Saturday, 17 June 2017

घोडेनाळ-चीपेचं दार-रेडेखिंड-दापसरे

                घोडनाळेकडे प्रस्थान 

या ट्रेकचा पूर्वार्ध इथे वाचा

 दिवस ३:३० एप्रिल २०१७
आजचा पल्ला थोडासा मोठा असल्याने पहाटे ५.३० वाजताच उठून आन्हिकं उरकली.प्रजेश भाऊंना नाश्ताल्या मॅग्गी हवी होती पण अचानक प्लॅन बदलून पोहे करायचं ठरल्याने प्रजेश भाऊंनी रुसून काही न खाताच ट्रेक करायचा ठरवलं असो.सगळी आवरा आवार करून गाडीत सामान ठेऊन सकाळी ७.३० ला धामणहोळच्या दक्षिणेला असलेल्या घोडनाळेकडे प्रस्थान केले.
                   सकाळची पेटपूजेची तयारी 
    भ्रमणमंडळ..डावीकडून निलेश दीपिका मामा योगिता प्रजेश श्री पूजा प्रसन्न..फोटो प्रसाद 

२०-२५ मिनिटे शेताडातून चालल्यानंतर वाट दाट जंगलात शिरते.चांगली दाट जंगलातली वाट वासोट्याची आठवून करून देते.रस्त्यात बऱ्याच ठिकाणी माथ्यावरून येणाऱ्या ओढ्यावर छोटे बंधारे बांधलेले दिसतात ते पार करत वाट आता सह्या माथ्याकडे चढत जाते. १० मिनिटात हा टप्पा पार करून मोठ्या ओढ्याचा पात्रात पोहोचलो.पावसाळ्यात हा ओढा रोद्र असू शकेल.
क्षणभर विश्रांतीनंतर पुढच्या १० मिनिटात माथा गाठला.ऐसपैस कडा पाहता हा हरिश्चंद्रगडाचा मिनी कोकणकडा म्हणता येईल.समोर ठिपठिप्या घाट अन तेल्याच्या नाळीचा डोंगर दिसतो.खाली दूरवर जिते ओळखू येते.डावीकडे संपूर्ण घोडेनाळीच दर्शन होत. वेळ सकाळी:८.४०
         हा ओढा पावसाळ्यात ओसंडून वाहत असणार
घोडेनाळ घाट सुरुवात
    घोडेनाळ घाट सह्यकडा..समोर ठिपठिप्या घाट,तेल्याची नाळ 
कड्यावर फेरफटका मारून डावीकडे दाट जंगल असलेल्या घोडेनाळीत प्रवेश केला.श्री.शेडगे मामा अन प्रसाद यांनी मांझी मॅनची जबाबदारी घेत अडचणीचा रस्ता साफ करायला सुरुवात केली.घोडेनळीची वाट हि डाव्या बाजूने सुरु होऊन काही मिनिटांत नळीच्या मधून उतरते.१५-२० मिनिटे खाली उतरल्यावर वाट जंगलाबाहेर पडून समोरच दृश्य उघड होत.आता वरदायीनी मातेचा शोध सुरु झाला.बरीच अडचणीची वाट उतरून १० मिनिटातच वरदायीनी मातेच्या ठिकाणाजवळ पोहोचलो.बऱ्याच घंटा इथे अडकवलेल्या आहेत.दर्शन घेऊन क्षणभर विश्रांती झाली.वेळ सकाळी:१०
   घोडेनाळ घाट..झाडीभरला टप्पा
 वरदायिनीमाता देवस्थान घोडेनाळ 
    वरदायिनीमाता देवस्थान नंतर डोंगराला वळसा घालणारी वाट
आता वाट उजवीकडे वळून पूर्ण डोंगराला वळसा घालत कुर्डूपेठ कडे जाते. इथून पुढची वाट चांगली मळलेली आहे त्यामुळे चुकण्याची शक्यता नाही. साधारण अर्धा तास चढ उतार करत चीपेच्या दाराच्या बरोबर खाली पोहोचलो तरी वर चढणारी वाट दिसेना म्हणून मामा ,प्रसाद अन निलेश वाट शोधायला गेले. मोठं शेताचं पटांगण अन भव्य असं उंबराच झाड बघून इथंच पोटोबा शांत करायचं ठरलं.योगिता,पूजा अन दीपिका ने च्याऊ माऊ खाऊ(भेळ) बनवायला सुरुवात केली. योगिताने आणलेल्या टप्परवेअर च्या यंत्राने कांदा,कैरी,टोमॅटो यांच्या काही क्षणात चिंध्या करत बराच वेळ वाचवला.१० मिनिटात भेळ तयार तोपर्यंन्त वाट शोधून वाटाडे पण परत आले. भेळ,बाकरवडी अन इतर च्याऊ माऊ खाऊ पोटात ढकलून चीपेचं दार चढायला मंडळ तयार झाले.वेळ सकाळी :११.३०
 चाऊ माऊ खाऊ 
                        चीपेचं दार घाट 
(चीपेचं दारासाठी कुर्डूपेठकडे जाताना मोठं उंबराच झाड अन सपाट शेत लागत तिथून उजवीकडे चालत गेल्यावर वाट जंगलात वर चढते)पहिला ५-७ मिनिटांचा झाडीभरला टप्पा पार केल्यावर पूर्ण घाटमाथा येईपर्यंत सावली नाही.चीपेच्या दाराची वाट हि कुशलतेने डोंगऱ्याच्या छातीवर बनवलेली असल्याने बऱ्याच ठिकाणी अरुंद असून दरीच एक्सपोजर आहे त्यामुळे थोडीफार काळजी घेणं कधीही चांगलं.डाव्या बाजूला कुर्डूगड अन कुर्डूपेठ छान दिसतात.३५ मिनिटात माथा गाठला. 
माथ्यावर एक झाड बघून भ्रमणमंडळ विसावलं.सकाळी धामणहोळ सोडल्यापासून पाण्याचा स्रोत वाटेत कुठेच नसल्यामुळे सर्वांकडे असलेलं पाणी थोडंफार कोमट झालं होत.दापसरेच्या वाटेवर पुढच्या अर्ध्या तासावर पाणी मिळू शकेल पण शाश्वती नाही असं मामानी म्हंटल्यावर परत धामणहोळ ला जाऊन गाडीने दापसरे गाठायचं का यावर चर्चा सुरु झाली.चर्चेअंती आहे तेवढ्या पाण्यात पुढे जायचा निर्णय घेण्यात आला.मामानी पाण्याचं ठिकाण दाखवून तसंच धामणहोळ गाठतो म्हणल्यावर सर्व शंका संपल्या अन मोर्चा दापसरे कडे वळवण्यात आला.वेळ दुपारी:१२.४५
            चीपेच्या दाराची वाट..मागे कुर्डूगड 
     चीपेच्या दाराने माथा गाठून या पठारावरून धामणहोळ,दापसरे अन घोडेनाळला जाता येते 
सकाळी आलेलो घोडेनाळची वाट सोडून पूर्वेला असणाऱ्या डोंगरावर चढणारी वाट धरली.कुर्डूपेठेतले लोक अजून पण या वाटेने दापसरे गोंडखेल ला जातात त्यामुळे वाट चांगलीच वापरात आहे.१५-२० मिनिटांचा चांगला चढ चढल्यावर वाट सपाटीला लागते.पाण्याचा झरा आटल्यामुळे पाणी काही सापडलं नाही.इथून साधारण ३०-४० मिनिटांवर रेडेखिंडीनंतर ढेबेंचा वाडा आहे त्यामुळे तडक पुढे निघालो अन रेडेखिंड गाठली.वेळ दुपारी:२.१५
रेडेखिंड विसाव्यासाठी उत्तम जागा आहे.रेडेखिंडीनंतर ढेबेंचा वाडा हाकेच्या अंतरावर आहे.वाड्यावर पोहोचून पाण्याची कमतरता भरून काढली.मामानी पण थोडं विसावून आमचा निरोप घेतला.त्यांच्याकडे ड्राइव्हरला दापसरेला या हा निरोप देऊन मामांना टाटा केला.ढेबेंचा वाड्यापासून फारतर ४० मिनिटांत दापसरेत पोहोचू अन ड्राइव्हर यायला कमीतकमी रात्रीचे ८ वाजणार या हिशोबाने आम्ही तिथेच आराम करून उन्ह खाली गेल्यावर निघू असा ठराव केला.वेळ दुपारी३

वाड्यामागे असलेल्या झाडाखाली पथाऱ्या टाकल्या अन ४ पर्यंत झोपायचा प्रयन्त करण्यात आला.नेहमीप्रमाणे योगिता ने ढेबे मावशीबरोबर गट्टी जमवत अजून एक नातं जोडून घेतलं.आजपर्यंत सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात फिरताना अशे बरेचसे नातेवाईक तिने जोडले आहेत. 
 रेडेखिंड 
            ढेबे वाड्यापासून मागे रेडेखिंड
                ढेबेवाडा अन ढेबे मावशी 
साधारण ५ ला आम्ही दापसरेकडे निघालो.उजवीकडे ठिपठिप्या घाटाचं सपाट पठार दिसत अन समोर दापसरे,घोलची खिंड अन पानशेत-घोल डांबरी रस्ता.तीव्र उताऱ्याचा वाटेने १५ मिनिटांत एक ओढा पार करून पानशेत-घोल डांबरी रस्त्यावर पोहोचलो.डांबरी रस्त्याने चालत दापसरे गाठले.वेळ संध्याकाळी:६.१५
दापसरे गावात जेवणाची ऑर्डर देऊन उद्यासाठी वाटाड्या मिळतोय का चौकशी केली तर गावात फक्त म्हातारी मंडळी उरलेलं असल्यामुळे कोणीही तयार नाही.उद्या घोल गावी जाऊन वाटाड्या बघू इति प्रसाद.गावाबाहेर असलेल्या झऱ्यावर पाणी भरून फ्रेश झालो. 
              ढेबेवाड्यापासून दापसरेकडे वाटचाल
               दापसरेत पोहोचताना भ्रमणमंडळ
              दापसरेतील शुद्ध पाण्याचा झरा 
ड्राइव्हर ला दापसरे फाटा सापडेल कि नाही या काळजीत पुन्हा पानशेत-घोल रस्त्याला आलो.जेवणाला वेळ होता म्हणून छोटी शेकोटी करून गप्पांचा फड रंगला. गाडी यायला ९ वाजले.चविष्ट अशी ज्वारीची भाकरी अन बटाट्याची आमटी,भात तृप्तीचा ढेकर येईपर्यंत खाल्ला. प्रजेश भाऊ ज्यांनी कि सकाळी नाश्ता नव्हता केला यांनी रुसवा फुगवा बाजूला सारत भाकरीवर भाकरी रचवल्या. तसा हा गाडी तामिळनाडूचा पण याला मराठमोळी भाकरी फार आवडते.
गावात असेलेल्या शाळेजवळ हनुमानाच्या मंदिरात रात्रीसाठी आसरा घेतला.पथाऱ्या पसरून एका रांगेत सर्व जण आडवे झालो. वेळ रात्री:१०.३०

या पूर्ण ट्रेकचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा

                   ट्रेकचा नकाशा..निलेश वाघ च्या सौजन्याने  

या ट्रेकचा उत्तरार्ध इथे वाचा

महत्वाच्या नोंदी :
सुरवात : धामणहोळ  शेवट : दापसरे 
मार्ग : धामणहोळ-घोडेनाळ-चीपेचं दार-रेडेखिंड-दापसरे 
एकूण चढाई उतराई :७७५मीटर्स 
श्रेणी :सोपी 


चढाई उतराईतील टप्पे:
धामणहोळ :६२५ मीटर्स  ---घोडेनाळमाथा--७४० मीटर्स--चीपेचं दार सुरवात:५१० मीटर्स--चीपेचं दार माथा:७५५ मीटर्स--ढेबे वाडा(रेडेखिंड)--८७०मीटर्स--दापसरे--७४० मीटर्स=एकूण ७७५ मीटर्स 

नोट:आजकाल बरेच ट्रेकर मंडळी जीपीएस वापरतात.वरील दिलेली माहिती हि सह्याद्रीत ट्रेक करणाऱ्या अनुभवी ट्रेकर्स ना उपयोगी पडू शकते म्हणून देत आहे. 

प्रसन्न वाघ 
वाइल्ड ट्रेक ऍडव्हेंचर 

1 comment:

  1. छान माहिती . धन्यवाद. आपला आभारी. संतोष भालेराव

    ReplyDelete