Friday 16 June 2017

लिंग्या घाट-कुर्डूगड-निसणी घाटांची उतराई चढाई

                      कुर्डुगडावरील हनुमानाची मूर्ती  

दिवस १:२८ एप्रिल २०१७
कटाप्पा ने बाहुबलीला का मारलं? याच उत्तर शोधण्यासाठी बरीच जनता आजच प्रदर्शित झालेल्या बाहुबली २ सिनेमाच्या तिकिटासाठी अक्षरशः कसरत करत होती.आमचे भ्रमणमंडळ मात्र या सिनेमा पासून अलिप्त राहून आधीच ठरवलेल्या ३ दिवसाच्या डोंगरयात्रेसाठी रात्री १० ला शिवाजीनगरला पोहोचण्याचा तयारीला लागले होते.
मी अन पूजा तळेगाव मधून रात्रीची ९. १० ची लोकल पकडून १० ला शिवाजीनगरला पोहोचलो.महाराष्ट्र बँकेसमोर उर्वरित मंडळीबरोबर नमस्कार-चमक्तार करत आमचा प्रवास धामणहोळच्या दिशेने सुरु झाला. महाराष्ट्र दिनाची सुट्टी लागून आल्यामुळे ३ दिवस स्वछंद भटकंती करायला मिळणार म्ह्णून सारेच मंडळ खुश. यावेळी प्लॅन होता कुर्डूगड परिसरातील सहा घाटवाटा अन कुर्डूगड.रायगड अन कोकणदिवा पासून जवळच मोक्याचा जागेवर असणाऱ्या कुर्डुगडाचे अन या घाटवाटांचे पूर्वीच्या काळात अनन्यसाधारण महत्व असणार यात शंकाच नाही.
टेमघर धरणाची भिंत दिसल्यावर घाट रास्ता सुरु झाला अन लागलेला डोळा उघडला.अर्ध्या तासात लवासा सिटीचा झगमगाट दिसू लागला.एक दोन चेकपोस्ट पार करून पुढे निघालो.साधारण पहाटे १.३० ला खडखड करत एकदाच धामणहोळ ला पोहोचलो.गावाबाहेरच सुरवातीला सुंदर शाळा आहे अन पाण्याची सोयही.सामसूमपणे शाळेच्या आवारात पथाऱ्या पसरल्या अन त्वरित गुपचूप आडवे झालो.वेळ पहाटे:१.४५
रम्य सकाळ अन निद्रिस्थ भ्रमणमंडळ

 दिवस २:२९ एप्रिल २०१७
आजचा पल्ला जास्त मोठा नसल्यामुळे थोडं उशिराच डोळा उघडला.बघतो तर बाकीची मंडळी अजून स्लीपिंग बॅगमध्येच.मी,पूजा,निलेश अन योगिताने शाळेबाहेर असलेल्या चुलीचा ताबा घेत चहाला उकळी द्यायला सुरुवात केली.चहा बिस्कीट घेऊन निलेश अन प्रसाद गावात गेले ते पुढच्या अर्धा तासात श्री.शेडगे मामांना बरोबर घेऊनच आले.त्यांच्याकडेच रात्रीचे जेवण सांगून आम्ही लवासा बॉम्बे पॉईंट कडे चालू लागलो.वेळ: सकाळी ७.५०
 लवासा बॉम्बे पॉईंटकडे 
भर उन्हाळ्यात तुडुंब भरलेली विहीर
धामणहोळ गावाबाहेरून उजव्या बाजूला दूरवर लवासा बॉम्बे पॉईंट दिसतो त्या दिशेने जाणाऱ्या पायवाटेने किंवा बैलगाडी रस्त्याने साधारण १० मिनिटांत चविष्ट पाण्याची छोटीशी विहीर लागते.भर उन्हाळ्यात विहीर तुडुंब भरलेली पाहून आश्चर्य वाटले.कोरडा ओढा पार करताच एक वॉर्म अप चढ चढून लवासा बॉम्बे पॉईंट गाठला.वेळ :सकाळी ८.२५
इथून बराच मुलुख नजरेत भरतो.उजवीकडे खाली विळे MIDC,उंबर्डी गाव अन सह्याद्रीच्या माथ्यावरून उतरणारा सातनाळ घाट दिसतो.डाव्या बाजूला कुर्डूगडाचा ठेंगणा सुळका लक्ष वेधून घेतो.२-४ फोटो क्लिक करून काढता पाय घेतला.
लवासा बॉम्बे पॉईंटवरून दिसणार सुंदर दृश्य
निसणी घाटाची सुरवात मागे विळे MIDC 
लवासा बॉम्बे पॉईंटच्या अलीकडे देवाची मूर्ती आहे तिथून निसणीची वाट कुर्डूगडला जाते.येताना निसणीच्या वाटेने येऊ असं ठरवून आम्ही परत खाली येऊन कोरडा ओढा पार केला अन विजेच्या मोठ्या टॉवर जवळ आलो.इथून एक वाट उजवीकडे भुरट्या जंगलात शिरते.५-७ मिनिटांच्या चालीनंतर नळीच्या मुखाशी पोहोचलो. वेळ सकाळी:८.४५
प्रजेश अन दीपिका लिंग्या घाटाची वाट दाखवताना..मागे लवासा बॉम्बे पॉईंट 
सुरुवातीलाच एक सुळका समोर दिसतो याला लिंगोबा म्हणतात त्यामुळे या घाटाला लिंग्या घाट नाव पडले आहे. रचलेले दगड पाहता घाट चांगलाच बांधून काढलेला असावा याची जाणीव होते.थोडं खाली उतरल्यावर उजवीकडे एक भव्य गुहा दिसते.मुक्कामासाठी योग्य नसली तरी विसाव्यासाठी उत्तम.पावसाळ्यात इथे धबधब्यामुळे दृश्य खूपच विस्मयकारी असणार यात शंकाच नाही.
             लिंग्या घाटाची सुरवात
                             लिंग्या घाटातील भव्य गुहा
                    लिंग्या घाटातील सुळका
                              कुर्डुगडाकडे वाटचाल 
पुढे ५-१० मिनिटे खाली उतरल्यावर नळीची वाट सोडून डावीकडे जंगलात शिरलो.मस्त मळलेली पायवाट पूर्ण डोंगराला वळसा घालत लवासा बॉम्बे पॉईंटच्या बरोबर खालच्या पठारावर पोहोचते अन निसणीच्या वाटे मध्ये विलीन होते.(नाळ सोडल्यापासून साधारण अर्ध्या तासात निसणीच्या फाट्याला आपण पोहोचतो).इथून समोर २०-२५ मिनिटांच्या सोप्या चालीनंतर कुर्डूपेठेत दाखल झालो.कुर्डूपेठेत एका मावशींना वरण भाताची ऑर्डर देऊन कुर्डुगडाकडे कूच केलं.वेळ सकाळी :१०.३०
                             सुंदर कुर्डूपेठ 
               कुर्डाईदेवी मंदिर अन कुर्डूगड 
कुर्डाईदेवी मंदिरासमोरून ५ मिनिटाच्या छोट्याश्या चढाइनंतर स्वच्छ पाण्याचं टाक्याजवळ पोहोचलो.काही पायऱ्या चढून पडक्या दरवाज्यातुन किल्ल्यात प्रवेश केला.बारीकशी वाट आता सुळक्याचा डाव्या बाजूने वळसा घालून १० मिनिटात किल्ल्यावर असलेलया भव्य गुहेजवळ घेऊन जाते.गुहेसामोरून पुढे निघालो सह्याद्रीच्या मुख्य रांगेला चिटकून असलेल्या धारेला बुरुज बांधून सुरक्षित केलेलं आहे.उजवीकडे घसाराच्या वाटेने चढून कोकण खिडकीत पोहोचलो.भन्नाट वारा अंगावर घेऊन अन सह्याद्रीची भव्य भिंत बघून परत कुर्डूपेठेत दाखल झालो. वेळ दुपारी:१२.१५
             कुर्डुगडाचा दरवाजा..मागे तेल्याची नाळ 
              कुर्डुगडावरील गुहेकडे जाणारी वाट
                      कुर्डुगडावरील भव्य गुहा
          कोकण खिडकीकडे जाणारी वाट
                                           कोकण खिडकी
गरम गरम वरण भातावर हात आडवा करून कुर्डाईदेवीच्या मंदिराशेजारी असलेल्या डेरेदार वृक्षाखाली वामकुक्षी घेण्यात आली.काही वेळानंतर शेडगे मामा त्यांच्या नातेवाईकांबरोबर वार्तालाभ करून आले अन आम्ही परतीचा मार्ग धरला.वेळ दुपारी:२.१५
कुर्डूपेठेतून चीपेचं दाराने सह्याद्रीमाथा गाठून रेडेखिंड मार्गे दापसरे गाठता येईल (४.५ तास) किंवा चीपेचं दार चढून पठारावर पोहोचल्यावर १० मिनिटांनी दापसरेची वाट सोडून डावीकडे जंगलातून खाली उतरत धामणहोळ गाठता येईल (२.५ तास)
१५-२० मिनिटाच्या मवाळ चालीनंतर सकाळी आलेलो लिंग्याघाटाची वाट सोडून उजवीकडे जंगलात शिरणारी निसणीची वाट धरली.निसणीची वाट अजूनही बऱ्यापैकी वापरात आहे.पहिला झाडीभरला टप्पा पार करून क्षणभर विश्रांती घेतली.पुढचा टप्पा पूर्णपणे उन्हातून चढून माथा गाठला.वेळ दुपारी:३.३०
         लिंग्या घाट निसणी घाट जंकशन..उजवीकडे निसणी घाट  सरळ लिंग्या घाट 
                                         निसणी घाट
                     धामणहोळ गावाबाहेर असलेलं मंदिर 

सकाळी आलेल्या वाटेने धामणहोळ कडे कूच केलं.वाटेत असंख्य करवंद पोटात ढकलून धामणहोळ गावापासून बाहेर असणाऱ्या मंदिरात पोहोचलो.जवळच असलेल्या पाण्याच्या डोहात डुबुक डुबुक करून आलो.आजचा मुक्काम मंदिराच्या पटांगणात करायचं असल्यामुळे बराच वेळ आराम मिळाला.रात्री ७.३० ला धामणहोळात जाऊन पिठलं-तांदळाची भाकरी अन भात सर्वानी चोपून हाणला.गावकऱ्यांशी मनसोक्त गप्पा मारून दुसऱ्या दिवसासाठी वाटाड्या ठरवून मंदिरात परतलो.पथाऱ्या पसरल्या अन स्लीपिंग बॅग मध्ये आडवे झालो.चांगलाच गारठा अन रम्य परिसरामुळे कधी झोप लागली कळलंच नाही. 

या पूर्ण ट्रेकचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 


          ट्रेकचा नकाशा ..निलेश वाघ च्या सौजन्याने  

या ट्रेकचा उत्तरार्ध इथे वाचा

महत्वाच्या नोंदी :
सुरवात : धामणहोळ  शेवट : धामणहोळ
मार्ग : धामणहोळ-लिंग्या घाट-कुर्डूपेठ-निसणी घाट-लवासा बॉम्बे पॉईंट-धामणहोळ
एकूण चढाई उतराई :४९०मीटर्स 
श्रेणी :सोपी 

चढाई उतराईतील टप्पे:

लिंग्या  घाट :
धामणहोळ:६२५ मीटर्स ---लिंग्या घाट सुरुवात:५९५मीटर्स ---कुर्डूपेठ:४७०--कुर्डूगड कोकण खिडकी--५२५ मीटर्स=एकूण २१० मीटर्स 

निसणी घाट :
कुर्डूगड कोकण खिडकी:५२५ मीटर्स ---कुर्डूपेठ:४७० मीटर्स-लवासा बॉम्बे पॉईंट(निसणी घाट माथा)-६७० मीटर्स--धामणहोळ:६२५ मीटर्स =एकूण २८० मीटर्स 

नोट:आजकाल बरेच ट्रेकर मंडळी जीपीएस वापरतात .वरील दिलेली माहिती हि सह्याद्रीत ट्रेक करणाऱ्या अनुभवी ट्रेकर्स ना उपयोगी पडू शकते म्हणून देत आहे

प्रसन्न वाघ 
वाइल्ड ट्रेक ऍडव्हेंचर 





8 comments:

  1. खूपच छान माहिती आणि प्रवास वर्णन !!!

    ReplyDelete
  2. खूप सुंदर ब्लॉग. नेमकी योग्य माहिती . आवडला ब्लॉग.

    ReplyDelete
  3. Lingya Ghat Gpx File - https://drive.google.com/file/d/1xyiwI_tiF0djerKZ4atMZ_1ONEEc2FGL/view?usp=sharing

    Nisani Ghat Gpx File - https://drive.google.com/open?id=1xyiwI_tiF0djerKZ4atMZ_1ONEEc2FGL

    ReplyDelete
  4. Khup Chan mahiti

    ReplyDelete
  5. खूप छान !!

    ReplyDelete