Sunday 19 November 2017

फडताड नाळ -भिक नाळ रायगडाच्या घाटवाटांची उतराई चढाई

भिकनाळेतून समोर दिसणारी जननी नाळ..उंच दिसणाऱ्या डोंगरापलीकडे फडताड नाळ

पायलट ट्रेकला ८ जणांची टीम तयार झाली अन सर्व भिडु पट्टीचे त्यामुळे अवघ्या १० मिनिटांत शेवटच्या क्षणी मोहिमेत बदल करून फडताड नाळ अन भिक नाळेचा फडशा पाडायचं ठरलं.आजपर्यंत वाचनात अन ऐकण्यात आल्याप्रमाणे फडताड म्हणजे पडताल अन भिकनाळ म्हणजे भिक मागायला लावत असावी असा अंदाज होता.
नेहमीप्रमाणे प्रसादने आवश्यक तेवढेच टेक्नीकल साहित्य घेतलं.याबाबतीत प्रसादच्या अनुभवाला/अभ्यासाला तोड नाही.प्रत्येक सदस्य अनुभवी असल्याने प्रत्येकाने आवश्यक तेवढेच साहित्य घेतले होते.रात्री ठरल्याप्रमाणे ११.४५ ला पुणे सोडले अन आमच्या दोन गाड्या भट्टीच्या वाटेला लागल्या.पहाटे २ ला सुंदर अश्या भट्टीतील राम मंदिरासमोर गाड्या पार्क केल्या.पथाऱ्या पसरून ओळीत आडवे झालो.
                   भट्टी गावातील सुंदर राम मंदिर 

दिवस १-११-११-२०१७
पहाटे ६ ला उठुन आन्हिकं उरकली.डांगे सरांनी चहाची सोय बघून ठेवल्यामुळे लागलीच चहा घेऊन कुसूरपेठेकडे मोर्चा वळवला.तोरणा-राजगडाचे रूप न्याहाळत तासाभरात कुसूरपेठेत दाखल झालो.लागलीच बच्चे कंपनी अन काही गावकरी जमा झाले.बराच वेळ चर्चा करूनही वाटाड्या काही मिळेना.एकलगावतून वाटाड्या मिळेल ह्या अंदाजाने गाड्या एकलगावच्या वरच्या बाजूला असलेल्या रस्त्यापर्यंत नेल्या.प्रसाद,निळू भाऊ(निलेश वाघ) अन विनायक एकलगावात उतरून वाटाड्या बघेपर्यंत नाष्टयाची तयारी केली.एक चूल मांडून मॅग्गी बनवण्यात आली तोपर्यंत कचरे मामा अन बाकीचे मंडळ आले.पोटोबा आवरून एकलगावच्या अलीकडे असलेल्या रोझ हाईट्स रस्त्याने साधारण १ किमी आतपर्यंत गाड्या आणून एका शेडजवळ पार्क केल्या. वेळ सकाळी:९.४५

        सिंगापूर गावाच्या रस्त्यावरून दिसणारे एकलगाव,लिंगाणा 
    डोंगरयात्रेच्या सुरुवातीला..डावीकडून आण्णा,निराद,प्रसाद,निळु,टॅंगो अन डांगे सर 

भ्रमणमंडळाने १० मिनिटांतच आपापल्या शाका पाठीवर चढवत गाडयांना पाठ दाखवत जननीच्या ठाण्याकडे वाटचाल सुरु केली.सुरुवातीला पायवाट मळलेली असून उजवीकडे एकलगाव,आग्या नाळ,तवीच्या नाळ अन लिंगाणाचे सुरेख दर्शन होत राहते.समोर दुर्गदुर्गेश्वर रायगडाचे दर्शन सुखावून जाते.अर्ध्या तासात मळलेली वाट पुसटशी होऊन जंगलात शिरते.लांबलेल्या पावसामुळे कारवी अन झाडी रस्ता आडवू पाहत होती पण टॅंगो अन प्रसाद कोयत्याने छान रस्ता बनवत होते त्यामुळे मागचे मंडळ निवांत मार्गक्रमण करत जननीच्या ठाण्याजवळ पोहोचलो.वेळ:११.१५
इथून उत्तर/वायव्येला  फणशीच्या नाळेने उतरून आग्या नाळेने एकलगाव गाठता येते किंवा तवीच्या नाळेने सिंगापूर गाठता येईल.जननीच्या ठाण्यापासून दक्षिणेला जननीची नाळेच्या तोंडाला जाऊन आलो.जननीच्या नाळेने उतरून भीक नाळेने देशावर चढता येते.वरील सर्व वाटांसाठी अनुभव/कौशल्य अन वाटाड्या हवा हे विसरता कामा नये नाहीतर इथल्या जंगलात नीरव शांततेशिवाय तुम्हाला कोणीही भेटणार नाही याची शाश्वती नक्कीच मी देतो.
                                आग्या नाळ 
     रायगड,तवीची नाळ,लिंगाणा अन रायलिंग पठार 
                         जननीचे देवस्थान 

जननीची पूजा करून भयानक वाढलेल्या कारवीतून वाट काढत मध्यान्हाला दुर्गाच्या माळावर पोहोचलो.आजचा मुक्काम फडताड उतरून पाणवठा बघून करायचा असल्याने भ्रमणमंडळाने निवांत भोजन करण्यासाठी पाठीवरच्या शाका माळावर असलेल्या एकमेव झाडाखाली उतरवल्या.इथून फडताड नाळेच्या वाटेवर काही अंतरावरच छोटा झऱ्यावर पाण्याची सोय झाली.पाणी भरून परत झाडाखाली आलो.उत्तर/वायव्येला लिंगाणा,कोकणदिवा अन रायलिंग पठार तर पश्चिमेला रायगड असा कॅनव्हास बघत शिदोऱ्या उघडल्या.फडताड उतरायची असूनही त्याची तमा न बाळगता भरगच्च जेवण झालं.वेळ:दुपारी १.३०
               दाट कारवीतून वाट काढताना मंडळ 
               दुर्गाचा माळ ..समोर लिंगाणा 

पाणी भरून परत कारवीतून वाट काढत फडताड नाळेच्या मुखाशी आलो अन कचरे मामानी इथून पुढची वाट माहित नाही म्हणून बॉम्ब टाकला.प्रसाद अन डांगे सर १० मिनिटे खाली जाऊन वाटेचा अंदाज घेऊन परत आले.काही वेळ चर्चा करून परत दुर्गाच्या माळावर परत आलो.वाटाड्या मामांना पुढची वाटच माहीत नसल्याने आज फडताड उतरून खाली मुक्काम करायच्या प्लॅन रद्द करण्यात आला.कचरे मामांना काही मानधन देऊन पुढच्या वेळी असं कोणत्याही व्यक्तीबरोबर करू नका अशी विनंती केली.आता पुढचा मार्ग आम्हालाच शोधायचा असल्याने कचरे मामांना निरोप दिला अन मामांनी एकलगावचा रस्ता धरला.वेळ दुपारी:४
काही वेळ चर्चा करून उद्या लवकर फडताड उतरून भीक नाळ चढण्याचा ठराव मंजुर झाला.माळावर गवत अन झाडी माजली होती.तासाभरात कॅम्पसाईट तयार केली.रात्री शेकोटीसाठी लाकूडफाटा जमा करताना टॅंगोने ग्रीन पेट वायपर साप हेरला.सापाने पण वेग-वेगळ्या पोझ दिल्यामुळे त्याचे बरेचशे फोटो काढण्यात वेळ गेला.टॅंगो खुश.
                आजची आमची कॅम्पसाईट 
          टॅंगोने हेरलेला ग्रीन पेट वायपर साप

आता सांजवेळ दाटून आली अन आम्ही पथाऱ्या पसरुन छोटोशी शेकोटी पेटवली.बऱ्याच दिवसांनी डोंगरयात्रेमधे असा निवांत वेळ मिळाला होता.पूर्ण पठारावर फक्त आम्ही ८ डोंगरयात्री अन समोर दुर्गदुर्गेश्वर रायगड,लिंगाणा असा त्रिवेणी संगम.डोंगरकड्यावरून जाऊन मस्त सूर्यास्त अनुभवला.रायगडावरील जगदीश्वर मंदिरावरचा दिवा लुकलुकयाला लागला होता त्याची ऊर्जा घेऊन आम्ही परतलो.रम्य सांजवेळी गुलाबी थंडीत शेकोटीजवळ मस्त गप्पांचा फड रंगला.दूरवर रायलिंग पठारावर विजेऱ्यांच्या झगमगाट दिसला बहुतेक कोणता तरी ग्रुप उद्या लिंगाणा चढाईसाठी आला असावा.आमच्या ग्रुपने केलेल्या लिगांणा चढाईच्या आठवणी घोळवत जेवणं उरकली.सकाळी ६ चा वेकअप कॉल ठरवून निद्रिस्त झालो. वेळ रात्री:९
              सांजवेळी लिंगाणा,तवीची नाळ दृश्य 
        गुलाबी थंडीत शेकोटीजवळ मस्त गप्पांचा फड 
         गुलाबी थंडीत शेकोटीजवळ मस्त गप्पांचा फड 
              स्लीपींग बॅगमध्ये ..शुभरात्री 

दिवस २-१२-११-२०१७
सकाळी ६ ला उठून पाहतो तर प्रत्येकाची डब्यासाठी पळापळ चालली होती.बहुतेक कालच्या भरगच्च जेवणामुळे अन आरामामुळे पोट जड झाली असावीत असो.कॅम्पसाईट नीट साफ करून पाण्याच्या ठिकाणी जाऊन पाणी भरून घेतले(२ लिटर प्रत्येकी).अशा डोंगरयात्रेत प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार पाणी घेणं आवश्यक.फडताडच्या मुखाशी असलेल्या घसारायुक्त वाटेने काळजीपूर्वक फडताडच्या खिंडीत पोहोचलो.डावीकडे जात काही झाडांच्या आधार घेत ५ मिनिटांच्या उतराई नंतर एका मोठया झाडाजवळ पोहोचलो.प्रसादने दोन झाडांचा बेस बनवत रोप फिक्स केली.टॅंगोला बिले देत पहिला ३० फुटाचा कातळटप्पा टॅंगोने काही मिनिटांतच उतरला.उतरतानाच रस्ता साफ केल्याने दगड गोटे पडण्याची भीती नव्हती.पुढचे सदस्यही हार्नेस घालून तयार होतेच साधारण तासाभरात प्रसाद व्यतिरिक्त सर्वजण हा सोपा कातळटप्पा उतरून खाली पोहोचलो.प्रसादने शेवटी उतरत रोप अडकणार नाही याची काळजी घेत रोप ओढून घेतला.वेळ सकाळी:९
         फडताडच्या मुखाशी असलेला घसारायुक्त टप्पा 
            पहिला सोपा कातळटप्पा साफ करताना टॅंगो 

कातळटप्पा उतरताना.. विडिओ पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 

पुढील वाट नाळेतून असुन आरामके साथ टुणूक टुणूक करत नाळेतून डावी-उजवी घेत तासाभरात एका सुकलेल्या धबधब्यापाशी पोहोचलो. इथून उजवीकडची वाट पंदेरीत उतरते हे आम्हाला ठाऊक होत.याच उंचीवरून पूर्वेकडून जात भिकनाळ गाठायचा प्रसादचा प्लॅन होता.तासभर रस्ता करूनही मनासारखी वाट सापडेना तेव्हा निळू,टॅंगो,प्रसाद अन मी,डांगे सर असे दोन मंडळ वेगळ्या मार्गाने जात वाट बनवायाचा प्रयत्न केला.काही वेळाने दोन्ही मंडळ रस्ता करत एका ठिकाणीच पोहोचलो.वेळ दुपारी:११.३०
                 फडताड नाळेतून उतराई 

इथून परत फिरावे अन पंदेरीत उतरावे किंवा परत फडताड चढून एकलगाव गाठावे अशी पाल माझ्या मनात चुकचूकली.प्रसादच्या मनात भिकनाळच असल्याने टॅंगो,निळू,प्रसाद अन डांगे सर पुढे रस्ता बनवत एकदाचे पठार गाठले.२० मिनिटे परत मागे येऊन शाका उचलल्या.बाकीच्या सदस्यांना घेऊन सपाटीवर पोहोचलो.निबिड रान अशा जंगलात प्राणांच्या विष्टेशिवाय काही दिसत नव्हतं. सपाटीवरून चालणं सुसह्य होत पण वाढलेल्या झाडीमधून रस्ता बनवण्यासाठी कसरत करावी लागत होती.टॅंगो अन प्रसादने मस्त वाट मोकळी करत मागच्या मंडळींची सोय करून दिली होती.भले मोठी झाडे पाहून आश्चर्य वाटत होते.असे जंगल सह्याद्रीत फार कमी ठिकाणी पाहायला मिळत.वेळ दुपारी :१२.३०
    फडताड नाळ-भिक नाळ मधील निबिड जंगलटप्पा 
                     भले मोठी झाडे
साधारण अर्ध्या तासात काल पाहिलेल्या जननीच्या नाळेच्या बरोबर खाली पोहोचलो.घनदाट जंगलामुळे भिकनाळ अजून किती लांब आहे याचा अंदाज येत नव्हता.प्रसाद अन डांगे सर जननीच्या नाळेच्या वाटेपर्यंत जाऊन उंचावरून रस्त्याचा अंदाज घेतला.साधारण अजून तासाभरात भिकनाळे पर्यंत पोहोचता येईल असा अंदाज होता.अर्धा तास जंगलातून वाटचालीनंतर उजवीकडे भिकनाळेने दर्शन दिले.२ तास त्या जंगलात वाट बनवल्यानंतर भिकनाळेच्या दर्शनाने सर्व मंडळाचा उत्साह वाढला.वाट उजवीकडे वळत एका नाळेत उतरलो.डावीकडून येणाऱ्या नाळेतून पाण्याचा झरा गवसला.पाणी पिऊन तृप्त झालो. इथेच बसून उरलेला शिधा संपवायचा ठराव झाला.पोटोबा उरकून पाण्याचा साठा परत भरून घेतला.वेळ दुपारी:२.४५

              भिकनाळ प्रथम दर्शन 
           पोटोबासाठी क्षणभर विश्रांती 
पुढच्या अर्ध्या तासात दक्षिणेकडे जात तुफान साफ सफाई करत भिकनाळेला भिडलो.मागच्या २-४ तासापासून पायाला लागलेले ब्रेक निघाले.भिकनाळेचा तीव्र चढाईही त्या घनदाट जंगलापुढे फिकी होती.तालात चढाई करून २० मिनिटांत कातळटप्प्याजवळ पोहोचलो.मंडळातल्या सर्वात हलक्या निळुला मंडळातल्या सर्वात भक्कम अशा अण्णांच्या खांद्यावर चढवून वर पोहोचवले.मागून डांगे सर अन प्रसादने वर पोहोचून रोप फिक्स केली.शाका रोपने ओढून वर घेण्यात आल्या.हार्नेस परीधान करून सर्व जण काही मिनिटांतच वर पोहोचलो.वेळ:संध्याकाळी ४.४५
                 भिकनाळ सोपा कातळटप्पा 

भिकनाळ आता हरिचंद्रगडाच्या नळीच्या वाटेशी साधर्म्य असल्यासारखी वाटते फरक फक्त भिकनाळ ऐसपैस असून दगड स्थिर आहेत.मंडळाने ताल धरत २० मिनिटांत भिकनाळेची सर्वोच्च खिंड गाठली.मागे खोलवर दुपारी ट्रॅव्हर्स केलेला जंगलटप्पा बघून वेगळेच समाधान वाटत होते.दूरवर दुर्गाचा माळ अन त्याच्यामागे लिंगाणा आपला माथा उंचावून दर्शन देत होता.फडताड नाळ मात्र इथून दिसत नाही. वेळ:संध्याकाळी ५.०५
                         भिकनाळ चढाई 
       भिकनाळ चढाई..समोर जननीची नाळ 

भिकनाळेच्या खिंडीतून डावीकडे जाणारी वाट पकडली इथून एकलगावपर्यंत मळलेली वाट आहे खरं पण ७-८ फूट वाढलेल्या कारवीतून वाट काढणे तेवढे सोपे नव्हते.वरून एखाद लांबड असलं तर ती भीती वेगळीच.सह्यमाथ्यावरुन उत्तरेकडे जात सर्वोच्च माथ्यावर पोहोचलो.भिकनाळ मागे पडली होती.दूरवर कुसूरपेठ दिसायला लागलं होत.पश्चिमेला कलत्या सूर्याची किरणे रायगड अन लिंगाणा उजळवून टाकत होती.फडताड अन दुर्गाचा माळ बुटके वाटतात. 
कारवीतून कसाबसा रस्ता बनवत अजून एका पठारावर पोहोचलो.तोरणा किल्ल्याचे वेगळ्याच बाजूने दर्शन झाले.इथून पुढची वाट ऐसपैस असून तासाभरात काल गेलेल्या फडताडच्या वाटेला गाठलं.अंधारून येता-येता गाड्या पार्क केलेल्या पठारावर पोहोचलो.वेळ:संध्याकाळी ६.४०
    भिकनाळ माथ्यावरून..रायगड,फडताड,लिंगाणा,दुर्गाचा माळ अन जननी नाळ 
     भिकनाळ माथ्यावरून कुसूरपेठेकडे वाटचाल 
  
             घोणस दर्शन 
मोठ्या गाडी रस्त्याने लगबगीत चालता चालता पाऊल पडणार एवढ्यात वेटोळे घातलेलं जाडसर पांढर काहीतरी दिसलं दचकून तसेच उडी मारून पलीकडे गेलो तर पुढे अजून एक काळा साप.उड्या मारतच पुढे गेलो.मागच्यांना सावध केलं.साप म्हणल्यावर त्यांचं कुतूहल वाढलं अन त्यांनी फोटोही काढले.मी मात्र अचानक आलेल्या या संकटातून वाचलो म्हणत गाडीजवळ अजून काही नाहीना हेच शोधत होतो.आवरा-आवार करून परतीचा प्रवास सुरु केला.वेळ:संध्याकाळी ७.१५
रात्री १० ला खेड शिवापूर जवळ पोटोबा उरकला.१०.३० ला पुण्यनगरीत प्रवेश केला. 

नोट:फडताडला न पडता अन भिकनाळेला भिक न मागता सहजतेने ही डोंगरयात्रा पूर्ण करण्यात प्रसाद अन टॅंगोने मोलाचे योगदान दिले.
प्रसादच्या सह्याद्रीच्या सखोल अभ्यासाची चुणुक परत एकदा अनुभवायला मिळाली.
वाटाड्याविना हा ट्रेक करता येत नाही असेच आजपर्यंतच्या वाचनात आलेलं होत पण केवळ उच्च अनुभव अन अचाट साहस यांची सांगड घालत हा ट्रेक सहजरित्या पूर्ण.
या घाटवाटाना मळलेली पायवाट अशी नाहीच त्यामुळे या घाटवाटा करताना टेक्निकल तसेच सह्याद्रीचा सखोल अभ्यास गरजेचा.


महत्वाच्या नोंदी :

सुरवात :रोझ हाइट्स एकलगाव शेवट :रोझ हाइट्स एकलगाव
मार्ग: रोझ हाइट्स एकलगाव-जननीचे ठाणे-दुर्गाचा माळ-फडताड नाळ-भिक नाळ-रोझ हाइट्स एकलगाव
एकूण चढाई उतराई:८४४ मीटर्स 
श्रेणी:मध्यम

चढाई उतराईतील टप्पे:
रोझ हाइट्स एकलगाव(८३१ मीटर्स)-फडताड नाळ माथा(७४५ मीटर्स)-भिकनाळ जंगलटप्पा (५२५ मीटर्स)-भिकनाळ सुरुवात(५६० मीटर्स)-भिकनाळ माथा(८५० मीटर्स)-सर्वोच्च माथा(९३५ मीटर्स)-रोझ हाइट्स एकलगाव(८३१ मीटर्स)

प्रसन्न वाघ 
वाईल्ड ट्रेक ऍडव्हेंचर