Saturday, 17 June 2017

तेल्याची नाळ-ठिपठिप्या घाटाची उतराई चढाई

    चौथ्या दिवसाची सुरुवात..योगिता,पूजा,पोळेकर मामा,निलेश,श्री,दीपिका,प्रजेश,प्रसन्न,प्रसाद 

या ट्रेकचा पूर्वार्ध इथे वाचा 

दिवस ४:१ मे २०१७
सकाळी ६.३० ला उठून गावाबाहेर असलेल्या झऱ्याजवळ आलो. भ्रमणमंडळाने चौफेर फिरून सकाळचे कार्यक्रम उरकली.चूल मांडून चीज मॅग्गी अन चहा बनवण्यात आला (प्रजेश भाऊ खुश).आवरा आवार करून घोल च्या रस्त्याला लागलो. ४ किमी चे अंतर १० मिनिटात पार करून घोलमध्ये गाडी थांबवली. 
                     प्रसाद अन श्री.पोळेकर मामा
समोर गावकऱ्यांची  लगबग चालू होते.एक मामा समोरून येत होते त्यांना विचारलं तेल्याची नाळ अन ठिपठिप्या घाट करायचा आहे कोणी वाटाड्या मिळेल का? क्षणांतच श्री पोळेकर मामांनी स्वतः यायची तयारी दर्शवली.वयाची साठी ओलांडली असली तरी काटक अन रुबाबदार असं त्यांचं रूप पाहता आज भटकंतीत विशेष मजा येणार म्हणून भ्रमणमंडळ खुश,कारण अशा अनुभवी गावकऱ्यांना घाटवाटांची अन सभोवतालच्या परिसराची खडानखडा माहिती असते.पोळेकर मामा ५ मिनिटांतच कोयता अन काठी घेऊन आले अन आम्ही तेल्याच्या नाळेकडे प्रस्थान केले. वेळ सकाळी ८.२५
                  तेल्याच्या नाळीकडे वाटचाल 
घोलमधून पश्चिमेकडे जाणाऱ्या वाटेने निघालो.काही वेळातच कुंभ्या घाटाचा रस्ता सोडून उजवीकडे दिसणाऱ्या खिंडीकडे वळालो.छान मळलेल्या वाटेने एक जंगलटप्पा चढून खिंड गाठली. वेळ सकाळी:९ क्षणभर विश्रांतीत मामानी माहिती दिली,खाली कोकणात तेलाचे घाणे असल्यामुळे लोक या मार्गाचा वापर करत असत म्हणून या वाटेला तेल्याची नाळ म्हणतात. 
    क्षणभर विश्रांती तेल्याची नाळ सुरुवात 
नाळ उतरायला सुरुवात केली उतार जास्त तीव्र नाही अन मोठाले दगड पण नाहीत त्यामुळे उतराई सुखकारक होती. १० मिनीटात डोंगराच्या कड्यात असलेल्या छोटयाश्या झऱ्याजवळ आलो. थंडगार पाणी पिऊन तृप्त झालो. दूरवर परवा केलेल्या कुर्डुगडाने दर्शन दिले. पुढच्या १५ मिनिटांत चांगल्या बांधलेल्या वाटेने सपाटीला पोहोचलो. इथून डावीकडची वाट बोरवाडीला जाते आम्ही उजवीकडची वाट धरली. वाटेत आमसुलाच्या झाडावरून पोळेकर मामांनी बरेच आमसूल काढून दिले.डोंगराला वळसा घातला अन तेल्याची नाळ नजरेआड करत काही वेळातच कुंभळमाचीत पोहोचलो. वेळ सकाळी:१०
         तेल्याची नाळ सुरुवात 
                 डोंगराच्या कड्यात असेलला झरा
          कुंभळमाचीत पोहोचताना..मागे तेल्याची नाळ
            ताजे आमसूल थेट झाडावरून 
गावात गावकऱ्यांशी नमस्कार चमत्कार करून पाणी भरून घेतले.वाडीबाहेर एक छोटीशी शाळा आहे.आज १ मे असल्यामुळे २ शिक्षक निकालासाठी तिथे आले होते.शाळेत विद्यार्थी पण दोनच.त्यांच्याशी गप्पा मारून ठिपठिप्या घाटाकडे वाटचाल सुरु केली.
                            कुंभळमाचीतील शाळा
साधारण १५-२० मिनिटे उत्तरेला डोंगराला वळसा घालत ठिपठिप्या घाट ज्या नळीतून उतरतो त्याच्या डाव्या बाजूच्या डोंगरधारेखाली पोहोचलो. १५-२० मिनिटांचा तीव्र चढ चढून डोंगरधारेच्या नाकाडावर पोहोचलो. मंद वाऱ्याची झुळूक त्या टळटळीत उन्हात सुखकारक होती.डावीकडे काल परवा केलेल्या कुर्डूगड,घोडेनाळ अन चीपेचं दाराने दर्शन देऊन आठवणी जाग्या केल्या.आता वाट उजवीकडे वळून नाळेत शिरते. इथेच सुरुवातील छोटस पाण्याचं कुंड आहे त्यामध्ये डोंगरातून पाणी झिरपून ठिप ठिप पडत राहते म्हणून या घाटाला ठिपठिप्या घाट असे नामकरण झालेले आहे.इथे मधमाश्यांची पोळी असल्यामुळे शांततेत हा टप्पा पार केला. वेळ सकाळी:११.४०
    ठिपठिप्या घाटवाटेवरून कुर्डूगड,चीपेचं दार,घोडेनाळ
        पाण्याचं कुंड..ठिपठिप्या घाट
आता वाट उजवीकडे नळीत शिरली अन उन्हाच्या तडाख्यापासून सुटका झाली.झाडीभरला अर्धा तासाचा चढाई टप्पा पार करून नळीच्या शेवटी पोहोचलो. मागे वळून पहिले तर खोलवर जिते गाव रखरखीत उन्हात शांत पहुडले होते. उजवीकडे वळून पायऱ्यांचा छोटा कातळटप्पा पार करत माथा गाठला.वेळ दुपारी:१२.२०
      ठिपठिप्या घाट शेवटचा टप्पा..खाली कुंभळमाची,दूरवर जिते गाव
         ठिपठिप्या घाट शेवटचा टप्पा
                  ठिपठिप्या घाटमाथा  
सह्यमाथ्यावर भरउन्हात भन्नाट वारा अंगावर घेत भ्रमणमंडळाचा एक ग्रुप फोटो घेण्यात आला.अडीच दिवसात ६ घाटवाटा अन १ किल्ला सर करून महाराष्ट्रदिन साजरा केल्यामुळे भ्रमणमंडळ खुश.लागलीच दापसरेकडे मोर्चा वळवला अन धोपट मार्गाने पानशेत-घोल रस्ता गाठला.पोळेकर मामांना परत घोलळा पोहोचवून बस परत आली तोपर्यंत मंडळ फ्रेश होऊन टेकऑफला रेडी. पानशेत ला पोहोचे पर्यंत सगळ्यांच्या पोटातले कावळे पूर्ण ताकतीने ओरडू लागले होते.हॉटेल संस्कार मध्ये मिसळी,भेळी,वडापाव ,ताक अन अजून काय काय च्या भरमसाठ ऑर्डरी देऊन पोटधरून उठावे लागेल या स्थितीत पोहोचेपर्यंत हादडण्यात आले.संध्याकाळी ५च्या मुहूर्तावर पुण्यात पोहोचलो.बऱ्याच दिवसांनी अशी ३ दिवस भटकंती करायला मिळाल्यामुळे आज शांत समाधानी झोप लागणार यात शंकाच नव्हती. 
    ६ घाटवाटा अन १ किल्याची डोंगरयात्रा ३ दिवसात पूर्ण 

या पूर्ण ट्रेकचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा

        ट्रेकचा नकाशा ..निलेश वाघ च्या सौजन्याने

महत्वाच्या नोंदी :
सुरवात : घोल शेवट : दापसरे 
मार्ग : घोल -तेल्याची नाळ-कुंभळमाची -ठिपठिप्या घाट-दापसरे 
एकूण चढाई उतराई :७३५ मीटर्स 
श्रेणी :सोपी 

चढाई उतराईतील टप्पे:

तेल्याची नाळ :
घोल:६७५ मीटर्स--तेल्याची नाळ सुरुवात--७७० मीटर्स--कुंभळमाची:४५० मीटर्स=एकूण ४१५ मीटर्स

ठिपठिप्या घाट :
कुंभळमाची:४५० मीटर्स--ठिपठिप्या घाटमाथा:७५५ मीटर्स--दापसरे:७४० मीटर्स=एकूण ३२० मीटर्स 

नोट:आजकाल बरेच ट्रेकर मंडळी जीपीएस वापरतात .वरील दिलेली माहिती हि सह्याद्रीत ट्रेक करणाऱ्या अनुभवी ट्रेकर्स ना उपयोगी पडू शकते म्हणून देत आहे. 

प्रसन्न वाघ 
वाइल्ड ट्रेक ऍडव्हेंचर 

7 comments: