Sunday 6 May 2018

शेवत्या घाट-भेरंड नाळ उतराई चढाई

                                        शेवते घाट उतराई
या ट्रेकचा पूर्वार्ध बिंब नाळ-फणशीची नाळ  इथे वाचा
बिंब नाळ-फणशी नाळ रायगडाच्या घाटवाटांची उतराई चढाई

दिवस २:८ एप्रिल २०१८
भोर्डीतील हनुमान मंदिरात मुक्काम करण्याची आमची तशी दुसरी वेळ.मागच्या वर्षी पावसाळ्यानंतर शेवत्या-भेरंड नाळेचा प्लॅन काही कारणास्तव शेवत्या-मढ्या होऊन भोर्डीत मुक्काम पडला होता.आजची डोंगरयात्रा मोठी असली तरी अवघड नव्हती त्यामुळे जरा उशिराच डोळा उघडला.फ्रेश होऊन श्री.जंगम यांच्याकडे चहा घेऊन भोर्डीतून नेऋत्य दिशेला कूच केलं.वेळ सकाळी:७.३५
                            केळेश्वर देवराई/वनराई

भोर्डीच्या बाहेर असलेल्या गर्द वनराईत/देवराईत केळेश्वराचं सुंदर देवस्थान आहे.दर्शन घेऊन साधारण पश्चिमेला असलेल्या पहिल्या टेकडीकडे मोर्चा वळवला.एक ओढा ओलांडून बैलगाडी रस्त्याने साधारण ५ मिनिटे चालल्यावर काही घर लागतात.घरांच्या डाव्या बाजूने सोंडेवर चढाई सुरु केली.छान मळलेल्या वाटेने १९५ मीटरची खडी चढाई एका दमात पार करून माथा गाठला.इथपर्यंत येताना बऱ्याच ढोरवाटा चकवू पाहतात आपण मात्र पश्चिमेकडे तिरके चढत राहायचं.माथ्यावर सुंदर ठिकाणी टुमदार धनगरवाडा असून पश्चिमेला सह्याद्रीची मुख्य धार अन भिकनाळेची खिंड लक्ष वेधून घेते.काल रात्रीपासून मोबाइलला पहिल्यांदाच नेटवर्क मिळाल्याने काही फोनाफोनी करून निघालो.वेळ:सकाळी ८.४०
                              टुमदार धनगरवाडा 
    धनगरवाड्यापासून पश्चिमेला दिसणारी सह्याद्रीची मुख्य धार

धनगरवाड्यापासून पश्चिमेला दिसणाऱ्या खोगळीत उतरून सह्याद्रीच्या मुख्य धारेच्या पदरातून निघालो.भिकनाळ माथा बघून पलीकडे भलीमोठी मोठी दरी आहे याची कल्पनाही इथून येत नाही.एक कोरडा ओढा पार करून वाट जंगलात शिरते अन चढाई परत सुरु होते.धनगरवाड्यापासून इथवर यायला २० मिनिटे पुरे होतात.७० मीटरची घनदाट जंगलातील चढाई वासोट्याची आठवण करून देते.
     भिकनाळ माथा..या भागातील सर्वात उंच घाटवाट
    खोगळीतून मुख्य धारेकडे चढाई इथून सुरु होते

सह्याद्रीच्या मुख्य धारेवर वाऱ्याने स्वागत केले.दूरवर मागे हिंदवी स्वराज्यातले प्रचंडगड(तोरणा) आणि राजगड ताठ मानेने उंचावलेले दिसतात.धारेवरून दक्षिणेला दुर्गाचा कडा अन त्याचा उजव्या हाताला एकमेव झाड असलेलं छोटस पठार दिसत.शेवत्या घाटाची सुरुवात तिथूनच होते.दूरवर दिसत असल तरी धारेवरून सपाटीने १० मिनिटांत पठार गाठले.वेळ सकाळी:९.४५
                      तोरणा-राजगड सुंदर दृश्य 
            शेवते घाट माथा अन भेरंड नाळ 
    शेवते घाट माथा ..दूरवर सळसळत जाणारा दुर्गाचा कडा

लांबवर सळसळत जाणारा दुर्गाचा सरळसोट पश्चिम कडा अन त्याच्याखाली नाणेमाची लक्षवेधून घेते.दुर्गाचा कडा अन आमच्यामध्ये एक नाळ सरळ खाली ५२५ मीटर खाली उतरताना दिसते.हीच ती भेरंड नाळ.याच भेरंड नाळेचा शोध शेवते गावातून चढाई करताना घ्यायचा होता.दक्षिणेला खोलवर इवलंसं शेवते गाव निपचित पहुडलेलं दिसत होत.क्षणभर विश्रांतीनंतर शेवते गावाकडे उतरणाऱ्या सोंडेवर आरूढ झालो.शेवते घाटाची सोंड मध्यम उताराची असून कड्याचा आतल्या बाजूने वाट असल्याने पळतच उतरलो.अर्ध्या तासात ३०० मीटर उतराई करून एका झाडाखाली विसावलो.बिरवाडीतुन काही ग्रामस्थ गुगळशीकडे चालली होती.रामराम करून भेरंड नाळेची चौकशी केली तर वाट आहे असं ऐकलंय पण कधी गेलो नाही असं कळलं.वेळ: सकाळी १०.३०
                         शेवते घाट उतराई 
     शेवते घाट अर्धा उतरल्यावर मागे दिसणार दृश्य

खालच्या टप्प्यात बऱ्याच ठिकाणी शेवते घाट बांधून काढलेला दिसतो.शेवते घाटाचा उपयोग पूर्वीच्या काळात अन अजूनही बऱ्यापैकी होत असल्याचे हे प्रतीक होते.२० मिनिटांत शेवते गाठून एका घराच्या थंडगर ऐसपैस ओसरीवर विसावलो.नेहमीप्रमाणे याही गावातील तरुण मंडळी कामानिमित्त मुंबई किंवा पुण्याला स्थायिक त्यामुळे गावात फक्त म्हातारी मंडळीच शिल्लक.डांगे सरांनी आजीबाईंकडून १-२ हांडे पाणी जमवलं.सुंदर,टुमदार अन भव्य घरं असूनही शेवते गावात नीरव शांतता होती.चाऊ-माऊ-खाऊ खाऊन पोटोबा शांत केला.काही मंडळींनी कैऱ्या,टरबुजावर हात आडवा करत पोटोबा उरकला.कोकणातल्या उकाड्यात येणारी एखादी वाऱ्याची झुळूक सुखदायी होती.अर्धा तास आराम करून शाका उचलल्या.वेळ:११.४५
               शेवते घाट-खालचा टप्पा
     शेवते गावातून दिसणारे शेवत्या-भेरंड नाळेचे दृश्य

गावात कोणालाच भेरंड नाळेबद्दल माहिती नव्हतं त्यामुळे वाटाड्याचा विचार सोडून दिला.काही ग्रामस्थानी भेरंड नाळ हे नाव तुम्हाला कस माहित म्हणून तोंडात बोटेही घातली असो.तळपता सूर्यनारायण डोक्यावर घेऊन उत्तरेकडे दूरवर दिसणाऱ्या नाळेकडे निघालो.शेताडातून आडवे तिडवे जात नाळ जिथं उतरते तो पायथा गाठायचा प्लॅन होता.शेवते माग पडलं अन नाणेमाचीची मळलेली मोठी वाट पायाखाली आली.गच्च रानव्यात शिरल्यावर उन्हापासून सुटका झाली.पाऊण तासात भेरंड नाळ माथा डावीकडे उंचावर दिसला.नाणेमाचीची वाट सोडून डावीकडून येणाऱ्या नाळेत शिरलो.वेळ:दुपारी १२.५०
           नाणेमाची वाटेवर लागणारे दाट जंगल
               नाणेमाची वाटेवरून दिसणारी भेरंड नाळ
      टळटळीत उन्हात भेरंड नाळेकडे वाटचाल

नाळेतील दगड तापल्यामुळे चढाई तितकीशी सोपी नव्हती.भेरंड नाळेच्या माथ्यापासून मध्यापर्यंत दाट जंगल दिसत होते.नेमका पायथ्याला झाडाचा ठणठणाट.अर्ध्या तासाने एका नॆसर्गिक छपराखाली आसरा घेतला. थंडगार हवा अंगावर घेऊन पुढे निघालो.नाळेतून वाट अशी नव्हतीच.गचपण टाळून कधी डावी-कधी उजवी घेत अर्ध्या तासात जंगलात शिरलो.भयंकर वाढलेल्या झाडीतून वाट काढत एका मोठ्या झाडाखाली ठाण मांडलं.तासाभरात बरंच पाणी उत्सर्जित झाले होते.कलिंगड खाऊन अन थोडा आराम करून शरीर थंड केली.वेळ:दुपारी २
                        नॆसर्गिक छप्पर 
                    नॆसर्गिक छपराखाली आसरा
       गचपणातून मार्ग काढताना..खाली नाणेमाची

भयंकर गचपण अन रुंद असलेल्या नाळेत उजवीकडून,डावीकडून की मधून चढायचं असा सारखा प्रश्न पडत होता.मधून चढत १५-२० मिनिटं कारवी साफ करत जंगलाच्या वरच्या टप्प्यात पोहोचलो.माथा आता नजरेच्या टप्प्यात होता.डावीकडे जात कातळभिंत आल्यावर त्याच्याकडेने परत उजवी घेत घसाऱ्यातून नाळेच्या उजव्या बाजूला पोहोचलो.कमी अडचणीची अन दगडाची वाट गवसली अन वेग वाढला.वाऱ्याची झुळूक अंगावर घेत छोट्या कातळटप्प्याच्या खाली पोहोचलो.इथे कोणीतरी लाकडी बेचकी बसवून सोय करून दिलेली आहे.कातळटप्यानंतर वाट उजवीकडून असून थोडा घसारा आहे.कारवी अन मिळेल ते झाड पकडत माथा गाठला.वेळ दुपारी:३.४०
       भेरंड नाळ-माथ्याजवळ डावीकडे कातळभिंत आल्यावर उजवी घ्यावी 

     भेरंड नाळ-चिटुकला कातळटप्प्यावर प्रसाद अन डांगे सर 
     भेरंड नाळेच्या माथ्याजवळून मागे वळून पाहताना..निवांत क्षण 
     भेरंड नाळेच्या माथ्याजवळील घसारायुक्त टप्पा 

भेरंड नाळेच्या माथ्यावर ठळक पायवाट असून पूर्वेला गुगुळशी तर पश्चिमेला शेवते आणि भोर्डीला जायला वापरात आहे.डावीकडे छोट टेपाड चढून माथ्यावर पोहोचलो.सकाळी इथूनच शेवत्या घाटाची उतराई केली होती.सकाळपासून भक्कम जेवण झालेलं नव्हतं त्यामुळे परत एकदा च्याऊ-माऊ-खाऊ  पोटात ढकलला.सकाळी आलेल्या वाटेने भोर्डीकडे झपाट्याने निघालो.बऱ्यापैकी उतराई अन सपाटीने वाटचाल असल्याने एका दमात धनगरवाडा गाठला.माथ्यावरून भोर्डी दृष्टीक्षेपात आले.अर्ध्या तासात हनुमान मंदिर गाठून समोरच असलेल्या नळावर अंघोळी उरकल्या.फक्कड चहा घेऊन तरतरी आली.गावकऱ्यांना रामराम करत भोर्डी सोडलं तेव्हा सह्याद्रीच्या रांगा श्यामरंगात बुडत होत्या.
     डावीकडून-प्रसन्न,मिलिंद सर,डांगे सर,विनायक,निळू,प्रसाद..फोटो:संदीप 

नोट:
१.शेवत्या घाटाचा माथा भोर्डीतून २ तासावर (६ किमी)असल्यामुळे भोर्डीतून सकाळी लवकर सुरुवात करावी.
२.उन्हाळ्यात शेवत्या-भेरंड नाळ डोंगरयात्रेत फक्त शेवते गावात पाण्याची सोय. 
३.भेरंड नाळेबद्दल फारसं लिखाण किंवा माहिती उपलब्ध नाही.नाणेमाचीच्या वाटेवर भेरंड नाळ एका ओढ्यात उतरते तिथून चढाई सुरुवात करावी.
४.बिंब नाळ-फणशी नाळ-शेवत्या-भेरंड नाळ डोंगरयात्रा वेळेत पूर्ण करण्यास प्रसादच्या प्रभावी नियोजनाचा मोलाचा वाटा. 

महत्वाच्या नोंदी :
सुरवात:भोर्डी  शेवट:भोर्डी 
मार्ग: भोर्डी-शेवते घाट-शेवते-भेरंड नाळ-भोर्डी
श्रेणी:मध्यम
एकूण डोंगरयात्रा: १८.९ किमी
वेळ:१०.१५ तास

चढाई उतराईतील टप्पे:
भोर्डी (६६० मीटर्स)-धनगरवाडा-(८५८ मीटर्स)-शेवते घाट माथा(९०० मीटर्स)-शेवते गाव (३४० मीटर्स)-भेरंड नाळ पायथा-(३७३ मीटर्स)-भेरंड नाळ माथा-(८६२ मीटर्स)

प्रसन्न वाघ
वाईल्ड ट्रेक ऍडव्हेंचर

Saturday 5 May 2018

बिंब नाळ-फणशी नाळ रायगडाच्या घाटवाटांची उतराई चढाई

     बिंब नाळेच्या वाटेवरून दिसणारा दुर्गदुर्गेश्वर रायगड,लिंगाणा अन रायलिंग पठार 

दिवस १: ७ एप्रिल २०१८
तोरणा किल्ल्याच्या पायथ्याला चिडीचुप निजलेल्या भट्टी गावात प्रवेश केला तेव्हा रात्रीचे २ वाजले होते.राम मंदिरात पथाऱ्या पसरून नोव्हेंबर मध्ये फडताड-भिकनाळ ट्रेकच्या वेळी केलेल्या मुक्कामाच्या आठवणी ताज्या केल्या.डांगे सरांनी आणलेल्या सोलापुरी कडक भाकऱ्यांची चव चाखून लागलीच निद्रिस्त झालो.
नेहमीप्रमाणे पहाटेच डांगे सरांनी गावात जाऊन चहाची सोय करून ठेवली.आवरा-आवर करून आजीबाईंच्या घरात चहा घेतला.काही पैसे देण्याचा प्रयत्न केला पण आजीबाईंनी साफ नकार दिला.मोर्चा आता मोहरीकडे वळवला.पाऊण तासात मोहरीच्या अलीकडे सिंगापूर फाट्यावर पोहोचलो.वेळ सकाळी:७.४५
                          टुमदार सिंगापूर गाव 
   डावीकडुन-निळू,प्रसन्न,डांगे सर,मिलिंद सर,संदीप अन पाठमोरा विनायक..फोटो प्रसाद

मागच्या वर्षी केलेल्या आग्यानाळ-तवीनाळ ट्रेकच्या वेळी फणशीची नाळ डोक्यात घर करून बसली होती.या जंगी डोंगरयात्रेत उतराईसाठी अनवट वाट निवडणे हे प्रसादच्या स्वभावतःच असल्यामुळे बिंब नाळेवर शिक्कामोर्तब झाला होता.मी अन डांगे सर दगडू मामा भेटतायत का बघायला मोहरीत पोहोचलो.नशिबाने दगडू मामा घरातच घावले,आजचा मनसुबा त्यांच्या कानावर घालताच मामांनी उचलली की काठी अन चढवलं की पायताण.सिंगापूर/एकलगाव मधून वाटाड्या न घेता खडा न खडा माहिती असलेल्या दगडू मामांना सोबत घ्यायचं हेच तर कारण होत.निघायच्या तयारीत असताना मामांनी चहाचा प्रेमळ आग्रह करत आम्हाला चहा पाजलाच.
     बिंब नाळेचा झाडीभरला माथा..समोर फणशीची नाळ

सिंगापूर फाट्यावर परत आलो अन झऱ्यावर पाणी भरून घेतले.मोहरीच्या अलीकडे एक-दीड किलोमीटरवर डावीकडे(साधारण पूर्वेला) एक वाट एकलगावसाठी शॉर्टकट आहे.बरोबर त्याच्या विरुद्ध दिशेला रायगड,लिंगाणा अन रायलिंग समोर ठेऊन निघालो.फक्त १०-१५ मिनिटांच्या मवाळ उतराई नंतर बिंब नाळेच्या मुखाशी पोहचल्यावर सुखदः धक्का बसला कारण या भागातील इतर घाटवाटांचा माथा गाठायलाच कमीत कमी अर्धा-पाऊण तास पायपीट करावी लागते.रुंदीला मोजकी असलेल्या नाळेच्या माथ्याला साधारण झाडोरा माजला होता.वाट काढत नाळेत प्रवेश केला.वेळ सकाळी:९
                       बिंब नाळ सुरुवातीचा टप्पा

समोरच साधारण उजवीकडे फणशीची नाळ,दुर्गाचा माळ आणि फडताड नाळेची खिंड असं सुंदर दृश्य बघत उतराई सुरु केली.१० मिनिटांत एका छोट्याश्या कातळटप्प्याने वाट आडवली.१० ते १२ फुटाचा सोपा कातळटप्प्पा असला तरी एका बोल्डरला बेस बनवून रोपच्या आधारे सरसर उतरला.बिंब नाळ अरुंद अन तीव्र उताराची असून खोलवर पायथ्यापर्यंत कुठेही झाड नजरेस पडेना.नाळेतील दगड मजबूत असून घसारा अजिबात नसल्याने उतराई सुखकारक होती.
     बिंब नाळेतून दिसणारी फणशीची नाळ,दुर्गाचा माळ आणि फडताड खिंड 
                                                     बिंब नाळ

१५ मिनिटांच्या उतराई नंतर नाळ चिंचोळी होऊन एका अडकलेल्या दगडावरून २५-३० फूट खाली उडी घेते.किंचित अवघड श्रेणीच्या टप्प्यावर रॅपलिंग करत उतरलो.सर्व मंडळ उतरेपर्यंत तासभर गेला.कड्याखाली पाणी झिरपत होत अन सूर्यदेवाचा अजून नाळेत प्रवेश झाला नसल्यामुळे छान गारवा होता.क्षणभर विश्रांती घेऊन निघालो.वेळ:सकाळी ११.४५
          बिंब नाळ -दुसरा कातळटप्पा 

खाली नाळेचा अर्धा भाग उन्हात न्हाहून निघाला होता.नाळेचा पायथा बराच खोलवर दिसतो.नाळेत बऱ्याच ठिकाणी धबधब्याच्या जागांमुळे अजून किती कातळटप्पे लागतील याचा अंदाज बांधत असतानाच एका सोपा कातळटप्यावर पोहोचलो.परत सुरक्षा म्हणून रोप लावून सरसर हा टप्पा उतरला.आता उन्हाने नाळ तापल्यामुळे पायांची गती वाढली.साधारण ७० अंशात पुढची उतराई असूनही भक्कम दगडांमुळे तितकीशी अवघड नाही.मागे बिंब नाळ माथा उंचच-उंच गेल्यावर काही वेळातच वाट उजवीकडे वळते अन माथा नजरेआड होतो.कोकणातल्या उकाड्याने पायथा जवळ आल्याची जाणीव करून दिली.तीन तासांच्या उतराई नंतर झाडोरा लागला अन मंडळ विसावलं.
                             बिंब नाळ-तिसरा कातळटप्पा  
             पायथ्यातुन दिसणारी बिंब नाळ


 १० मिनिटांच्या मवाळ चालीनंतर आग्या नाळेकडून येणाऱ्या ओढ्याला गाठलं.इथून हाकेच्या अंतरावर असलेल्या पाण्याचा स्रोतावर पोहोचलो.मागच्या वर्षी मे महिन्यात इथेच बसून पोटोबा केला होता त्याच आठवणी घोळवत शिदोऱ्यांवर हात आडवा केला.१५-२० मिनिटांची वामकुक्षी घेऊन शरीर थंड झाली.भर उन्हात आता फणशीच्या नाळेची चढाई करायची असल्याने पाणी भरून घेतले अन शरीराबरोबर कपडेही ओले करून दापोलीकडे जाणाऱ्या ओढ्याने निघालो.वेळ दुपारी:२.३०
                      पायथ्यातुन फणशीची नाळ
         पहिला टप्प्यानंतर फणशीची नाळ 

ओढ्यातील दगड चांगलेच तापल्याने १५ मिनिटांत घाम निघाला.इथून सरळ गेल्यास दापोली उजवीकडे तवीची नाळ अन डावीकडे फणीशीची नाळेसाठी वाटा आहेत.फणीशीची नाळ झाडी भरली दिसत होती पण उंचच उंच माथा बघून चढाई रग्गड होणार यात शंकाच नव्हती.बिंब नाळेपेक्षा फणशीची नाळ अगदीच ऐसपैस असून मोठं-मोठ्या तापलेल्या दगडांनी १० मिनिटांतच तोंडच पाणी पळवलं.गच्च जेवणामुळे मंडळातील काही जणांची गती हत्तीसारखी मंदावली.पहिला दम म्हणून ५ मिनिटे विसावलो.मागे तवीची नाळ दिसायला बुटकी वाटत होती पण तिचा उन्हाळी हिसका आम्ही मागच्या वर्षीच अनुभवला होता त्यामुळे दुरूनच नमस्कार करून निघालो.
    फणशीच्या नाळेतून -तवीची नाळ,रायलिंग,लिंगाणा दृश्य

आता लय सापडली भक्कम दगडावरून भराभर उंची गाठत झाडोऱ्यात शिरलो.साधारण दीड-दोन तासाच्या चढाईनंतर मागे वळून पाहिलं अन जागीच थबकलो.तीन त्रिकोणी खिंडी पाहून बऱ्याच आठवणी नजरेसमोरून तरळून गेल्या.अलीकडची खिंड तवीच्या नाळेची,त्याच्यापलीकडे बोराटा-लिंगाणा जोडणारी दुसरी अन दूरवर गायनाळे जवळची खिंड.गेल्या काही वर्षात केलेल्या अवघड घाटवाटांचं कॅनव्हासच जणू.वेळ:संध्याकाळी:४.१५

नाळेचा माथा जवळ वाटत होता पण घनदाट जंगलामुळे अजून किती वेळ लागेल याचा अंदाज नव्हता.माथ्यातील जंगल लागल्यावर नाळ सोडून डावीकडच्या सोंडेवर चढलो.उजवीकडे वळसा घालत नाळेच्या उजव्या खांद्यावर पोहोचलो.एक पुसटशी पायवाट गवसली उजवीकडे खोल दरी अन पलीकडे रौद्र सह्याद्रीची सुंदर दृश्य दिसते.भरगच्च कारवीतुन मार्ग काढत दुर्गाच्या माळाच्या अलीकडे फडताड वाटेला गाठल.वेळ संध्याकाळी:५.३०
     फणशी नाळेच्या माथ्याजवळ-प्रसाद,संदीप,विनायक 
     फणशी माथा..दुर्गाच्या माळजवळ भ्रमणमंडळ 
                                        जननीचे ठाणे 

मागच्या नोव्हेंबरमध्ये साफ केलेल्या कारवीच्या खुणा बघत जननीच्या ठाण्या जवळ आलो.गेल्या ६ महिन्यात जननीला भेटण्याचा हा ३रा प्रसंग.नमस्कार करून पायांना अजून गती मिळाली.सूर्यास्ताबरोबर मागे रायगड ,डावीकडे तवीची नाळ त्याच्यामागे लिंगाणा,रायलिंग,पुनाड डोंगर आणि दरीपलीकडे आग्या नाळ,बिंब नाळ असा बराचसा मुलुख न्याहाळत कुसूरपेठेच्या अलीकडे रोझ हाईटस जवळ थांबलेला आमचा भ्रमणरथ गाठला.वेळ संध्याकाळी:६.२०
       सूर्यास्ताच्या वेळी सह्याद्रीचे मोहक दृश्य

दगडू मामांना बसने मोहरीत सोडण्याची सोय केली तोपर्यंत फ्रेश होऊन लागलीच भोर्डीकडे मोर्चा वळवला.रात्री ७.४५ भोर्डीतील हनुमान मंदिरात शाका उतरवल्या.भोर्डीतील पोलीस पाटील श्री.जंगम यांच्याशी वार्तालाभ करून थोडंफार जेवणाची सोय केली.मंदिरात पथाऱ्या पसरून तास-दीड तास आराम केला.तोपर्यंत जंगम कुटुंबियांनी सुंदर जेवण तयार केल्याची वर्दी घेऊन डांगे सर आले.निळू भाऊ अन डांगे सरांनी मस्त कांद्याची चटणी बनवली होती.भरगच्च जेवून मंदिरात पाठ टेकवली अन क्षणातच काही जणांच्या घोरण्याचा आवाज कानावर आला.

बिंब नाळ डोंगरयात्रेचा विडिओ पाहण्यासाठी खालील लिंक क्लीक करा 

नोट:
 १.बिंब नाळेत ३ सोप्या श्रेणीचे कातळटप्पे असुन रोप बाळगणे केव्हाही उत्तम. 
 २.उन्हाळ्यात वाटेत पाणी फक्त एकाच ठिकाणी उपलब्ध.१३०० मीटर्सची उतराई चढाई असल्याने पुरेसे पाणी बाळगणे महत्वाचे. 
३.या परिसरातील पालखी वाट आणि जननी नाळ या दोन अवघड वाटा राहिल्यात.येत्या हिवाळ्यात त्यांचा मागोवा घेतला जाईल.खालील फोटोत या परिसरातील घाटवाटा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 

महत्वाच्या नोंदी :
सुरवात:मोहरी शेवट:कुसारपेठ

मार्ग: मोहरी-बिंबनाळ-फणशी नाळ-जननी ठाण-कुसारपेठ
श्रेणी:किंचित अवघड
एकूण डोंगरयात्रा: ७.९ किमी
वेळ:९.३० तास

चढाई उतराईतील टप्पे:
मोहरी (९१०मीटर्स)-बिंबनाळ माथा(८२० मीटर्स)-बिंब नाळ पायथा(३०७ मीटर्स)-फणशी नाळ पायथा-(२१५ मीटर्स)-फणशी नाळ माथा-(८२५ मीटर्स)-कुसारपेठ-(८९५ मीटर्स)

या ट्रेकचा उत्तरार्ध शेवत्या घाट-भेरंड नाळ इथे वाचा
शेवत्या घाट-भेरंड नाळ उतराई चढाई

प्रसन्न वाघ
वाईल्ड ट्रेक ऍडव्हेंचर