Sunday 11 June 2017

डोणीदार(त्रिगुणधारा/तिरंगी घाट)-अहुपे घाटाची उतराई चढाई

                         डोणीदार(त्रिगुणधारा/तिरंगी घाट)

दिवस १ -२२ एप्रिल २०१७
मागच्याच आठवड्यात फेण्यादेवी अन कुसूर घाट उरकून चांगलाच वॉर्म अप झाला होता.प्रसादने डोणीदार/त्रिगुणधारा/तिरंगी घाट-अहुपे घाटाचा प्लॅन पुढ्यात ठेवला.नोव्हेंबर २०१६ मध्ये जेव्हा खुट्याच दार केला होता तेव्हाच डोणीदाराच्या दर्शनाने हा लवकरच करायचा हे पक्क केलं होत.कोण कोण येणार याची बेरीज वजाबाकी करता करता शेवटी ४ च मावळे शिल्लक राहिलो त्यामुळे घरची स्विफ्ट काढून जायचा निर्णय तडक घेण्यात आला ,म्हणजे ट्रेक बरोबर ड्रायविंग करायची हि जबाबदारी खांद्यावर पडली.
    डोंगराच्या कुशीतलं देखणं डोणी गाव,समोर दुर्ग ढाकोबा
गाडीत इंधन भरून ठरल्याप्रमाणे मी अन प्रसाद दुपारी २ ला नाशिक फाट्याला पोहोचलो.१० मिनिटांत प्रजेश अन निलेश च्या शाका गाडीत भरून राजगुरूनगर च्या मार्गाला लागलो.आमचं आजच लक्ष डोणी गावात जाऊन पाहणी करून मुक्काम करायचं होत.डोणीला पुण्यातून जायचे मार्ग २.एक राजगुरुनगर मधून अन एक पेठ/मंचर मधून.आम्ही जाताना एक अन येताना एक असा प्रयोग करायचं ठरवलं अन तितेच डाव फसला .राजगुरूनगर-भोरगिरी मार्गाला लागलो.(वेळ दुपारी ३).शिरगाव पासून उजवीकडे तळेघरचा रस्ता धरला.तळेघर पासून पुढे डिंभे-अहुपे रस्त्याला लागेपर्यंत घाटरस्ता अन खड्डे यांनी खरंच परीक्षा बघितली.डिंभे-अहुपे रस्त्याला लागल्यावर कुठे जीवात जीव आला.इथून तिरपाड मार्गे फारतर १५ मिनिटांत डोणी फाटा लागला(वेळ: संध्याकाळी ६).उजवीकडे समोरच दुर्ग अन ढाकोबा दर्शनाने तृप्त झालो.थोडं डावीकडे खाली डोणीचं दार स्पष्ट दिसत होत.माडाची नाळ मात्र बाजूच्या डोंगरापलीकडे असल्यामुळे दिसत नाही.मावळतीला जाणारा सूर्यनारायण,डोंगराच्या कुशीत वसलेलं देखणं डोणी गाव,डावीकडे दिसणारी सह्याद्रीची धार अन समोर दुर्ग ढाकोबा!!एकूणच दृश्य एक नंबर.
                          डोणीदार घाट
डोणी मध्ये एन्ट्री केल्या केल्या शाळा लागते.तिथे चोकशी केल्यावर समजलं डोणीदार घाटाची सुरुवात पुढच्या वाडीतून होते.पुढच्या काही मिनिटांत डोणी च्या पुढच्या वाडीत पोहोचलो.सूर्यास्त व्हायला अजून साधारण तासभर शिल्लक होता अन आम्हाला पोशीची नाळ अन डोणी दाराच दर्शन सह्याद्रीच्या धारेवरून घ्यायचं होत. लागलीच डोणी-दुर्ग-हातवीजच्या कच्या रस्त्याला लागलो अन बऱ्याच खराब रस्त्याने ३-४ किमी अंतर पार करून सह्यामाथ्यावर पोहोचलो.इथून जी सह्याद्रीची खोली दिसते ती फार क्वचित ठिकाणी पाहायला मिळते.या माथ्यावरून उजवीकडे पोशीची नाळ मध्ये डोणीचं दार अन सर्वात डावीकडे माडाची नाळ आहे.रोद्र अशी पोशीची नाळेच जवळून दर्शन फारच थरारक वाटते.पोशीची/माडाची नाळेने आता चढाई उतराई करता येत नाही.ह्या वाटा बऱ्याच वर्षांपासून वापरात नाहीत त्यामुळे धोपट वाट अशी नाहीच.इथून पुढे २ तास चालून दुर्ग किल्याला पोहोचता येते.दुर्गपासून खुट्याच्या दाराने रामपूर गाठता येईल (३ तास) किंवा ढाकोबा करून दाऱ्या घाटाने पळू गाठता येईल (७ ते ८ तास).या भागातल्या सर्व घाटवाटांचे विशेष म्हणजे ८००-९०० मीटर्स ची चढाई उतराई.
                  रोद्र अशी पोशीची नाळ 
बरोबर सूर्यास्त बघून डोणी मध्ये परत आलो.आता मुक्कामाची जागा अन उद्यासाठी वाटाड्याची चौकशी सुरु केली.काही वेळातच श्री.गवारी मामा यांनी होकार दिला अन त्यांच्याच घरासमोर अंगणात पथाऱ्या पसरण्याचा आग्रह केला.असं सुंदर घर अन अंगण पाहून आम्हीही त्यांना नाही म्हणू शकलो नाही.ऐन उन्हाळ्यात गुलाबी थंडीचा अनुभव घेत आम्ही जेवण उरकली.त्या प्रसन्न वातावरणात काही क्षणातच निद्रिस्त झालो.
                   श्री.गवारी मामा यांचे सुंदर घर 
                          चुलीवरचे जेवण 

दिवस २ -२३ एप्रिल २०१७

नेहमीप्रमाणे निलेश वाघ सकाळी ५ लाच तयार.सकाळची आन्हिकं उरकून चहा घेतला.प्रजेश भाऊंचा काही खाल्ल्याशिवाय ट्रेकचा नारळ फुटत नाही म्हणून त्यांना मॅगी करून देण्यात आली.आवरा आवर करून शाका गाडीत भरून अंगणात पार्क करून ठेवली अन सकाळी ५.४५ ला डोणीच्या दाराकडे प्रस्थान केले.
                डोणीदाराची सुरुवात 
डोणीच्या पुढच्या वाडीतून वाट लगेच डावीकडे उताराला लागते.५ मिनिटात मुख्य वाट सोडून डावीकडे त्रिगुणधारा चा झरा आहे या मुळे डोणीच्या दाराला त्रिगुणधारा घाट असंही म्हणतात.मस्त मळलेली वाट नाळेतून उतरते.या अवघड ठिकाणी सोपी वळणावळणाची छानपैकी वाट बांधणाऱ्याच कौतुक करावे तेवढं कमीच.ऐन उन्हाळ्यात ढग दाटून आल्यामुळे उतराई फारच सुखकारक वाटत होती.डोणीतून एका कुत्र्याच्या पिल्लाने आमच्या बरोबर निर्धार केला. तसे बऱ्याचदा सह्याद्रीत वावरताना एखाद कुत्र आपल्या सोबतीला येतच पण इथे कुत्र्याचं पिल्लू आल्याने थोडी पंचाईतच झाली. सुरवाती पासून हा गडी ट्रेक करणार असे वाटत असतानाच नाळेत पोहोचताच याने पलटी मारली अन जागीच कींव कींव करत बसला.काय करावे सुचेना तेव्हा निलेश वाघ या प्राणी मित्राने त्याला लहान बाळासारखे कंबरेवर घेऊन प्रवास सुरु केला.कुत्र्याला हि हा प्रवास आवडला अन त्याने शांत बसत जागीच पडी  मारली (झोपी गेला).
               प्राणीमित्र निलेश वाघ 
साधारण १ तासानंतर बरेच मोठं मोठाले खडक (बोल्डर्स)उतरल्यावर डावीकडे एक गुहेसारखी जागा आहे. विसाव्यासाठी उत्तम.बाकी पूर्ण घाटवाट हि नळीच त्यामुळे कधी डावीकडे तर कधी उजवीकडे उतरत राहते. बराच वेळ उतरून सुद्धा अजून बरीच खोली दिसत राहते.
                  धुक्याची चादर अन डोणीदार घाट 
              विसाव्यासाठी जागा अन मोठे बोल्डर्स 
              डोणीदार घाटातील एकमेव स्क्री टप्पा 
डोणी पासून साधारण २ तासात आपण खालच्या पठारावर जंगलात पोहोचतो.इथून पुढे थोड्याच वेळात पाण्याची छोटीशी विहीर लागते (पाणी पिण्यालायक वाटले नाही).आता मोकळ पठार सुरु होत अन मागे उंचच उंच सह्याद्रीची रांग पाहून डोळे विस्फारून गेले.या पठारावरून डावीकडे पोशीची नाळ मध्ये डोणीदार अन उजवीकडे माडाची नाळ असं सुंदर दृश्य दिसत.वेळ सकाळी ८. १५
    पठारावरून डावीकडे पोशीची नाळ मध्ये डोणीदार,उजवीकडे माडाची नाळ

छोटस पठार उतरून वाघाची वाडी/मढवाडीमार्गे मढ ला पोहोचलो तेव्हा ९.१५ वाजले होते.इथे कुत्र्याच्या पिल्लाला वाडीत एका कुटुंबाकडे सोपवून आम्ही पुढचा मार्ग धरला.इथून आम्हाला धसईला जायचं होत (४ किमी).मामांनी सांगितल्याप्रमाणे  रामपूर ते धसई ला वाहन चालूच असतात त्यामुळे येणाऱ्या वाहनांची वाट बघत शेजारच्या दुकानातून ३-४ पेप्सी (१ रुपये ची)अन थम्प्स अप पोटात ढकलून पोटोबा थंड केला.बऱ्याच वेळ वाट बघून सुद्धा येणाऱ्या सर्व गाड्या खचाखच भरूनच येत होत्या.शेवटी १०. १५ वाजता सर्वानुमते पायगाडीने धसई ला निघालो अन ११.१५ ला धसई ला पोहोचलो.
   धसई कडे वाटचाल..मागे डोणीदार अन उत्तुंग सह्याद्रीची रांग 
नेहमीप्रमाणे वडापाव वर उड्या पडल्या. लिंबू सरबत रिचवून धसई ते म्हसा  जाणाऱ्या काळ्यापिवळ्या गाडीत कसेबसे बूड टेकवले.पुढच्या २०-२५ मिनिटात  दुपारी १२ च्या टळटळीत उन्हात खोपिवली फाट्याला उतरलो.समोर अहुपे घाट-गोरख मछिंद्रगडाच्या दर्शनाने धन्य होऊन पावले खोपिवली कडे वळवली.
               खोपिवली तुन अहुपे घाटाचे दर्शन
                        गोरख-मछिंद्रगड दर्शन 
गावात जाऊन पाणी भरून घेऊ असा नेहमीचा प्लॅन पहिल्या घरात पाणी देता का विचारताच सपशेल फसला.आजीने सरळ पाणी नाही आम्हालाच विकत घ्यावे लागते असा समज दिल्यावर भर उन्हात अहुप्याचा घाट चढायचा कसा असा सर्वांचा चेहरा झाला.दुसऱ्या घरात विचारल्यावर एक बाटली भरून मिळाली.आम्ही चौघांनी कशातरी ४ बॉटल्स भरून घेतल्या अन अहुपेच्या वाटेल लागलो.(अहुपे घाटात पिण्याचे पाणी भर उन्हाळ्यात पण मिळते पण हे टाक २ तास चढाई केल्यावर येत त्यामुळे थोडं पाणी ठेवणं उत्तम) खोपिवलीतून वाट उत्तम मळलेली आहे त्यामुळे चुकण्याची शक्यता नाही.पहिले ३०-४० मिनिटे वाट शेताडातून जाते.भर उन्हात चढाई करण्याआधी थोडा आराम करण्यासाठी झाड शोधून १५-२० मिनिटे वामकुक्षी घेण्यात आली.
दुपारी १.३० ला एक सुकलेला ओढा क्रॉस करून चढाईला लागलो.वाट फारच प्रशस्त आहे.यावेळी प्रजेशने नवीनच प्रयोग केला ऊन खूप लागतंय म्हणून गड्याने छत्री च काढली.पहिले ३०-४० मिनिटे चांगले उन्हात चढाई केल्यावर जंगलटप्पा लागला अन सुटकेचा निःश्वास टाकला.पुढे तासाभरात पाण्याच्या टाक्याजवळ पोहोचलो.खूपच चविष्ट असं थंड पाणी पिऊन शरीर थंड केलं.इथून पुढे बऱ्यापैकी पायऱ्या वाटेवर बघायला मिळतात.अजून पुढे ५-१० मिनिटे वर चढून आल्यावर उजव्या अंगाला २ सुंदर टाकी दगडात कोरलेल्या दिसल्या.या टाक्यापासून फारतर ४०-४५ मिनिटांत अहुपे माथ्यावर पोहोचलो.खाली गोरख-मछिंद्रगड बुटके वाटतात.वेळ दुपारी ४
                       थंडगार चविष्ट पाण्याचे टाके
         ऐसपैस बांधून काढलेली अहुपे घाटाची वाट 
            कातळात कोरलेल्या टाक्या 
                  अहुपे घाटाच्या माथ्यावर 
                   गोरख-मछिंद्रगड दर्शन                घाटाच्या माथ्यावर अहुपे गाव                अहुपे गावाच्या वेशीवरील देवराई
अहुपे मधून भट्टीच्या रान -गवांदेवाडी-कोंढवळ मार्गे भीमाशंकर गाठता येईल (५ ते ६ तास) किंवा भट्टीच रान-दमदम्या-सिद्धगड/गायदरा घाटाने सिद्धगड करून नारिवलीस उतरता येईल यासाठी १ दिवस ठेवावा लागेल.
अहुपे गाव फार सुंदर ठिकाणी वसलेलं आहे.अहुपे गावाच्या वेशीवर एक सुंदर देवराई आहे.मी अन मामा डोणी  पर्यंत जायला काही सोय होते का बघण्यासाठी पुढे निघालो.(अहुपे ते डोणी हे अंतर १० किमी).एक दुचाकीवाल्याला तयार करून भुर्रकन ३० मिनिटात डोणी ला पोहोचलो.शिफ्ट गाडी घेऊन परत अहुपे च्या वेशीवर आलो तर भ्रमण मंडळ आवरा आवर करून टेक ऑफ ला रेडी.लागलीच शाका नीट लावून अहुपे सोडलं.डोणी ला मामांना निरोप देऊन डिंभे रस्त्याने परतीला लागलो.वेळ संध्याकाळी ६.
               भ्रमणमंडळ ..डावीकडून ..निलेश,प्रसन्न,प्रजेश,प्रसाद 
डिंभे धरणाच्या बाजू बाजूने वळणावळणाच्या रस्त्याने घोडेगांव मध्ये ७.३० ला पोहोचलो.चहा वडापाव फस्त करून  मंचर मार्गे नाशिक फाट्याला निलेश अन प्रजेश ला टाटा केला.पुढ्यच्या तासाभरात तळेगावला गृहप्रवेश केला. वेळ १०.३०

                                         नकाशा ..निलेश वाघ याच्या सौजन्याने 


महत्वाच्या नोंदी :
सुरवात : डोणी शेवट : अहुपे 
मार्ग : डोणी -त्रिगुणधारा घाट -मढ वाडी -धसई -खोपिवली -अहुपे घाट -अहुपे (धसई -खोपिवली वाहनाने)
एकूण चढाई उतराई :१६३० मीटर्स 
श्रेणी :मध्यम

चढाई उतराईतील टप्पे:

डोणीदार घाट :
डोणी गाव:१०७५ मीटर्स ---डोणीदार घाट सुरुवात:९९० मीटर्स ---डोणीदार घाटातील गुहेसारखं ठिकाण:६२५मीटर्स -वाघाची वाडी:२२० मीटर्स---मढ--१६० मीटर्स =एकूण ९१५ मीटर्स 

अहुपे घाट :
खोपिवली गाव:१९० मीटर्स ---पाण्याचं टाक:५२० मीटर्स-अहुपे माथा-९०५ मीटर्स=एकूण ७१५ मीटर्स 

नोट:आजकाल बरेच ट्रेकर मंडळी जीपीएस वापरतात.वरील दिलेली माहिती हि सह्याद्रीत ट्रेक करणाऱ्या अनुभवी ट्रेकर्स ना उपयोगी पडू शकते म्हणून देत आहे. 

प्रसन्न वाघ 
वाईल्ड ट्रेक ऍडव्हेंचर 

11 comments:

  1. Nicely written and framed with lovely photos Prasanna... Great work.

    ReplyDelete
  2. Khup mast ..detailed information..altitude range trek nearby everything..keep it up

    ReplyDelete
  3. Superb writing...keep it up Prasanna!!

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  6. Dnyaneshwar khade18 December 2019 at 09:05

    हया रविवारी १५/१२/२०१९ला मी व दोन मित्रा.नी मिळुन त्रिगुणधराघाटाची चढाई केली.लांबुन सोपावाटत होता पण वरवर पोहोचायला साडेचार तास लागले.८.१५ला सुरुवात केली.माथ्यावर १२.४५ला पोहोचलो.वाट जागोजागी तुटल्याने स.पुर्ण कोरड्या पात्रातुन चढाई केली.डोणीतुन पुढे दुर्गवाडीच्या पुढे चालत जाऊन दुर्गवाडीच्या कोकणकड्यावरून खुटेदराघाटातुन उतरून रामपुर गावात पोहोचलो.४वाजता खुटेदरा उतरायला सुरुवात केली व ६.३०रामपुरला पोहोचलो.याआधी खुटेदरखने वर गेलो होतो.खुप छान व थरारक ट्रेक झाला.खुप दिवसांपासुन त्रिगुणधारा मनात घोळत होता ती इच्छा पुर्ण झाली.

    ReplyDelete