Wednesday 23 August 2017

केट्स टोक(नाखिंदा)-कमळगड-कोळेश्वर-जोर उतराई चढाई

                          कमळगडावरील एक सुंदर क्षण 
शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्या पुण्य अशा रायरेश्वराचे बऱ्याचदा दर्शन झाले होते.रायरेश्वरवरुन दक्षिणेला दोन उंच अवाढव्य अशी पठार दिसतात.त्यातलं दूरवरच म्हणजे महाबळेश्वर प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण अन अलीकडे जवळच कोळेश्वर ज्यावर माणसांचा वावर अगदीच नगण्य.तिन्ही पठार ४५०० फुटापेक्षा जास्त उंचीची त्यामुळे यांचे कोकणकडे ही तेवढेच रौद्र.रायरेश्वर अन महाबळेश्वरला बऱ्याचदा डोंगरयात्रा करताना कधी कामथे घाटातून कधी महादेव मुऱ्ह्यातुन तर कधी बहिरीच्या घुमटीवरून भव्य अन घनदाट कोळेश्वर नजरेत भरलं होत तरी त्यावर जायला काही वाट वाकडी होत नव्हती.
प्रसाद,रवी(टॅंगो),शेखर(आण्णा)यांच्या संगनमताने वाकड्या वाटेने केट्स पॉईंट(नाखिंदा)-कमळगड-कोळेश्वर-जोर अशी डोंगरयात्रा करायची ठरली.
   महाबळेश्वर नाखिंदा टोक..बलकवडी धरण,भव्य कोळेश्वर

दिवस १:२१ मे २०१६
घरची शिफ्ट अन ड्राइव्हर घेऊन सकाळी ११.३० ला पुणे सोडलं.सुरूर फाट्यावर हायवे सोडुन लगेचच पोटोबासाठी थांबलो.छान व्हेज जेवण करून महाबळेश्वरकडे मार्गस्थ झालो.वाई सोडल्यावर पसरणी घाट सुरु होतो अन उजवीकडे पांडवगड अन मांढरदेवीचं दर्शन होत.पाचगणी मागे पडलं अन धोम धरणाचं पाणी अन त्यामागे कमळगडाचा चौकोनी माथा जंगलटप्प्यातून डोकं वर काढुन लक्ष वेधुन घेतो.साधारण अर्ध्या तासात महाबळेश्वरचा मुख्य रस्ता सोडून उजवीकडे नाखिंदा टोकावर उभे राहिलो.वेळ संध्याकाळी:४
      महाबळेश्वर नाखिंदा टोक उतराई सुरुवात 
पर्यटकांच्या गर्दीतुन कशीबशी जागा मिळवत खाली धोम-बलकवडी धरणाचे अन समोर दिसणाऱ्या भव्य कोळेश्वर अन कमळगडाचे विहंगम दृश्य डोळ्यात साठवत लागलीच काढता पाय घेतला.ड्रायव्हरला नांदगने या कमळगडाच्या दक्षिण पायथ्याला असलेल्या गावात यायला सांगून नाखिंदा टोकाच्या डावीकडून उतराई सुरु केली.
छोट्याश्या घळीतून सुंदर अश्या वाटेवर काही पायऱ्या लागतात.सुरुवातीचा कातळटप्पा ५ मिनिटांत पार करून वाट उजवीकडे वळते अन नाखिंदा टोक्याचा बरोबर खालच्या पठारावर घेऊन जाते.नाखिंदा टोक हत्तीच्या सोंडेसारखे भासते.उजवीकडे वायगावातील कौलारू घर अन सुंदर मंदीर नजर खिळवून ठेवतात.उजवीकडे डोंगरधारेवरून मळलेल्या वाटेने १० मिनिटांत आपण एका छोट्याश्या खिंडीत पोहोचतो.इथे सह्याद्रीत सहसा न दिसणारी कृष्णाची मूर्ती दिसते.डावीकडे झाडीतुन खाली धोम-बलकवडी धरणाची भिंत अगदीच जवळ दिसते.उजवी घेऊन एक टेकडी उतरत धोम-गोळेवाडी डांबरी रस्त्यावर उतरलो.सरळ उत्तरेला नांदगनेच्या दिशेने जाणाऱ्या ढोरवाटा पकडत झुंजुमुंजु वाहण्यारा कृष्णामाईच्या नदीपात्राजवळ पोहोचलो.पुढे जाऊन अफाट होणाऱ्या कृष्णामाईच एवढंसं नदीपात्र पाहून आश्चर्य वाटलं.गुडघाभर पाण्यातून नदी पार करून ८-१० मिनिटांच्या चालीनंतर नांदगनेला पोहोचलो. (पावसाळ्यात ही नदी पार करण्यासाठी धरणाच्या दिशेने डांबरी रस्त्याने जाऊन पुलाचा वापर करावा ४५ मिनिटे).वेळ संध्याकाळी:५.१५
                             नाखिंदा टोक


                         कृष्णामाईचं नदीपात्र 
गावात सुरुवातीलाच सुंदर अशी शाळा असून समोरच पाण्याची टाकी आहे.पाण्याचा साठा भरून गावकऱ्यांशी नमस्कार चमत्कार झाला. प्रसाद अन टॅंगोने एका आजीबाईंशी गट्टी जमवत चहा पाण्याची सोय केली.ड्राइव्हर पण तोपर्यंत पोहोचला त्याची रात्रीची जेवणाची सोय आजीबाईंकडे केली.ड्राइव्हरला उद्या दुपारी जोर गावात पोहोचण्यास सांगून आम्ही कमळगडाकडे कूच केलं.संध्याकाळी:६
              नांदगणेतून  दिसणारे नाखिंदा टोक 
नांदगणेतून उत्तरेला पाहिल्यास कमळगडाच्या पश्चिमेची डोंगरधार कोळेश्वराला जिथे जोडते तिथूनच एक सोंड नांदगणेत उतरते.संध्याकाळच्या रम्य वातावरणारात आम्ही त्या सोंडेवर स्वार झालो.मागे भव्य महाबळेश्वरचे विविध रूपं बघायला मिळतात.उघड्या बोडक्या डोंगररांगेवर छान मळलेली वाट असून चुकण्याची शक्यता नाही.साधारण निम्म्यावर एका सपाटीवर पोहोचताच सूर्यनारायणाने निरोप घेतला अन अंधारच साम्राज्य पसरले.ढगांमागे लपलेला चांदोबा अन अंधारात आमची चांडाळ चौकडी एक सुंदर फोटो क्लिक मिळाला.१५ मिनिटांत चढाई संपून एक जंगलटप्पा सुरु झाला अन आम्ही कमळगड-कोळेश्वर डोंगरधारेवर उभे राहिलो.वेळ संध्याकाळी:७.१५
                चांदोबाच्या प्रकाशात भ्रमणमंडळ
कमळगड-कोळेश्वर डोंगरधारेवरून पश्चिमेकडे जाणारी वाट कोळेश्वर,मांडगणीला अन उत्तरेची वाट तुपेवाडी,वासोळेला जाते.डोंगरधारेवर काही वेळ विसावलो.थंडगार भन्नाट वारा,किर्रर्र अंधार,निरव शांतता,कोळेश्वर अन कमळगड सोबती अन आम्ही डोंगरयात्री एकदम झक्कास मेळ!!
दक्षिणेकडे महाबळेश्वर कृत्रिम दिव्यांनी उजळून निघालं होत,तो झगमगाट दुरूनच पाहून आम्ही धन्यता मानली.पूर्वेला गोरक्षनाथ मंदिराचा शोध घ्यायला निघालो. छोटासा चढाईटप्पा पार करत गर्द झाडीत असलेलं गोरक्षनाथ मंदिर गाठणं प्रसादकडे असलेल्या जीपीएस नकाशामुळे सुकर झाल.नांदगणेतून इथवर यायला १.३० ते २ तास पुरेसे होतात.वेळ रात्री:८.१५
         कमळगड-कोळेश्वरला जोडणारी डोंगरधार
अलख निरंजन करत मंदिर परिसरात प्रवेश केला.मंदीर छोटेखानी असून समोरच पत्र्याचं छप्पर ५-७ डोंगरयात्रींसाठी निवाऱ्याच काम चोख बजावतं.दर्शन घेऊन प्रसाद अन टॅंगो पाण्याच्या टाक्याच्या शोधात गेले पण काही वेळात खाली हात परत आले.घरून आणलेल्या शिदोऱ्या उघडल्या अन पोटोबा केला.थोडा वेळ गप्पा मारून पथाऱ्या पसरल्या.
मंदिरामागे जाऊन निवांत ठिकाणी बसून झगमगणारे महाबळेश्वर दुरून पाहता विकसित झालेली मानवी जीवनातील पळापळीची एक बाजू अन आम्ही जंगलात त्या किर्रर्र अंधारात चांदण भरल्या आभाळाखाली  निरव शांतता,आत्मसमाधान देणारी जीवनातील डोंगरयात्रांची  दुसरी बाजू अनुभवत बराच वेळ गेला.भन्नाट थंड वाऱ्यामुळे गारठा जास्तच जाणवू लागला अन आम्ही स्लीपिंग बॅगमध्ये शिरलो.वेळ रात्री:१०
                     गोरक्षनाथ मंदीर..कमळगड
दिवस २:२२ मे २०१६
नेहमीच्या सवयीप्रमाणे पहाटे ५.३० ला उठून आवरा-आवार केली.मंदिरामागेच असलेल्या करवंदाच्या झाडांवर तुटून पडलो अन नाश्ता उरकला.धुक्याच साम्राज्य सर्वदूर पसरलं होत.मंदिरासमोरून पूर्वेला जाणाऱ्या वाटेने मस्त जंगलटप्पा पार करत धनगरवाड्याजवळ पोहोचलो. भव्य अशा वाड्यात काही कुटुंब एकत्रित राहतात.थोडीफार चौकशी करून दक्षिणेकडे कमळगडाच्या माथ्याकडे निघालो.
                       कमळगडाकडे वाटचाल 
            धुक्यात हरवलेला कमळगडाचा माथा 
                            धनगरवाडा 
गर्द जंगलातून कमळगडाची नैसर्गिक कातळभिंत उठावदार दिसते. २० मिनिटांत शिडी अन काही खोदीव पायऱ्या पार करत माथा गाठला.पूर्वेला धोम धरण अन म्हातारीचे दात असा नजारा दिसतो.ईशान्येला मांढरदेवी,उत्तरेला केंजळगड अन रायरेश्वर,पश्चिमेला कोळेश्वर अन दक्षिणेला महाबळेश्वर असा चौफेर नजारा दिसतो.कमळगडाचा माथा फारच आटोपशीर असून साधारण मध्यभागी ४०-५० फुटांची विहीर आहे(गेरूची विहीर).जपून ४०-४५ पायऱ्या उतरून तळाला पोहोचलो.२०-२५ मिनिटांत गडफेरी केली.कातळकडे अन विहीर या किल्ल्याचे आकर्षण म्हणता येईल.आल्यावाटेने १० मिनिटांत धनगरवाड्यावर पोहोचलो.
    कमळगडाच्या माथ्यावर घेऊन जाणारी शिडी 
                          कमळगडावरील विहीर 
थोडस पाणी पिऊन विसावलो.काल नांदगणे सोडल्यापासून पाण्याचे टाके काही मिळाले नव्हते.नारायण कचरे यांना मार्गदर्शक म्हणून घेतले.नारायणराव आम्हाला कोळेश्वर मंदिरापर्यंत सोडून परत वासोळे गाठत मुंबईला जाणार असल्याने लागलीच वाड्यापासून उत्तरेला जाणाऱ्या वाटेला लागलो.वाटेत बारमाही पाण्याचा टाक्याला भेट देऊन पाण्याचा साठा भरून घेतला.
टाक्यापासून पश्चिमेकडे जाणारी वाट सकाळी आलेल्या वाटेत मिसळून काही वेळात गोरक्षनाथ मंदिराजवळ पोहोचवते. तडक कोळेश्वर पठाराकडे निघालो.काल आलेलो डोंगरधारेवरून सरळ जात एक वार्म उप चढला अन कोळेश्वरचे जंगल सुरु झाले.उजवीकडे केंजळगड अन रायरेश्वर हे सोबती दिसत राहतात.वेळ सकाळी:९.१५
                 कोळेश्वर वाटेवरून दिसणारा केंजळगड 
             कोळेश्वर वाटेवरून दिसणारा कमळगड
साधारण अर्धा तास चालल्यावर काही घरं लागतात.नारायणरावांचे पाहुणेच ते.थोडी विचारपूस करून परत जंगलात शिरलो.कोळेश्वर देवस्थान अन पश्चिमेकडे असलेल्या कड्याकडे जाणारी ही पाऊलवाट अशीच चढ-उतार करत पुढे सरकत राहते.साधारण १.१५ तासात जिवंत पाण्याच्या झऱ्याजवळ पोहोचलो.या छोटयाश्या झऱ्यातील पाणी पाईप्सने नांदगने गावाला पुरवले जाते.शुद्ध पाणी पिऊन पुढे निघालो तासाभरात वाट उघड्या पठारावर आली इथून डावीकडची वाट जोर गावात जाते ज्याने आम्हाला उतराई करायची होती.सरळ उजवीकडे जाणारी वाट पकडत अर्ध्या तासात कोळेश्वर देवस्थानाजवळ पोहोचलो.वेळ दुपारी:१२
                कोळेश्वर वाटेवरील पाण्याचा झरा 
                    कोळेश्वर देवस्थान 
नारळ फोडून दर्शन घेतले.इथून पश्चिम कड्यावर जायला साधारण अजून तासभर लागतो अन नारायणला परत वासोळे गाठून मुंबई एसटी पकडायची असल्याने पुन्हा कधीतरी म्हणून आम्ही परतीची वाट धरली.मगाशी सोडलेली जोरची वाटेला लागत नारायणरावांना टाटा केलं.१० मिनिटे पठारावर चाललं की डावीकडे घळीची वाट लागते.काही बाणांच्या खुणा इथे उपयोगी पडल्या.अजून खुणा म्हणजे जुने महाबळेश्वराचे मंदीर बरोबर समोर दिसते अन जोर गाव खाली नजरेस पडलं की समजायचं डावीकडे इथेच खाली उतरणारी वाट आहे.करपवणाऱ्या उन्हात पावलांनी वेग घेतला अन मस्त मळलेल्या वाटेने तासाभरातच जोर गाव गाठले.वेळ दुपारी:२(जोरमधून  बहिरीची घुमटी-आर्थर सीट गाठता येईल(३ ते ३.३० तास) किंवा जोर-क्षेत्र महाबळेश्वर हा शॉर्टकट ट्रेक करून महाबळेश्वर गाठता येईल(१ ते १.३०तास).
                            कोळेश्वर-जोर उतराई 
                      जोर गावात पोहोचताना
धोम बलकवडी धरणाच्या पुढे आंघोळी उरकल्या.साधारण दुपारी ३.१५ ला परतीचा प्रवास सुरु करून वाईला पोटोबा उरकून विनाथांबा पुण्यात प्रवेश केला अन ७ च्या आत घरात पोहोचलो.

प्रसन्न वाघ 
वाइल्ड ट्रेक ऍडव्हेंचर

Sunday 20 August 2017

रुपकुंड ट्रेक(उत्तराखंड)पूर्वतयारी

Trishul peak from Bedni..Roopkund
     बेदनी येथुन दिसणारे त्रिशुल शिखर(७१२० मीटर्स)

सह्याद्रीत मनसोक्त भटकताना काही काळानंतर हिमालयाची ओढ ही आपसूकच लागते हे काही वेगळं सांगायची गरज नाही.तस पाहिलं तर गेली १७ वर्षे सह्याद्रीत फिरूनही मन काही हिमालयाकडे वळले नव्हते.रुपकुंड या ५००० मीटर्स वरील बर्फाच्छादित तळ्याला भेट द्यायचं ठरलं अन हिमालयातील डोंगरयात्रांचा नारळ फुटला.वाइल्ड ट्रेक ऍडव्हेंचर या आमच्या संस्थेचा रुपकुंड ट्रेक ठरला अन १३ जणांची टीम या ट्रेकसाठी सज्ज झाली.
प्रसादच्या मार्गदर्शनाने आवश्यक तयारी करायला फार त्रास घ्यावा लागला नाही.हिमालयात डोंगरयात्रेला जाताना आपल्या बरोबर घ्यायचे साहित्य हे चांगल्या दर्जाचे असावे त्याचा ट्रेक्स दरम्यान खूपच फरक पडतो.
         हिमालयात डोंगरयात्रेसाठी केलेली तयारी 

१६ जुन २०१६:
सर्व सॅक खचाखच भरून आम्ही ७ जणांनी प्रायव्हेट गाडीने पहाटे ४.३० ला पुणे सोडले.लोकमान्य टिळक टर्मिनसला(कुर्ला) पोहोचुन पुण्याच्या इतर ३ सदस्यांना भेटुन नमस्कार चमत्कार झाला.आमची ट्रेन १२१७१ मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस-हरिद्वार वातानुकूलित एक्सप्रेस बरोबर सकाळी ७.२० ला प्लॅटफॉर्मवर आली अन ठरलेल्या ७.५५ च्या वेळेनुसार आम्ही मुंबईला बाय बाय केलं.पुढच्या अर्ध्या तासात कल्याणमध्ये टीमच्या फायनल ३ सदस्यांना ट्रेनमध्ये सामावून आमचा हरिद्वारकडे २९ तासाचा प्रवास सुरु झाला.पुढचे १० दिवस पूर्ण टीम हा ट्रेक करणार असल्याने सर्वानी एकमेकांची चांगली ओळख करून घेतली.
   रुपकुंड ट्रेक टीम(डावीकडुन उभे:अपर्णा,रवी,हरीशभाई,हरीश,उमंग,रोहन,प्रसन्न,सिद्धार्थ,
सारंग,शेंडे काका दुसरी ओळ:संदीप,अमनदीप,प्राची)
    १२१७१ मुंबई -हरिद्वार एक्सप्रेस ट्रेन रूट नकाशा 

  डावीकडून रवी खोबरे(टॅंगो),प्रसाद वाघ अन संदीप

या २९ तासाच्या प्रवासात आराम अन मौजमजा करत दुसऱ्या दिवशी दुपारी १.१५ ला आमची टीम हरिद्वारच्या देवभुमीत पोहोचली.स्टेशनच्या बाहेर भक्तांची अन भगवे वस्र परिधान केलेल्या बाबांची बरीच गर्दी होती.

१७ जून २०१६:
स्टेशनबाहेर आधीच ठरवलेली टेम्पो ट्रॅव्हलर आमच्यासाठी सज्ज होती.दुपारी १.३० ला आमचा प्रवास कर्णप्रयागकडे सुरु झाला.हरिद्वार-कर्णप्रयाग हे अंतर १९३ किमी असुन साधारण ९-१० तासांचा प्रवास आहे.हरिद्वारमधून बाहेर पडताना विस्तीर्ण गंगेचं रूप पाहून डोळे विस्फारले.साधारण तासाभरात ऋषिकेशचा लक्ष्मण झुला वाटेवरूनच पाहून नमस्कार केला.ऋषिकेशपासून खडतर घाटमार्ग सुरु होतो.ब्यासी गाव सोडल्यावर एका हॉटेलवर जेवणासाठी थांबलो.सभोवताली आता उंचच उंच पर्वतरांगा दिसू लागतात.
             हरिद्वार-कर्णप्रयाग खडतर घाटरस्ता 
         हरिद्वार ते कर्णप्रयाग रूट नकाशा 
देवप्रयागमध्ये पोहोचताच गंगा अन अलकनंदा नदीचा संगम दिसतो.(प्रयाग म्हणजेच संगम). श्रीनगर(उत्तराखंड) हे या मार्गातील सर्वात मोठे शहर पार करत संध्याकाळी ७.३० ला आम्ही रुद्रप्रयागमध्ये पोहोचलो.रुद्रप्रयागमध्ये अलकनंदा अन मंदाकिनी या नद्यांचा संगम आहे.चहा नाश्ता करून थोडासा ब्रेक घेण्यात आला.रात्री ९.३० ला आम्ही कर्णप्रयाग येथील मुक्कामाच्या हॉटेलमध्ये पोहोचलो.कर्णप्रयागमध्ये पिंडारी अन अलकनंदा नद्यांचा संगम आहे.रात्रीचे जेवण करून पहाटे ४ चा वेकउप कॉल ठरवण्यात आला.उद्या खऱ्या अर्थाने रुपकुंड मोहिमेची सुरुवात होणार असल्याने सर्व टीमचे सदस्य आपापल्या रूममध्ये जाऊन लागलीच निद्राधीन झाले. .

या ट्रेकचा विडिओ पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 

                                                                      भाग १
                                                                     भाग २

प्रसन्न वाघ 
वाइल्ड ट्रेक ऍडव्हेंचर

Saturday 12 August 2017

सादडे घाट-हरिश्चंद्रगड-खिरेश्वर चढाई उतराई

                  सादडे घाट ..नळीची वाट टप्पा

दिवस १:२४ जून २०१७
तसं हरिश्चंद्रगडावर २००२ पासून बऱ्याच वाऱ्या झालेल्या आहेत.खिरेश्वर,पाचनई,नळीची वाट,राजमार्ग(जुन्नर दरवाजा) या वाटा प्रत्येक ऋतूमध्ये पायाखालून गेलेल्या होत्या.निसर्गाच्या कृपेने यावेळी पहिल्यांदाच सादडे घाटाने हरिश्चंद्रगडावर जायला मिळणार होत.साधारण मध्यरात्री मुसळधार पावसाचा रपरप आवाज ऐकत कमळूच्या सुंदर अशा शेणाने सारवलेल्या घरात मी,इंद्रा,कमळू अन योगिता बाकीच्या मंडळींची वाट पाहत होतो.
                                टुमदार केळेवाडी 

तर झालं असं वाइल्ड ट्रेक ऍडव्हेंचर या आमच्या गिर्यारोहण संस्थेचा नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड हा ट्रेक आयोजित होता.कालपासूनच या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे नद्या नाले ओढे तुडुंब भरून वाहत होते.आम्ही २-३ जण पहिलेच पायथ्याच्या वालीवरे गावात पोहोचून स्थितीचा आढावा घेता नळीच्या वाटेने जाणे नदीच्या प्रवाहामुळे शक्य नव्हते.बाकीचे मंडळ रात्री २ ला पोहोचले.ग्रुप लीडर प्रसाद अन कमळू यांनी चर्चा करून नळीच्या वाटेसारखीच सरस पण रॉकपॅच नसलेली सादडे घाटाची निवड केली.सर्वांनी ऐसपैस अशा सुंदर घरात पथाऱ्या पसरून पाठ टेकवल्या.वेळ पहाटे:२

दिवस २:२५ जून २०१७
ठरल्याप्रमाणे ५ ला सर्व मंडळींना वेकअप कॉल देण्यात आला.कालपासून कोसळत असलेला पाऊस अजूनही थांबला नव्हता.पोहे अन चहाचा भरगच्च नाश्ता पोटात ढकलला.ट्रेक मोठा असल्याने सर्वाना ठेपले वाटप करण्यात आले.प्रसादने महत्त्वाच्या सुचना देऊन इंट्रोडकशन राऊंड झाला अन आमची पाऊले केळेवाडी या साधले घाटाच्या पायथ्याला असलेल्या निसर्गरम्य गावाकडे वळाली.
१५ मिनिटांत छोटंस टुमदार केळेवाडी पार करून मोकळ्या पठारावर पोहोचताच हिरवा शालु नेसलेल्या सह्याद्रीच्या उत्तुंग शिखरांचे थरारक दर्शन होते.शुभ्र फेसाळणारे उत्तुंग धबधबे सह्यशिखरांचे सौंदर्य अजून खुलवत होते.उत्तरेला नाफ्ता डोंगराचा सुळका उंच ढगांना टक्कर देत हरिश्चंद्राच्या पहारेकऱ्याची भुमिका साकारतोय असा भास होतो.पूर्वेला अजस्त्र हरिश्चंद्रगडाच्या वायव्येकडची कातळभिंत लक्ष वेधून घेते.वेळ सकाळी:७.१५
           केळेवाडी ..ग्रुप फोटो ..मागे अजस्त्र पर्वतरांगा
            हिरवागार परिसर अन नयनरम्य दृश्य 
               सादडे घाटाकडे वाटचाल 

ग्रुप फोटो काढून पठारावरून पूर्वेला जाणाऱ्या पायवाटेने निघालो.वाट मळलेली असुन ओढयाच्या डावीकडून पदरात डावी उजवी घेत राहते.साधारण १५ मिनिटे मवाळ चालीनंतर बराच वेळ ढगांमध्ये लपलेली सादडे घाटाची खिंड नजरेस पडते अन क्षणभर ही नळीची वाट तर नाहीना असा संभ्रम होऊ शकतो.तस बघितलं तर साधले घाटातील शेवटचे १५ मिनिटे आपण नळीच्या वाटेत असल्याची जाणीव करून देतात असो.बरेचशे धबधबे अन सभोवताली बरेच उंच कातळकडे अशा मोहिनी घालणाऱ्या टप्प्यात थोडा वेळ घालवुन मंडळानी आगेकूच चालू केली.साधारण अर्धा तासाची जंगलटप्प्यातल्या चढाईनंतर खळाळता ओढा ओलांडून वाट उजवीकडे वळते.सादडे घाटाच्या खिंडीकडुन येणाऱ्या डावीकडच्या डोंगरधारेवरून तीव्र चढाई टप्प्याने साधारण तासाभरात साधले घाटाच्या नळीमध्ये प्रवेश केला.ठेपला विश्रांती घेऊन मंडळ पुन्हा चढाईला तयार. वेळ सकाळी:१०.१५
                            फेसाळणारे धबधबे 
                              सादडे घाट..नळीची वाट टप्पा
          सादडे घाट माथ्यावरून दिसणार सुंदर दृश्य 

सादडे घाटातला माथ्याकडचा हा टप्पा तंतोतंत हरिश्चंद्रगडाच्या नळीच्या वाटेसारखा आहे.दोन्ही बाजुला काळेकभिन्न कातळकडे अन मधुन अप्रतिम पाण्याची वाट.मागे वळुन पाहता खोल दूरवर केळेवाडीतील टुमदार कौलारू घर अन हिरवागार शेतीचा नयनरम्य देखावा दिसतो.१५ मिनीटांत खळखळणाऱ्या पाण्यामधून वाट काढत माथा गाठला.(हा टप्पा पार करताना काळजी गरजेची आहे कारण बरेचसे निखळले दगड कधीही पायाखालून निघुन खाली असलेल्या डोंगरयात्रींवर पडू शकतात).
जंगलटप्प्यातून वाट पूर्वेकडे उताराला लागते अन १० मिनिटात भव्य अशा पठारावर पोहोचलो.पूर्वेकडे बैलघाटाची खिंड दिसते.साधारण उत्तरेला त्रिकोणी कलाडगड लक्षवेधी आहे.(२ तास)डावीकडे पाचनई-पेठेची वाडी गाडीरस्ता हाकेच्या अंतरावर आहे.
           सादडे घाट माथ्यावर..विस्तृत पठार,मागे कलाडगड
     पठारावरून दक्षिणेकडे नळीच्या वाटेची खिंड 

आम्हाला आता नळीच्या वाटेने कोकणकडा गाठायचा असल्याने मोर्चा दक्षिणेकडे जाणाऱ्या वाटेकडे वळवला.१० मिनिटे सपाटीवर झपाझप चालल्यावर वाट चढाईला लागते.२० मिनिटांच्या जंगलातल्या चढाईनंतर नळीच्या वाटेला लागलो अन समोर दिसणाऱ्या रौद्र देखाव्याने सर्वांचीच वाहवा मिळवली.डावीकडे तीव्र चढाईने सोप्या श्रेणीच्या कातळटप्प्याखाली पोहोचलो.पावसाळ्यात खबरदारी म्हणुन इथे रोप वापरावा.रोपच्या साहाय्याने सर्वानी सुरक्षितपणे हा टप्पा पार करत पठार गाठले.इथून समोर दिसणाऱ्या खिंडीकडे मोर्चा वळवला.२० मिनिटात छोटासा कातळटप्पा पार करत कोकणकडा माथा गाठला.(इथेही पावसाळ्यात खबरदारी म्हणुन रोपचा उपयोग करावा) वेळ दुपारी:१२
           सोपा कातळटप्पा,मागे नाफ्ता डोंगर 
        कोकणकड्यावरून दिसणारं विहंगम दृश्य 

हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा म्हणजे निसर्गाचा अविष्कार.साधले घाटाने कोकणकडा गाठण्याचा फायदा म्हणजे पुर्णपणे कोकणकडा अनुभवता येतो.सह्यकड्यावरून खोलवर वालीवरे गाव ढगांच्या गर्दीतुन अधुनमधुन दर्शन देत होते.नवख्या मंडळींना तिथून आलो याचाच जास्त अप्रूप.काही क्षण कोकणकड्यावर व्यतीत करून तडक हरिश्चंद्रेश्वराकडे निघालो.२० मिनिटांत दर्शन घेऊन गणेश गुहा गाठली.भास्कर अन सावळेराम या प्रेमळ कुटुंबाकडे दुपारचे जेवण करून तृप्तीचा ढेकर दिला.कमळू,सावळेराम यांना निरोप देत नेहमीची खिरेश्वरकडे जाणारी वाट धरली. वेळ दुपारी:२.३०
    हरिश्चंद्रेश्वर मंदिर (हरिश्चंद्रगड) .. हे प्राचीन मंदिर ३९०० फुटावर बांधलेले आहे
               हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला

तासाभरात टोलार खिंडीच्या माथ्यावर आलो.उतरताना एका ठिकाणी लोखंडी रेलिंग तुटलेले आढळले.नवख्यासाठी इथं रोप लावलेलं बरं.सोपा कातळटप्पा पार करून टोलार खिंड गाठली.व्याघ्रशिल्प पाहुन उजवीकडे खिरेश्वरला जाणारी वाट धरली.(डावीकडची वाट लव्हाळे गावात जाते १ तास).धोपट मार्गाने पाऊण तासात खिरेश्वर गाठले.वेळ संध्याकाळी:५.१५
     टोलार खिंड माथ्यावरून लव्हाळे गाव (जि.अहमदनगर)

गरम गरम जेवण करुन गाडीत स्थानबद्ध झालो.परतीच्या प्रवास सुरु केला अन आमच्याबरोबर कालपासून धोधो कोसळणाऱ्या पावसानेही विश्रांती घ्यायला सुरुवात केली होती.

महत्वाच्या नोंदी :
सुरवात : केळेवाडी शेवट:खिरेश्वर
मार्ग :केळेवाडी-सादडे घाट-कोकणकडा-गणेश गुहा-टोलार खिंड-खिरेश्वर 
एकूण चढाई उतराई :१५७० मीटर्स
श्रेणी :मध्यम

चढाई उतराईतील टप्पे:
वालीवरे:१७५ मीटर्स--केळेवाडी:१८० मीटर्स--सादडे घाट माथा:८२३ मीटर्स--कोकणकडा:११४४ मीटर्स--गणेश गुहा:११६४ मीटर्स--टोलार खिंड:९४६ मीटर्स--खिरेश्वर:६२९ मीटर्स (सर्वोच्च पॉईंट:१२१७ मीटर्स)
एकूण डोंगरयात्रा:१६.६ किमी


                                                             या ट्रेकचा नकाशा 

या ट्रेकचा विडिओ पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 


नोट:आजकाल बरेच ट्रेकर मंडळी जीपीएस वापरतात .वरील दिलेली माहिती ही सह्याद्रीत ट्रेक करणाऱ्या अनुभवी ट्रेकर्स ना उपयोगी पडू शकते म्हणून देत आहे. 

प्रसन्न वाघ 
वाइल्ड ट्रेक ऍडव्हेंचर