन डावीकडे कोथळीगडाकडे जाणारी वाट आहे(ही किल्ल्यावर जाणारी वाट किंचित अवघड श्रेणीची असून बराच घसारा आहे त्यामुळे गावातील सोप्या वाटेने कोथळीगड गाठावा तास).
    खिंडीतून डावीकडे कोथळीगडाला जाणारी थोडी अवघड वाट 

आम्ही चौघेच असल्याने आम्ही डावीकडची गडावर जाण्याची वाट धरली.छोटासा चढाई टप्पा चढल्यावर सुंदर असं दृश्य उघड झालं.साधारण ईशान्येला पदरगड (कलावंतीण महाल)उठावदार दिसतो.पदरगडाच्या डावीकडे सिद्धगडाचा बालेकिल्ला त्याच्या उंचीमुळे अन त्रिकोणी आकारामुळे सहज ओळखू येतो.पदरगडाच्या उजव्या बाजूला भव्य अन या रांगेतील सर्वात उंच असं भीमाशंकर,पूर्वेला खेतोबा मंदिर,वाजंत्री घाट,शिडी घाट नजरेस पडतात.आग्नेयेला नाखिंदा अन कौल्याची धार अन पदारवाडीतील पवनचक्क्या,मागे दक्षिणेला उतरून आलेलो पायरी घाटाची खिंड अन बैल घाट असा डोळे तृप्त करणारा परिसर दिसतो.उन्हाच्या वाढत्या चटक्याने पाय काढता घ्यावा लागला नाहीतर इथून हालायचीही इच्छा होऊ नये असंच ते दृश्य होत. पुढचा घसाऱ्याचा टप्पा अन पाय बसेल एवढ्याच वाटेने कसेबसे गवत काड्या पकडत बरोबर कोथळीगड सुळक्याच्या दक्षिणेला चढलो.अर्धवर्तुळाकार प्रदक्षिणा करत नेहमीच्या वाटेला लागलो.वेळ: सकाळी ११
    कोथळीगडाच्या माथ्यावरून दिसणारी कौल्याची धार अन पधारवाडीतील पवनचक्क्या

१५ मिनिटांत एका गुहेत पोहोचून क्षणभर विश्रांती झाली.समोर कौल्याची धार उन्हात रखरखीत वाटत होती.सुळक्याला वळसा घालत मुख्य गुहेजवळ पोहोचलो.भव्य अशी गुहा बघून थक्क व्हायला होत.त्याहीपेक्षा कोथळीगडाच्या माथ्यावर जाणाऱ्या पायऱ्या बघून हे बुवा कस केलं असेल असा विचार करत सुंदर अशा दरवाज्यातून सर्वोच्य ठिकाणी पोहोचलो.भन्नाट वारा अनुभवून लागलीच खालची गुहा गाठली.मस्तपैकी दुपारचे भोजन उरकण्यात आले.थंडगार पाणी पिऊन पुढच्या भटकंतीसाठी मंडळ तयार. वेळ दुपारी:१२.१५
                     कौल्याची धार 
                  कौल्याच्या धारेवरून पायरी घाट

धोपट मार्गाने पेठ गावात उतरून गावाच्या दक्षिणेकडे असलेल्या खिंडीकडे निघालो.१५ मिनिटात खिंड गाठून थोडा वेळ विश्रांती घेण्यात आली.कौल्याच्या धारेची सोंड या खिंडीपर्यंत उतरल्यामुळे वाट शोधणं अवघड नाही. खिंडीतून डावीकडे एक छोटासा वळसा घेत मुख्य सोंडेवर आरूढ झालो.पधारवाडीतील पवनचक्क्या उंचावर लक्षवेधक आहेत.टळटळीत उन्हाचा दाह भन्नाट वाऱ्यामुळे जाणवत नव्हता.उजवीकडे सकाळी उतरलेली पायरी घाटाची वाट दिसत राहते.पूर्ण वाट धारेवर असल्याने दोन्ही बाजूला दरी असून मधून मस्तपैकी पाऊलवाट आहे.२५ मिनिटांची तीव्र चढाई करून एका सोप्या कातळटप्प्याजवळ पोहोचलो.मागे कोथळीगड,पदरगड,भीमाशंकर अन सिद्धगडाच्या अप्रतिम दर्शनाने सुखावून गेलो.माथा गाठून विजयी मुद्रेत फोटोसेशन करण्यात आले.वेळ दुपारी:.३०
      पदरगड,भीमाशंकर अन सिद्धगड अप्रतिम दर्शन 
     भ्रमणमंडळ..शेखर आण्णा,रवी खोबरे (टॅंगो) अन पूजा 

इथून डावीकडे पवनचक्क्या उजवीकडे ठेवत पदरातून भीमाशंकर गाठता येते.( ते तास).ही वाट वांद्रे खिंडीतून आलेल्या वाटेल साधारण तासाभरात गाठते
     कौल्याची धार माथ्यावरून कोथळीगडाचा माथा 

आम्ही उजवीकडे तळपेवाडीकडे जाणाऱ्या वाटेने निघालो.इथून बऱ्याच ढोरवाटा वाट चुकवू पाहत होत्या आम्ही मात्र सह्याद्रीच्या धारेला  समांतर आत ३०-४० फुटावर असणाऱ्या पायवाटेने मार्गक्रमण करत होतो.साधारण तासाभरात एक वाट उजवीकडे खाली उतरते हि बैलघाटाची वाट असावी. 
समोर जाणारी वाट ही सकाळी केलेल्या पायरी घाटाकडे जाते.या वाटेने माळेगाव गाठावं कि तळपेवाडी यावर शुल्लक चर्चा झाली.जिपीएसमध्ये माळेगाव बरंच दूर दिसल्याने डावीकडे उतरणारा रस्त्याने तळपेवाडीकडे निघालो. ५ -१० मिनिटांच्या उतराई नंतर एक मोठा ओढा आडवा आला.पावसाळ्यात हा ओढा पार करण्यासाठी दोरी अन अनुभव आवश्यक.ओढा पार करून सपाटीला पोहोचलो अन तळपेवाडीकडे जाणारा बैलगाडी रस्ता लागला.मागे वळून पाहिलं तर  पधारवाडीतील पवनचक्क्या दूर पडल्या होत्या.थोडीशी करवंद पोटात ढकलून बैलगाडी रस्त्यावरून बैलासारखे हालत डुलत तळपेवाडीत पोहोचुन सकाळी ६ पासून सुरु केलेली १० तासांची डोंगरयात्रा सफल करण्यात आली. वेळ संध्याकाळी:५
शेखर अण्णांना एका दुचाकीवर बसवून माळेगावमधून गाडी आणण्यास पाठवण्यात आले. १५-२० मिनिटात परतीच्या मार्गाला लागलो.वाटेवर लागलेल्या धरणाच्या पाण्यात अंघोळ उरकून ६.३० ला गृहप्रवेश केला. 
           डोंगरयात्रेचा नकाशा 

या ट्रेकचा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 


महत्वाच्या नोंदी :
सुरवात : माळेगाव शेवट: तळपेवाडी 
मार्ग : माळेगाव-पायरी घाट-कोथळीगड-कौल्याची धार-तळपेवाडी
एकूण चढाई उतराई :९०१मीटर्स
एकूण अंतर:२२ किमी 
श्रेणी :मध्यम

चढाई उतराईतील टप्पे:
माळेगाव-६३६ मीटर्स--पायरी घाट सुरुवात-६६५ मीटर्स--खालील पठार-३७३ मीटर्स-कोथळीगड खिंड-४०६ मीटर्स-कोथळीगड माथा-६३५ मीटर्स 
कौल्याची धार माथा-७०९ मीटर्स--तळपेवाडी-६६८ मीटर्स (सर्वोच्च पॉईंट:७४७ मीटर्स)

नोट:आजकाल बरेच ट्रेकर मंडळी जीपीएस वापरतात .वरील दिलेली माहिती हि सह्याद्रीत ट्रेक करणाऱ्या अनुभवी ट्रेकर्स ना उपयोगी पडू शकते म्हणून देत आहे. 


प्रसन्न वाघ 
वाइल्ड ट्रेक ऍडव्हेंचर