Saturday 23 June 2018

घोणदांड-खडसांबळे लेणी-डेऱ्या घाटांची उतराई चढाई

              जिमखोड्याच्या खिंडीत आप्पा..मागे तैलबैला
आप्पा..एक ४७ वर्षांचे तरुण गिर्यारोहक.आप्पा ज्या ट्रेकला असायचे तो ट्रेक,मग तो कितीही अवघड असो हसत खेळत पूर्ण व्हायचा.ट्रेकमध्ये ग्रुप ३०चा असो किंवा ५०,लहान असो किंवा थोर,पुरुष असो किंवा महिला सर्वांशीच हसत खेळत जमवून घेण्याचा अन सर्वाना मदत करण्याचा हातखंडा फक्त आप्पांकडेच होता.कोणताही ट्रेक पूर्ण झाल्यावर आप्पांशी मैत्री न झालेला सदस्य सापडणे तितकंच अवघड जितकं सह्याद्रीच्या घाटवाटा.
आप्पांशी मैत्रीही २ वर्षांपूर्वी नळीची वाट हरिश्चंद्रगडच्या अशाच एका अवघड घाटवाटेवर झाली अन मग कितीतरी डोंगरयात्रेत त्यांचा सहवास लाभला.सह्याद्रीत भटकंती करून सह्याद्रीमय होणं फार थोड्या जणांना जमत त्यात आप्पांना सह्याद्रीत लहान मुलांसारखं बागडताना पाहताना दमलेल्या सदस्यांचा थकवा दूर पळून जाताना बऱ्याचदा आम्ही जवळून पाहिलं होत.
अशा दिलखुलास,चिरतरुण आप्पांचं दि.५ जून २०१८ रोजी आपल्या सर्वांमधून निघून जाण ही मनाला चटका लावून जाणारी दुःखद घटना घडली.खाली केलेला ट्रेक हा आप्पांबरोबर केलेला शेवटचा ट्रेक होता.त्यांच्याबद्दल जेवढ लिहावं तेवढं कमीच आहे.बऱ्याच डोंगरयात्रा अधुऱ्या सोडून अनंतात विलीन झालेल्या आप्पांना भावपूर्ण श्रद्धांजली.
                   एकोले गावातून दिसणारा घनगड
दिवस १: २१ एप्रिल २०१८
संध्याकाळच्या सोनेरी किरणांमध्ये सोनपिवळ्या सळसळणाऱ्या गवतावरून तैलबैला उजवीकडे ठेवत जिमखोड्याच्या खिंडीकडे निघालो.एकोले ते केवणी पठार हा टप्पा तासाभराचा.ह्या टप्प्यात जिमखोड्याच्या खिंडीतून उत्तरेला तैलबैलाचे सुंदर दृश्य बघत कलत्या सूर्यनारायणाबरोबर खिंडीतून काढता पाय घेतला.२५-३० मिनिटांत केवणीच्या भव्य पठारावर पोहोचल्यावर मागे तैलबैला अन घनगड अगदीच बुटके भासतात.वेळ संध्याकाळी:६.३०
              केवणीच्या वाटेवरून मागे दिसणारा घनगड    
            जिमखोड्याच्या खिंडीजवळ भ्रमणमंडळ  
        जिमखोड्याच्या खिंडीपासून केवणीची वाट 
केवणीच्या भव्य पठारावर ढेबे मामांचे एकमेव घर.हे जोडपं बऱ्याच वर्षांपासून येणाऱ्या जाणाऱ्या डोंगरयात्रींचं अगत्य करत आहेत.ढेबे मामा अन आमची गट्टी तशी फार जुनी.२०१२ मध्ये घनगड-केवणी-नाळेची वाट-सुधागड-ठाकूरवाडी अन त्यानंतर २०१३ मध्ये पवनानगर-तिकोना-तुंग-घनगड-केवणी-नाणदांड-सुधागड-धोंडसे या डोंगरयात्रांच्या वेळी ढेबे मामांच्या अंगणात मुक्काम केला होता.ढेबे मामांच्या अंगणात शाका उतरवल्या तेव्हा पश्चिमेला क्षितिजावर श्यामरंगाच्या सुंदर छटा उमटायला सुरुवात झाली होती.जवळच असलेल्या पाण्याच्या झऱ्यावरून सर्व मंडळाने पाणी भरून आणले.

                       रम्य संध्याकाळी केवणी पठार
प्रसाद अन योगिताने पुण्यातून निघतानाच तांबडा पांढरा आणला होता.शाकाहारी मंडळींसाठी ढेबे मावशींनी मस्त पिठलं भात बनवलं.जेवणावर हात आडवा केला.भव्य केवणी पठारावर शतपावली करून पथाऱ्या पसरल्या.दूरवर घनगड पायथ्याला लावलेल्या वणव्यामुळे तेवढा भाग उजळून निघाला होता बाकी किर्रर्र अंधारात अंगणातील चांदणं बघत कधी झोप लागली कळालं पण नाही. 
दिवस २:२२ एप्रिल २०१८ 
सकाळी चहा घेऊन ढेबे मामांना सांगाती घेतलं.नाळेची वाट अन घोणदांड या वाटा केवणी पठारावरून दक्षिणेला उतरतात.काही पडकी घर,शाळा पार करून मोकळ्या पठारावर मळलेल्या वाटेवर झराझरा चालत अर्ध्या तासात घोणदांडेच्या माथ्यावर पोहोचलो.खाली कोकणातील नागशेत,नेणवलीतील टुमदार वाड्या दिसतात.समोर गाढवलोट,अंधारबनाची वाट पूर्वी केलेल्या डोंगरयात्रांची आठवण करून देत होती.पूर्वेला समान उंचीवर डेऱ्या घाटाचा माथा खुणवत होता. वेळ सकाळी:८

                        नाणदांड माथ्यावरून सुधागड दृश्य
                 घोणदांड वाटेवर लागणाऱ्या दगडाच्या राशी 
सुरुवातीला साधारण घसाऱ्यातून उतराई असून ग्रीष्मातील पानगळीमुळे पूर्ण पायवाट झाकली गेली होती.करकर आवाज करत २-३ टप्पे उतरल्यावर पश्चिमेला कड्यात खडसांबळे लेण्यांनी दर्शन दिले.या ठिकाणी साधारण सपाटी असून सोंड सोडून वाट डावीकडे वळते.(सोंडेवरून सरळ खाली उतरायला वाट नाही).समोर इवलासा घनगड आता उंचावर भासतो.१० मिनिटांच्या उतराई नंतर वाट गच्च जंगलात शिरते.डेऱ्या घटकडून येणारी मळलेली वाट शोधण तसं अवघड नाही पण तरीही थोडं इकडं तिकडं बघायची गरज पडू शकते.मळलेल्या वाटेवर क्षणभर विश्रांती झाली.वेळ सकाळी:९
                                 घोणदांड घाटाची वाट 

             घोणदांड घाटाची सोंड..इथून वाट पूर्वेला उतरते
इथून दक्षिणेला नेणवलीत किंवा पश्चिमेला खडसांबळेत उतरता येत.आम्ही खडसांबळे लेण्याकडे मोर्चा वळवला.सुंदर अशा पठारावरून जाणाऱ्या मळलेल्या वाटेने लेण्यांच्या पायथाला पोहोचणं तसं सोपं आहे.जंगलटप्पा सुरु झाला की बऱ्याचशा वाटा आपल्याला चकवू पाहतात त्यामुळे दिशा नीट लक्षात ठेवण उत्तम.घोणदांडेच्या पायथ्यातून लेण्या गाठायला पाऊण तास पुरे होतो.सुंदर अशा लेण्या अन स्तूप पाहून १५ मिनिटांतच डेऱ्या घाटाकडे निघालो.वेळ सकाळी:१०
                                खडसांबळे लेण्यांकडे वाटचाल 
आल्यावाटेने परत अर्धा तास चालल्यावर एक झाड बघून पोटोबा उरकायचा ठरलं.नेहमीप्रमाणे काकड्या,कलिंगड,कैऱ्या अन इतर नानाविध पदार्थ पोटात ढकलून पोटोबा शांत केला.ढेबे मामांना पुढची वाट विचारून टाटा केला.असाच पठारावरून वळसा घालत डेऱ्या घाटाच्या पायथ्याला वाट जात असावी असा अंदाज वाट उताराला लागताच फोल ठरला.पूर्वेला खाली असलेल्या ओढ्यात वाट उतरत होती.१०० मीटरची उतराई-चढाई वाढणार म्हणजे कडक उन्हात अन कोकणच्या उकाड्यात परीक्षाच की.सकाळपासून पाण्याचा स्रोत कुठेही न मिळाल्यामुळे जवळचे पाणीही मस्त कोमट झाले होते.ओढ्याच्या वरच्या बाजूला काही कोंडात पाणी तुडुंब होते पण त्याच्या उग्र वासामुळे त्याचा अंग,कपडे ओले करण्यासाठीच उपयोग करता आला.
                                  डेऱ्या घाटाकडे वाटचाल          
                          पायथ्यातून घोणदांड घाटाची सोंड
उघड्या बोडक्या छातीवरून सुरुवातीची चढाई आस्तेकदम करावी लागली.साधारण अर्धा तास तीव्र चढाई केल्यावर वरच्या पठारावर पोहोचलो.मागे घोणदांडेची सोंड सुंदर दिसते.थोडं विसावून पठारावरून पूर्वेला निघालो.१५ मिनिटांचा वळसा घातल्यावर डावीकडे डेऱ्या घाटाची वाट गवसली.वेळ दुपारी:१२.१५
              डेऱ्या घाटा सुरुवात..मागे घोणदांड घाटाची सोंड
डेऱ्या सारख्या दिसणाऱ्या डोंगरांमुळे या घाटाला डेऱ्या घाट म्हणतात.असेच बरेच डेरे या भागातील डोंगररांगेत दिसतात(नाणदांड,अंधारबन).वाट झक्क मळलेली असली तरी उभा चढ नक्कीच दम काढतो.एका सुरात चढाई करत पाऊण तासात कातळटप्प्याखाली पोहोचलो.भिंतीतून आडव्या जाणाऱ्या वाटेवर बऱ्याच पावट्या केलेल्या असल्या तरी डावीकडे असणाऱ्या दारीमुळे या टप्प्यावर काळजी घ्यावी.कातळटप्पा सोपा असला तरी पावसाळ्यात टाळणे उत्तम.सुरक्षा दोर फिक्स करायला जागा अशी नाही.काळजीपूर्वक हा टप्पा पार केल्यावर वाट परत उजवी घेते.
             डेऱ्या घाट कातळटप्पा..पावसाळ्यात टाळणे उत्तम                 
१५ मिनिटांचे २ टप्पे परत डावी-उजवी घेत माथ्यावर घेऊन जातात.डावीकडे केवणी पठार समान उंचीवर दिसते.भन्नाट वारा अंगावर घेत सकाळी केलेल्या घोणदांडेच्या सोंडेचे निरीक्षण केले.पायथ्यातून पाहिलेल्या सुळक्यांचे माथ्यावरून सुंदर दर्शन होते.
                         डेऱ्या घाटाच्या माथ्याजवळ 
                         माथ्याजवळून सुळक्याचे दिसणारे माथे
                                   आसनवाडीत पोहोचताना 
    निळू,प्रसन्न,आप्पा,सुरज,मंदार,जनार्दन,जगदीश सर,संदीप,कीर्ती,रसिका आणि योगिता
थोड विसावून एक वॉर्म उप चढ चढला अन सपाटी लागली.साधारण अर्ध्या तासात पायांना गती देत आसनवाडी गाठली.लिटरभर थंड पाणी पिऊन आत्मा शांत केला.ट्रॅव्हलर गावाबाहेर आलीच होती लागलीच स्थानबद्ध झालो.घुटके,भांबुर्डे मागे टाकत परतीचा प्रवास सुरु झाला होता. 
                                             या ट्रेकचा नकाशा 

घोणदांड घाट ट्रेकचा विडिओ पाहण्यासाठी खालील लिंक क्लीक करा 


या डोंगरयात्रेला जोडून खालील डोंगरयात्रा करता येईल

नोट:
१.उन्हाळ्यात पाण्याची सोय केवणी सोडल्यावर आसनवाडी गाठेपर्यंत कुठेही नाही.डेऱ्या घाटाच्या अलीकडे कोंडात पाणी मिळू शकेल पण शुद्धता तपासून प्यावे. 
२.डेऱ्या घाटातील कातळटप्पा सोपा असला तरी पावसाळ्यात धोकादायक.शक्यतो पावसाळ्यात डेऱ्या घाट टाळावा. 

महत्वाच्या नोंदी:
सुरवात:एकोले  शेवट:आसनवाडी
मार्ग:एकोले-केवणी-घोणदांड-खडसांबळे लेणी-डेऱ्या घाट-आसनवाडी
श्रेणी:मध्यम 
एकूण डोंगरयात्रा: १५.७किमी
वेळ:८ तास 

चढाई उतराईतील टप्पे:
एकोले(६३० मीटर्स)-जिमखोड्याची खिंड-(६२०मीटर्स)-केवणी(६१० मीटर्स)-घोणदांड माथा(५७० मीटर्स)-घोणदांड पायथा(१७६ मीटर्स)-खडसांबळे लेणी-(२१० मीटर्स)-डेऱ्या घाट पायथा-(१२० मीटर्स)-डेऱ्या घाट माथा(५८० मीटर्स)-आसनवाडी(६२५ मीटर्स)

प्रसन्न वाघ
वाईल्ड ट्रेक ऍडव्हेंचर

Friday 15 June 2018

घोडेजिन-भोरप्या घाटांची उतराई चढाई

पायथ्यातून भव्य सुधागड दृश्य
दिवस १:१२ मे २०१८
दूर खोलवर दिसणाऱ्या कोंडगाव धरणापलीकडे पेडली गाव दिवेलागणीच्या वेळेला हळूहळू उजळू लागले होते.डावीकडे दूरवर दिसणारा धूसर सरसगडाचा माथा बऱ्याच आठवणींना उजाळा देत होता.पश्चिमेला क्षितिजावर सूर्यास्ताचे लाल रंग पसरायला सुरुवात झाली अन वाघजाई घाटाच्या माथ्यावर बराच वेळ अंतर्धान पावलेली आमची चौकडी सूर्यनारायणाला पाठ दाखवत तैलबैला गावाकडे निघाली.
  सह्याद्री माथ्यावर निवांत सांजवेळी 
रोकडे मावशींकडे भात आमटीची आधीच सोय केल्यामुळे निश्चिन्त मनाने गावातल्या काही पिकलेल्या मंडळींबरोबर उद्याच्या डोंगरयात्रेबद्दल वार्तालाभ करण्यात आला.तैलबैलापासून कोकणात उतरायला वाघजाई,सवाष्णी(सुवासिनी),घोडेजिन,भोरप्या(उत्तरेपासून-दक्षिणेकडे) या घाटवाटा आहेत.वाघजाई आणि सवाष्णी या वाटा अजूनही बऱ्याच वापरात असून पूर्णपणे मळलेल्या आहेत.घोडेजिन आणि भोरप्या घाटाच्या वाटेला काही डोंगरयात्री सोडले तर कोणी जात नाहीत त्यामुळे या वाटा अजूनही अनवटच म्हणाव्या लागतील.
घोडेजिन घाट तर ठीक आहे पण भोरप्या कुठं आहे? काही खाणाखुणा सांगितल्यावर भोरप्याला स्थानिक लोक वाघुरधव किंवा वाघाची नाळ म्हणतात अन भोरप्या हे नाव कवचितच वापरात आहे असं कळलं. वाघुरधव का तर घाटाच्या पायथ्याला पाण्याचे डोह असून वाघ तिथं पाणी प्यायला यायचे किंवा या नाळेत वाघांचा वावर असायचा म्हणून वाघाची नाळ असो.असंही आमच्या चौकडीतील तीन वाघ उद्या या नाळेत वावरणार होतो.
सूर्यास्त पाहण्यासाठी वाघजाई घाटमाथ्याकडे वाटचाल
रोकडे मावशींच्या शेणाने सारवलेल्या घरात चुलीसमोर बसून गरम-गरम आमटी भातावर जो काही ताव मारला अहाहाहा मजा आली.तैलबैला गावात मुक्काम न करता गावाबाहेर पश्चिमेला मोकळ्या पठारावर मुक्काम करायचं आधीच ठरलं होत.शाका उचलून मस्त मोकळ्या पठारावर निरभ्र आकाशाखाली मनातलं चांदणं अनुभवत पथाऱ्या पसरल्या.मस्त गुलाबी थंडीत तैलबैला नजरेसमोर ठेवत स्लीपिंग बॅगमध्ये शिरलो.
 चुलीवरचे गरम गरम जेवण 
तैलबैलाच्या सानिध्यात निवांत क्षण  

दिवस २:१३ मे २०१८
कालच्या सुग्रास अन भरगच्च जेवणामुळे आपोआपच सकाळी लवकर जाग आली.मोकळ्या पठारावर आन्हिकं उरकायला जास्त कष्ट नाही पडले.रोकडे मावशींकडे नाश्ता उरकला.संदीप पाटील,आकाश सराफ,सारिका पाटील ह्या सह्यमित्रांची भेट अचानक झाली.ही मंडळी आज तैलबैला आरोहणासाठी आली होती.
घोडेजिन वाटेवरून मागे दिसणारा तैलबैला 
दशरथ मामांना घेऊन तैलबैलाकडे कूच केलं.१० मिनिटांत तैलबैलाची वाट सोडून पश्चिमेकडे निघालो.तैलबैला डावीकडे ठेवत काही वेळ चालल्यावर दक्षिणेला सुधागडाच भव्य पठार लक्ष वेधून घेत.डोळे बारीक केल्यास सुधागडावरील भोराई देवीच मंदीर सहजपणे दिसत.अर्ध्या तासात सवाष्णी घाटाच्या माथ्यावर पोहोचलो.सवाष्णी,वाघजाई या दोन घाटवाटा बऱ्यापैकी वापरात असल्यामुळे त्यांचा माथा गाठणं तसं अवघड नाही.काही वेळ सुधागड निरखून घोडेजिन माथ्याकडे निघालो.
सवाष्णी पासून डावीकडे १० मिनिटे आडवे गेल्यावर घोडेजिन घाटाच्या माथ्यावर पोहोचलो.भव्य सुधागड अगदीच पुढ्यात दिसतो.उजवीकडे धोंडसे गाव,सरसगड नजरेस पडतात.धोंडसे गावातून सुधागडला जाणाऱ्या महादरवाजाच्या वाटेचे सुंदर दर्शन घोडेजिन माथ्यावरून होते.डावीकडे केवणीच भव्य पठार अन नाणदांड घाटाची सोंड ओळखणं तस अवघड नाही.
 घोडेजिन माथ्यावरून दिसणारा भव्य सुधागड
घोडेजिन वाटेवर डांगे सर,प्रसाद अन निळू भाऊ 
नेहमीच्या डोंगरसोंडेवर असणाऱ्या घाटांसारखीच घोडेजिन घाटाची सुरुवात होती.तीव्र उताराच्या वाटेने उतराई सुरु केली.वाट जास्त वापरात नसल्याने घसारा बराच होता.ब्रेक लावत लावत १५-२० मिनिटांची उतराई केल्यावर पायावरचा ताण साधारण कमी झाला.एकूणच एवढा तीव्र उतार बघता दशरथ मामा:"इथून घोडी कशी काय जात असतील?एव्हडी बारीक वाट मला नाही वाटत घोडी जात असावीत?" आम्हीही इथून घोडी जाऊच शकत नाहीत यावर ठाम होतो.मग या वाटेला घोडेजिन का म्हणतात? याच उत्तर आम्हाला तासाभराने मिळालं.
 या सुळक्यांच्या डावीकडे गणपती खिंड आहे 
घोडेजिन माथ्यापासून तासभर उतराई केल्यावर एका मोठ्या ओढ्यात पोहोचलो.इथून सुधागड गाठायचा असेल तर उजवीकडे वळावं.साधारण तासाभरात महादरवाज्याने सुधागडला पोहोचता येईल.डावीकडे काही सुळके अन गणपती खिंड दिसते.नाळेची एक वाट डावीकडून या ओढ्यात उतरते याच नाळेच्या डाव्या बाजूने गणपती खिंड गाठायची होती.क्षणभर विश्रांती घेऊन नाळेत उतरलो.
नाळेतून लागलीच डावीकडे जंगलात शिरणाऱ्या अस्पष्ट वाटेने निघालो.पालापाचोळ्यातील अदृश्य वाटेने करकर आवाज करत नाळेच्या उजव्या बाजूला गेल्यावर साधारण वार्म-अप चढाई करत खिंड गाठली.खिंडीतून मागे घोडेजिन घाटाच्या सोंडेचे संपूर्ण दर्शन होते.डावीकडे इटुकला घनगड उंचावर दिसतो.
गणपती खिंडीतून पूर्वेकडे घनगड अन मारठाण्याचा डोंगर 
गणपती खिंडीतून घोडेजिन घाटाची सोंड
खिंडीतून डावीकडे एक झक्क मळलेली वाट जाते याच वाटेने आडवे जात भोरप्या घाटाच्या वाटेला लागायचा प्लॅन पुढच्या १० मिनिटांतच बदलावा लागला.वाट वापरात नसल्यामुळे की काय लयच अडचण पुढे होती.इथूनच एक वाट उत्तरेला एका नाळेत शिरते ही वाट कोणती बुआ? तर काही कातकरी लोकच या वाटेने माथा गाठतात तुम्हांला नाय जमायचं असं ठाकरवाडीतील मामांकडून नंतर कळालं.
प्लॅन बी नुसार मळलेल्या ऐसपैस वाटेने ठाकरवाडीकडे उतरून खालच्या मोठ्या ओढ्याला गाठायचं ठरलं.अर्ध्या तासात खालच्या पठारावर पोहोचलो अन सुधागडाच्या पूर्व कातळभिंतीचे सूंदर दर्शन झाले.तिवईचा वेढा डोंगर उंचावलेला दिसतो.ठाकूरवाडीची वाट सोडून डावीकडे ओढ्यात उतरायला २० मिनिटे पुरे झाली.
सुधागडाची पूर्व कातळभिंत
सुधागडाचा कडेलोट कडा
ओढ्याच्या काठाला बसलेल्या ठाकूरवाडीतल्या मामांबरोबर थोड्या गप्पा मारल्या.अंग ओल करून ओढ्याच्या काठाने मळलेल्या वाटेने पूर्वेला निघालो.साधारण चढ-उतार करत वाट ओढ्याच्या काठाने पुढे सरकते.काही वेळात डावीकडून एक नाळेची वाट येऊन मिळते.आधी सांगितल्याप्रमाणे या नाळेचा उपयोय फक्त कातकरी लोक करतात त्यामुळे वाट ही अशी नाहीच.पुढे एक तीव्र चढाई करून पठारावर पोहोचल्यावर भोरप्या घाटाची खिंड समोर दिसते.भोरप्याची खिंड तशी कमी उंचीची त्यामुळे तासाभरात माथा गाठू असा अंदाज बांधला.भर उन्हात भोरप्या घाटातला झाडोरा पाहून समाधान वाटले.भोरप्या घाटाची नाळ जिथं उतरते तिथेच छोटासा झरा आहे अन शांत सावलीही.कलिंगड खाऊन पोटोबा उरकला.वेळ:सकाळी:११.१५
      तिवई डोंगर
भोरप्या नाळेकडे वाटचाल
याच ठिकाणी बरेच पाण्याचे डोह आहेत जिथे वाघ पाणी प्यायला यायचे म्हणे म्हणून भोरप्या घाटाला वाघुरधव(वाघाचे डोह)किंवा वाघाची नाळ हे नाव स्थानिकांमध्ये प्रसिध्द आहे.जास्त उसंत घेता नाळेत प्रवेश केला.सुरुवातीला साधारण सपाटीने भक्कम दगडगोट्यांवरून चालल्यावर नेहमीसारखीच नाळेची चढाई सुरु होते.आजूबाजूला असलेल्या झाडोऱ्यामुळे अधून मधून येणारी वाऱ्याची झुळूक गारवा देत होती.नाळेतून उजवी डावी घेत काही सोपे कातळटप्पे चढून साधारण ३० मिनिटांत अर्धी चढाई पूर्ण झाली अन थोडा वेळ विसावलो.
पायथ्यातून भोरप्या घाट/वाघ नाळ/वाघुरधव  
भोरप्या घाट/वाघ नाळ/वाघुरधव सुरुवात  
भोरप्या घाट माथा जंगलटप्पा सुरुवात  
पुढच्या टप्प्यात झाडांचा ठणठणाट.तीव्र चढाई अन आग ओकणारा सूर्य त्यामुळे एकाच दमात धापा टाकत उंचावर दिसणार झाड गाठल.बाकीचे मंडळ येईपर्यंत १० मिनिटे मस्त आराम केला.इथून झक्क जंगलाची वाट सुरु होते.नाळेची वाट सोडून उजवी घेत जंगलात शिरलो.किर्रर्र जंगलातील १० मिनिटांची चढाई भोरप्या नाळेच्या उजव्या खांद्यावर घेऊन जाते.डावीकडे तैलबैलाचे सुंदर दर्शन होते.वेळ:दुपारी:१.१५
भोरप्या घाट माथ्यावरून तैलबैला दृश्य 
निळू,प्रसाद,डांगे सर अन दशरथ मामा
भोरप्या नाळ पाठीमागे ठेवत पूर्वेला जंगलात चढणाऱ्या वाटेने चढ चढायच्या आत संपला आणि पठारावर प्रवेश झाला.बरीचशी करवंद पोटात ढकलली.उत्तरेला जाणाऱ्या बैलगाडी रस्त्याने अर्धा तासात तैलबैला गाठलं तेव्हा तैलबैला किल्ल्याची प्रदिक्षणा पूर्ण झाली होती.


या डोंगरयात्रेचा संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील लिंक क्लीक करा

महत्वाच्या नोंदी:

सुरवात:तैलबैला  शेवट:तैलबैला
मार्ग: तैलबैला-घोडेजिन घाट-गणपती खिंड-भोरप्या घाट-तैलबैला
श्रेणी:मध्यम 
एकूण डोंगरयात्रा: ९.३ किमी
वेळ:७.३० तास 

चढाई उतराईतील टप्पे:
तैलबैला(६६० मीटर्स)-घोडेजिन माथा-(५९५ मीटर्स)-गणपती खिंड(३८० मीटर्स)-ठाकूरवाडी पायथा (११५ मीटर्स)-भोरप्या घाट पायथा-(२२० मीटर्स)-भोरप्या घाट माथा-(६४०मीटर्स)

प्रसन्न वाघ
वाईल्ड ट्रेक ऍडव्हेंचर

Sunday 6 May 2018

शेवत्या घाट-भेरंड नाळ उतराई चढाई

                                        शेवते घाट उतराई
या ट्रेकचा पूर्वार्ध बिंब नाळ-फणशीची नाळ  इथे वाचा
बिंब नाळ-फणशी नाळ रायगडाच्या घाटवाटांची उतराई चढाई

दिवस २:८ एप्रिल २०१८
भोर्डीतील हनुमान मंदिरात मुक्काम करण्याची आमची तशी दुसरी वेळ.मागच्या वर्षी पावसाळ्यानंतर शेवत्या-भेरंड नाळेचा प्लॅन काही कारणास्तव शेवत्या-मढ्या होऊन भोर्डीत मुक्काम पडला होता.आजची डोंगरयात्रा मोठी असली तरी अवघड नव्हती त्यामुळे जरा उशिराच डोळा उघडला.फ्रेश होऊन श्री.जंगम यांच्याकडे चहा घेऊन भोर्डीतून नेऋत्य दिशेला कूच केलं.वेळ सकाळी:७.३५
                            केळेश्वर देवराई/वनराई

भोर्डीच्या बाहेर असलेल्या गर्द वनराईत/देवराईत केळेश्वराचं सुंदर देवस्थान आहे.दर्शन घेऊन साधारण पश्चिमेला असलेल्या पहिल्या टेकडीकडे मोर्चा वळवला.एक ओढा ओलांडून बैलगाडी रस्त्याने साधारण ५ मिनिटे चालल्यावर काही घर लागतात.घरांच्या डाव्या बाजूने सोंडेवर चढाई सुरु केली.छान मळलेल्या वाटेने १९५ मीटरची खडी चढाई एका दमात पार करून माथा गाठला.इथपर्यंत येताना बऱ्याच ढोरवाटा चकवू पाहतात आपण मात्र पश्चिमेकडे तिरके चढत राहायचं.माथ्यावर सुंदर ठिकाणी टुमदार धनगरवाडा असून पश्चिमेला सह्याद्रीची मुख्य धार अन भिकनाळेची खिंड लक्ष वेधून घेते.काल रात्रीपासून मोबाइलला पहिल्यांदाच नेटवर्क मिळाल्याने काही फोनाफोनी करून निघालो.वेळ:सकाळी ८.४०
                              टुमदार धनगरवाडा 
    धनगरवाड्यापासून पश्चिमेला दिसणारी सह्याद्रीची मुख्य धार

धनगरवाड्यापासून पश्चिमेला दिसणाऱ्या खोगळीत उतरून सह्याद्रीच्या मुख्य धारेच्या पदरातून निघालो.भिकनाळ माथा बघून पलीकडे भलीमोठी मोठी दरी आहे याची कल्पनाही इथून येत नाही.एक कोरडा ओढा पार करून वाट जंगलात शिरते अन चढाई परत सुरु होते.धनगरवाड्यापासून इथवर यायला २० मिनिटे पुरे होतात.७० मीटरची घनदाट जंगलातील चढाई वासोट्याची आठवण करून देते.
     भिकनाळ माथा..या भागातील सर्वात उंच घाटवाट
    खोगळीतून मुख्य धारेकडे चढाई इथून सुरु होते

सह्याद्रीच्या मुख्य धारेवर वाऱ्याने स्वागत केले.दूरवर मागे हिंदवी स्वराज्यातले प्रचंडगड(तोरणा) आणि राजगड ताठ मानेने उंचावलेले दिसतात.धारेवरून दक्षिणेला दुर्गाचा कडा अन त्याचा उजव्या हाताला एकमेव झाड असलेलं छोटस पठार दिसत.शेवत्या घाटाची सुरुवात तिथूनच होते.दूरवर दिसत असल तरी धारेवरून सपाटीने १० मिनिटांत पठार गाठले.वेळ सकाळी:९.४५
                      तोरणा-राजगड सुंदर दृश्य 
            शेवते घाट माथा अन भेरंड नाळ 
    शेवते घाट माथा ..दूरवर सळसळत जाणारा दुर्गाचा कडा

लांबवर सळसळत जाणारा दुर्गाचा सरळसोट पश्चिम कडा अन त्याच्याखाली नाणेमाची लक्षवेधून घेते.दुर्गाचा कडा अन आमच्यामध्ये एक नाळ सरळ खाली ५२५ मीटर खाली उतरताना दिसते.हीच ती भेरंड नाळ.याच भेरंड नाळेचा शोध शेवते गावातून चढाई करताना घ्यायचा होता.दक्षिणेला खोलवर इवलंसं शेवते गाव निपचित पहुडलेलं दिसत होत.क्षणभर विश्रांतीनंतर शेवते गावाकडे उतरणाऱ्या सोंडेवर आरूढ झालो.शेवते घाटाची सोंड मध्यम उताराची असून कड्याचा आतल्या बाजूने वाट असल्याने पळतच उतरलो.अर्ध्या तासात ३०० मीटर उतराई करून एका झाडाखाली विसावलो.बिरवाडीतुन काही ग्रामस्थ गुगळशीकडे चालली होती.रामराम करून भेरंड नाळेची चौकशी केली तर वाट आहे असं ऐकलंय पण कधी गेलो नाही असं कळलं.वेळ: सकाळी १०.३०
                         शेवते घाट उतराई 
     शेवते घाट अर्धा उतरल्यावर मागे दिसणार दृश्य

खालच्या टप्प्यात बऱ्याच ठिकाणी शेवते घाट बांधून काढलेला दिसतो.शेवते घाटाचा उपयोग पूर्वीच्या काळात अन अजूनही बऱ्यापैकी होत असल्याचे हे प्रतीक होते.२० मिनिटांत शेवते गाठून एका घराच्या थंडगर ऐसपैस ओसरीवर विसावलो.नेहमीप्रमाणे याही गावातील तरुण मंडळी कामानिमित्त मुंबई किंवा पुण्याला स्थायिक त्यामुळे गावात फक्त म्हातारी मंडळीच शिल्लक.डांगे सरांनी आजीबाईंकडून १-२ हांडे पाणी जमवलं.सुंदर,टुमदार अन भव्य घरं असूनही शेवते गावात नीरव शांतता होती.चाऊ-माऊ-खाऊ खाऊन पोटोबा शांत केला.काही मंडळींनी कैऱ्या,टरबुजावर हात आडवा करत पोटोबा उरकला.कोकणातल्या उकाड्यात येणारी एखादी वाऱ्याची झुळूक सुखदायी होती.अर्धा तास आराम करून शाका उचलल्या.वेळ:११.४५
               शेवते घाट-खालचा टप्पा
     शेवते गावातून दिसणारे शेवत्या-भेरंड नाळेचे दृश्य

गावात कोणालाच भेरंड नाळेबद्दल माहिती नव्हतं त्यामुळे वाटाड्याचा विचार सोडून दिला.काही ग्रामस्थानी भेरंड नाळ हे नाव तुम्हाला कस माहित म्हणून तोंडात बोटेही घातली असो.तळपता सूर्यनारायण डोक्यावर घेऊन उत्तरेकडे दूरवर दिसणाऱ्या नाळेकडे निघालो.शेताडातून आडवे तिडवे जात नाळ जिथं उतरते तो पायथा गाठायचा प्लॅन होता.शेवते माग पडलं अन नाणेमाचीची मळलेली मोठी वाट पायाखाली आली.गच्च रानव्यात शिरल्यावर उन्हापासून सुटका झाली.पाऊण तासात भेरंड नाळ माथा डावीकडे उंचावर दिसला.नाणेमाचीची वाट सोडून डावीकडून येणाऱ्या नाळेत शिरलो.वेळ:दुपारी १२.५०
           नाणेमाची वाटेवर लागणारे दाट जंगल
               नाणेमाची वाटेवरून दिसणारी भेरंड नाळ
      टळटळीत उन्हात भेरंड नाळेकडे वाटचाल

नाळेतील दगड तापल्यामुळे चढाई तितकीशी सोपी नव्हती.भेरंड नाळेच्या माथ्यापासून मध्यापर्यंत दाट जंगल दिसत होते.नेमका पायथ्याला झाडाचा ठणठणाट.अर्ध्या तासाने एका नॆसर्गिक छपराखाली आसरा घेतला. थंडगार हवा अंगावर घेऊन पुढे निघालो.नाळेतून वाट अशी नव्हतीच.गचपण टाळून कधी डावी-कधी उजवी घेत अर्ध्या तासात जंगलात शिरलो.भयंकर वाढलेल्या झाडीतून वाट काढत एका मोठ्या झाडाखाली ठाण मांडलं.तासाभरात बरंच पाणी उत्सर्जित झाले होते.कलिंगड खाऊन अन थोडा आराम करून शरीर थंड केली.वेळ:दुपारी २
                        नॆसर्गिक छप्पर 
                    नॆसर्गिक छपराखाली आसरा
       गचपणातून मार्ग काढताना..खाली नाणेमाची

भयंकर गचपण अन रुंद असलेल्या नाळेत उजवीकडून,डावीकडून की मधून चढायचं असा सारखा प्रश्न पडत होता.मधून चढत १५-२० मिनिटं कारवी साफ करत जंगलाच्या वरच्या टप्प्यात पोहोचलो.माथा आता नजरेच्या टप्प्यात होता.डावीकडे जात कातळभिंत आल्यावर त्याच्याकडेने परत उजवी घेत घसाऱ्यातून नाळेच्या उजव्या बाजूला पोहोचलो.कमी अडचणीची अन दगडाची वाट गवसली अन वेग वाढला.वाऱ्याची झुळूक अंगावर घेत छोट्या कातळटप्प्याच्या खाली पोहोचलो.इथे कोणीतरी लाकडी बेचकी बसवून सोय करून दिलेली आहे.कातळटप्यानंतर वाट उजवीकडून असून थोडा घसारा आहे.कारवी अन मिळेल ते झाड पकडत माथा गाठला.वेळ दुपारी:३.४०
       भेरंड नाळ-माथ्याजवळ डावीकडे कातळभिंत आल्यावर उजवी घ्यावी 

     भेरंड नाळ-चिटुकला कातळटप्प्यावर प्रसाद अन डांगे सर 
     भेरंड नाळेच्या माथ्याजवळून मागे वळून पाहताना..निवांत क्षण 
     भेरंड नाळेच्या माथ्याजवळील घसारायुक्त टप्पा 

भेरंड नाळेच्या माथ्यावर ठळक पायवाट असून पूर्वेला गुगुळशी तर पश्चिमेला शेवते आणि भोर्डीला जायला वापरात आहे.डावीकडे छोट टेपाड चढून माथ्यावर पोहोचलो.सकाळी इथूनच शेवत्या घाटाची उतराई केली होती.सकाळपासून भक्कम जेवण झालेलं नव्हतं त्यामुळे परत एकदा च्याऊ-माऊ-खाऊ  पोटात ढकलला.सकाळी आलेल्या वाटेने भोर्डीकडे झपाट्याने निघालो.बऱ्यापैकी उतराई अन सपाटीने वाटचाल असल्याने एका दमात धनगरवाडा गाठला.माथ्यावरून भोर्डी दृष्टीक्षेपात आले.अर्ध्या तासात हनुमान मंदिर गाठून समोरच असलेल्या नळावर अंघोळी उरकल्या.फक्कड चहा घेऊन तरतरी आली.गावकऱ्यांना रामराम करत भोर्डी सोडलं तेव्हा सह्याद्रीच्या रांगा श्यामरंगात बुडत होत्या.
     डावीकडून-प्रसन्न,मिलिंद सर,डांगे सर,विनायक,निळू,प्रसाद..फोटो:संदीप 

नोट:
१.शेवत्या घाटाचा माथा भोर्डीतून २ तासावर (६ किमी)असल्यामुळे भोर्डीतून सकाळी लवकर सुरुवात करावी.
२.उन्हाळ्यात शेवत्या-भेरंड नाळ डोंगरयात्रेत फक्त शेवते गावात पाण्याची सोय. 
३.भेरंड नाळेबद्दल फारसं लिखाण किंवा माहिती उपलब्ध नाही.नाणेमाचीच्या वाटेवर भेरंड नाळ एका ओढ्यात उतरते तिथून चढाई सुरुवात करावी.
४.बिंब नाळ-फणशी नाळ-शेवत्या-भेरंड नाळ डोंगरयात्रा वेळेत पूर्ण करण्यास प्रसादच्या प्रभावी नियोजनाचा मोलाचा वाटा. 

महत्वाच्या नोंदी :
सुरवात:भोर्डी  शेवट:भोर्डी 
मार्ग: भोर्डी-शेवते घाट-शेवते-भेरंड नाळ-भोर्डी
श्रेणी:मध्यम
एकूण डोंगरयात्रा: १८.९ किमी
वेळ:१०.१५ तास

चढाई उतराईतील टप्पे:
भोर्डी (६६० मीटर्स)-धनगरवाडा-(८५८ मीटर्स)-शेवते घाट माथा(९०० मीटर्स)-शेवते गाव (३४० मीटर्स)-भेरंड नाळ पायथा-(३७३ मीटर्स)-भेरंड नाळ माथा-(८६२ मीटर्स)

प्रसन्न वाघ
वाईल्ड ट्रेक ऍडव्हेंचर