Friday 2 June 2017

फेण्यादेवी -कुसूर घाटवाटांची उतराई चढाई

     रम्य संध्याकाळ..उजवीकडे फेण्यादेवी घाटाची सुरवात 

दिवस १५ एप्रिल २०१७
प्रसाद अन योगिताच्या शुभमंगल सावधानमुळे २ महिने पायगाडीला विश्रांती मिळाली होती अन तशी ती गरजेचीपण होती.गेले कित्येक महिने नॉनस्टॉप ट्रेक्स सुरु होते त्यामुळे एकुणंच आधी लगीन प्रसाद योगिताच असं ठरवून डोंगरयात्रांना स्वल्प विराम दिला होता.चांगल्या २ महिन्यांचा ब्रेअकनंतर प्रसादने फेण्यादेवी अन कुसूर घाटांचा मनसुबा रचला आणि सर्वानुमते हे कार्य सिद्धीस न्यायचे ठरले.ठरल्याप्रमाणे बस दुपारी ४ ला पुण्यातले पिकअप करून तळेगावला पोहचली अन बस मधल्या ६ टाळक्यांच्या समूहात माझी अन पूजाची भर पडली.१० मिनिटातच कान्हे फाट्यावरून उजवीकडे वळून आम्ही सावळा गावाला जाणारा रस्ता धरला.
टाकवे  गाव सोडल्यानंतर २ रस्ते सावळा ला जातात.१.कुसूर-खांडी मार्गे २ भोयरे-कुणेगाव मार्गे (हा रस्ता चांगला स्थितीत आहे फक्त ५ किमी अंतर जास्त).आम्ही कुसूर मार्ग पकडून बरोबर संध्याकाळी ६. १५ ला सावळा गावात प्रवेश केला.लागलीच बस पार्क करून फेण्यादेवी घाटाचा अन मुक्कामाच्या जागेचा शोध घेण्यास निघालो.गावातली पोर रानात खेळत होती त्यांना विचारून १० व्या मिनिटाला फेण्यादेवी घाटाच्या तोंडाला पोहोचलो.घाटाच्या डाव्या बाजूलाच मस्त डोंगर कड्यावर सपाट मोकळं रान बघून हीच मुक्कामाला योग्य जागा असं ठराव करून परत सावळा गावात आलो.गावकऱ्यांना थोडीशी माहिती विचारून गावातून पाणी अन आपापल्या सॅक उचलून मुक्कामाच्या जागी पोहोचलो.
                                 मुक्कामाची जागा 
लागलीच महिला मंडळ जेवणाच्या तयारीला लागले दगड गोळा करून चूल मांडण्यात आली.पिठलं भात शिजू लागले.मस्तपैकी सूर्यास्त अनुभवत आम्ही डोंगरकड्यावरून कोकण दर्शन घेऊन आलो.खाली पिंपळपाडा अन मालेगाव फारच मोहक वाटत होते खरंच कितीदा हा सूर्यास्त बघितला असेल पण दरवेळी त्याची मजाच वेगळी.
गरम गरम पिठलं भात अन घरून आणलेला शिधा खाऊन तृप्त झालो.लागलीच आवरा आवर करून कॅरीमॅट पसरल्या गेल्या.उद्या सकाळी ५.३० वेक अप कॉल ठरवून स्लीपींग बॅग मध्ये शिरलो.वेळ :९. ४५
                              भोजन कार्यक्रम                                                               
दिवस -१६ एप्रिल २०१७
नेहमीप्रमाणे निलेश वाघ च्या आवाजाने जाग आली.हा माणूस जेव्हा ट्रेकला असतो तेव्हा अलार्म वगैरे लावायची गरज पडत नाही फक्त वेळ सांगा त्यावेळेला हा गडी तयार.चहा मॅग्गी घेऊन सकाळी ७ ला आम्ही फेण्यादेवी च्या घाट उतरायला सुरवात केली.
वाट बऱ्यापैकी वापरात असल्यामुळे ऐसपैस अन ठळक आहे त्यामुळे चुकण्याची शक्यता कमीच.पुढच्या २ मिनिटात डाव्या बाजूला फेण्यादेवीच ठाण आहे त्याला दंडवत करून मळलेल्या वाटेने मार्गक्रमण चालू केले.लगेचच वाट नाळ सोडून उजवीकडे वळते या वाटेनं साधारण १५ मिनिटात आपण सपाटीवर पोहोचतो.इथून पुढे २० मिनटे चालल्यावर आपण कळकराई वाडीत पोहोचतो.(वाटेत डाव्या बाजूला एक विहीर आहे).इथून उजवीकडे कोथळीगड/पेठचा किल्ला फार जवळ वाटतो(३ तास).कोथळीगड करून कौल्याचा धारेने देशावरील तळपेवाडी किंवा माळेगाव ला३ तासात पोहोचता येते.फेण्यादेवी घाट-कळकरायवाडी-पायरी घाट  किंवा बैल घाट करून परत माळेगाव/सावळा गाठता येईल(५ तास)
                             फेण्यादेवी घाटाची सुरवात
                             फेण्यादेवी देवस्थान 
      घाट सरु केल्यानंतर इथून वाट उजवीकडे वळते
     ३० मिनिटांच्या उतराईनंतर लागणारे सुंदर जंगल
कळकरायवाडीतून थोडं पाणी पिऊन सरळ माळेगावला जाणारी वाट धरली.१० मिनटात बैलगाडी रस्ता सोडून डावीकडे जाणारी पायवाटेने खालचे पठार उतरायला सुरवात केली.३० मिनिटातच हि वाट आपल्याला माळेगावमध्ये नेते.माळेगांव मधून कशेळे ला जायला वाहन असेल तर ठीक नाहीतर पिंपळपाडा इथून पुढे १० मिनिटांच्या अंतरांवर आहे.आमची पायगाडी आता पिंपळपाडा मार्गाला लागली.मागे फेण्यादेवीचा घाट फारच सुंदर दिसत होता.पिंपळपाडामध्ये पोहचून भिवपुरीसाठी एक सिक्स सीटर ठरवली अन फ्रेश झालो.वेळ सकाळी:१०
                      कळकरायवाडीतुन दिसणारा कोथळीगड 
       माळेगाव  मधून दिसणारी फेण्यादेवी घाटाची खिंड
१०.१५ ला भिवपुरीकडे प्रवास सुरु झाला.अर्ध्या तासानंतर कशेळेला पोहोचलो.सर्वानुमते वडापाव साठी छोटा ब्रेक घ्यायचे ठरले.दुपारी जेवणासाठी ब्रेक होणार नाही याची जाणीव प्रत्येकाला असल्याने २-३ वडापाव पोटात ढकलण्यात आले(तसा वडापाव फारच टेस्टी होता).परत प्रवास सुरु झाला अन ११.१५ च्या सुमारास आमचे भिवपुरीत आगमन झाले.भिवपुरीत एन्ट्री केल्या केल्या डावीकडे एक प्रेक्षणीय तलाव आपलं लक्ष वेधून घेतो.१५ मिनिटे फोटोग्राफी करून कोणी वाटाड्या मिळतोय कायाची चोकशी करण्यात आली.वाट एकच मळलेली आहे अस कळालं अन वाटाड्याही काही मिळेना मग विना वाटाड्याचं चढाई सुरुवात करायचं ठरलं.वेळ सकाळी :११.
    कुसूर घाटाची सोंड भिवपुरी गावातून सहज ओळखू येते 
भिवपुरीत असेल्या दळवी फार्म हाऊसमध्ये फेरफटका मारून पाणी भरून घेतले.या फार्म हाऊसच्या उजव्या बाजूने जाणारा रास्ता पकडला.५ मिनिटातच कुसूर घाटाचा उभा चढ सुरु झाला.१५ मिनिटातच झाडीभरला टप्पा पार करून उघड्या बोडक्या पठारावर पोहोचलो.इथून पुढचा टप्पा पूर्णपणे उन्हातच न्हाऊन निघाला होता.वाटेवर शोधूनही विसाव्याला झाड सापडेना त्यात एप्रिल महिन्यातील ऊन.चांगलीच दमछाक होणार अन करपून निघणार असं वाटत असताना ३० मिनिटांनी एक झाड सापडलं.विश्रांतीसाठी आदर्श असं झाड बघून १५-२० मिनिटे आराम करण्याचं ठरलं.भर उन्हात भटकंती करताना अशी विश्रांती फार गरजेची असते असं माझं मत आहे.वेळ:दुपारचे १
      कुसूर घाटातून दिसणारे पाईप्स
पाणी,ताक पिऊन अन आराम करून थोड्या वेळाने शरीर मस्त थंड झाले.आलेला थकवा पळाला अन पुन्हा चढाई सुरु झाली.इथून पुढे २० मिनिटावर मुख्य पायवाटेपासून डावीकडे थोड्या अंतरावर पाण्याची टाकी लागतात.ह्या टाक्या काही वर्षांपूर्वी साफ केलेली असल्याने पाणी पिण्यायोग्य आहे.इथून पुढची वाट अजून तीव्र चढाईची आहे.२०मिनिटात आपण एका पठारावर पोहोचतो.इथे पोहोचल्यावर येणारी वाऱ्याची झुळूक आपण माथ्यावर पोहोचत आहोत याची जाणीव करून देते.पठार चांगले ऐसपैस आहे.
    कुसूर घाटातले शेवटचे पठार..समोर शिडीची वाट
          कुसूर घाटातली शिडी 
पठारावरून समोर कुसूर घाटाचा शेवट दिसतो.इथून पुढे उजवीकडे दांडावरून चढाई करून शिडीच्या वाटेने कुसूरला पोहोचता येते तसेच डावीकडची वाट सौम्य चढाईने फिरून कुसूरला पोहोचते.आम्ही शिडीच्या वाटेला लागलो अन पुढच्या १० मिनिटामध्ये शिडीजवळ पोहोचलो.शिडी लाकडी असून थोडी कमकुवत वाटते.थोडं जपूनच वर चढलो.एक सोपा कातळटप्पा पार करून माथा गाठला.वेळ:दुपारी २. ३०
    कुसूर घाट शेवटचा टप्पा ..मागे हिरवागार भिवपुरी परिसर          
मस्त वारा सुटला होता खाली भिवपुरी अन भिवपुरीतला तलाव फारच सुंदर दिसत होते.इथून टाटा प्रोजेक्टच्या पाईप्स बघितल्यावर आश्चर्य वाटते.एवढ्या मोठ्या पाईप्स अशा भागात बसवून भिवपुरीचा पूर्ण भाग समृद्ध झाला आहे.माथ्यावरून कडक उन्हातही भिवपुरी परिसर हिरवागार दिसत होता.माथ्यावरून डावीकडे ढाक किल्ल्याच भव्य पठार दिसत होत.भव्य नजारा डोळ्यात साठवून एक ग्रुप फोटो काढण्यात आला.विजयी मुद्रा घेऊन कुसूर गावाच्या वाटेला लागलो.कुसूरला पोहोचायला १५ मिनिटे लागले.
    डावीकडून प्रसाद योगिता तुषार निलेश प्रसन्न प्रजेश पूजा.
       ही वाट दूर जाते..कुसूर गावाकडे 
आमची बस आमची वाट पाहत होतीच.लागलीच सर्व जण स्थानापन्न होऊन परतीचा प्रवास सुरु केला.परतीच्या प्रवासात थोडस थांबुन धरणाच्या पाण्यात अंघोळी करण्याचा मोह निलेश अन तुषारला आवरेना.उन्हात दिवसभर करपल्यामुळे त्यांनाही १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला.आवरा आवर करून तळेगाव ५ ला पोहोचलो.
अजून २ घाटवाटा ज्या अजूनही बऱ्यापैकी वापरात आहेत यांची चढाई उतराई करून मनाला वेगळंच समाधान मिळालं होत.

महत्वाच्या नोंदी 
सुरवात:सावळा शेवट : कुसूर 
मार्ग:सावळा-फेण्यादेवी घाट-कळकराई वाडी-माळेगाव-पिंपळपाडा-कशेळे-भिवपुरी -कुसूर घाट -कुसूर(पिंपळपाडा-कशेळे-भिवपुरी वाहनाने)
एकूण चढाई उतराई :११०५ मीटर्स 
श्रेणी:सोपी
फेण्यादेवी ते पिंपळपाडा : २ तास 
भिवपुरी ते कुसूर : २. ५ तास 

चढाई उतराईतील टप्पे:

फेण्यादेवी घाट:
सावळा गाव:७०० मीटर्स ---कळकराई वाडी:४४० मीटर्स---पिंपळपाडा:१६५ मीटर्स=
एकूण ५३५ मीटर्स 


कुसूर घाट:
भिवपुरी:१४५ मीटर्स---कुसूर घाट:७१५ मीटर्स=
एकूण ५७० मीटर्स 


नोट:आजकाल बरेच ट्रेकर मंडळी जीपीएस वापरतात .वरील दिलेली माहिती हि सह्याद्रीत ट्रेक करणाऱ्या अनुभवी ट्रेकर्स ना उपयोगी पडू शकते म्हणून देत आहे. 
                 नकाशा ..निलेश वाघ याच्या सौजन्याने 

प्रसन्न वाघ 
वाईल्ड ट्रेक ऍडव्हेंचर 

18 comments:

  1. मस्त लिहिलंय भावा 👌

    ReplyDelete
  2. छान लिहिलयस... ��

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. भारीच...

    आता तु लेखक पण झालास...

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर व सहजरीत्या केलेल ट्रेक ॉवर्णन.अश्या अनोळखी घाटवाटा पालथ्या घालण्यात वेगळाच आनंद असतो.छान.

    ReplyDelete
  6. मागच्या आठवड्यात कुसुरला जायचं प्रयटणा केला होता.भिवपुरितून सुरुवात केली.पण करावी ववझाडांमुळे वर वाट चुकलो.परत खाली उतरून आलो.वाईट वाटलं.

    ReplyDelete
    Replies
    1. Vat changli malaleli ahe ..mala watat tumchi suruwat chukli asavi

      Delete
  7. Dnyaneshwar khade17 December 2019 at 09:46

    सर मी भिवपुरीगावातुन सुरुवात केली.वाट स्पष्ट होती. कुठेच सोडली नाही.वरपर्यंत वाट बरोबर गेली.नंतर ती एके ठिकाणी तुटली व गर्द झाडीचा टप्पा लागला.त्यात कुठेतरी हरवली.खुप शोधण्याचा प्रयत्न केला.दाट कारवी व गर्दझाडी वाढली होती.mनिशानीही दिसली.भगवा झंडाही दिसली पण वाट झरयात हरवली.त्यामुळे नाईलाजे परत
    फिरलो.वाटेवर गोळया,वेफरची वेष्टण होती त्यामुळे कुणीतरी गेलं असणार.जिथुन डावीकडे पाइपलाइन स्पष्ट दिसते त्या पट्टयात वाट हरवली.

    ReplyDelete
  8. ह्या रविवारी कांडी घाट चढाई व कुसुरघाट सुखरुपपणे उतरलो.सोबत कांब्रेच्या लेण्या ही पाहिल्या.पाण्याच्या चार टाक्याही पाहायला मिळाल्या.मागच्यावेळेस वाट चढताना जिथे चुकलो ते डाव वळणही लक्षात आलं.छान अनुभव आला घाट उतरताना.

    ReplyDelete