Friday 2 February 2018

गायनाळ-निसणी रायगडाच्या घाटवाटांची उतराई चढाई

   चांदर गावातून पलीकडे लिंगाणा,रायलिंग पठार सुंदर दृश्य 

दिवस १:२० जानेवारी २०१८
बऱ्याच वर्षांपूर्वी रायलिंग वर उभे राहीलो असता अभेद्य लिंगाणा जसा डोळ्यात भरला होता तसाच लिंगाण्याच्या उत्तरेला असलेली साडीची चुण्या पडावी अशी सरळसोट कडे असलेली डोंगररांग मनात घर करून बसली होती.बऱ्याचदा बोराट्याच्या नाळेने रायगड जवळ करताना पाने गावातून या डोंगरांगेच्या पायथ्याला स्पर्श झाला होता.याच रांगेतून उतरणाऱ्या गायनाळ अन निसणी वाटेचा बेत ठरला अन दुपारी च्या सुमारास भ्रमणमंडळ चांदरच्या वाटेला लागले.
                             शिरकाई देवीच पुरातन मंदीर 
पानशेत धरणाला डावीकडून वळसा घालत शिरकोली गावात पोहोचलो.शिरकोलीत शिवकालीन शिरकाई देवीच जीर्णोध्दारीत मंदीर असुन पुरातन मंदिराचा कळस पानशेत धरणाच्या पाण्यातून दर्शन देत होता.माणगाव सोडल्यावर डांबरी रस्त्यानेही साथ सोडली.डावी घेत कच्च्या रस्त्याने धुळीचे  वादळ उठवत डिग्याला पोहोचलो.इथून खाली चांदर गाव शांत पहुडलं होत.आमचे नेहमीचे सोबती रायलिंग अन लिंगाणा दर्शन सुखदायक होत.रायलिंगच्या डावीकडे मोहरी गाव नजरेस पडते.अतिशय अवघड अशा कच्च्या रस्त्याने चांदर गाठले तेव्हा सूर्यनारायण अस्ताकडे जात होते
                डिग्यावरून दिसणार सह्याद्रीच देखणं दृश्य
इवल्याशा टुमदार चांदर मधुन सह्याकड्यावर जात सूर्यास्त अनुभवून परत आलो.सखाराम मामांनी एका खोलीची शाळा उघडून दिली.गावात लहान मुलांना खाऊ वाटप करून पथाऱ्या पसरल्या.बरोबर आणलेला शिधा अन आमटी भात चोपून शाळेत पाठ टेकवली.
       सह्याद्रीच्या काठावर वसलेलं सुंदर चांदर गाव 

दिवस २:२१ जानेवारी २०१८
ठरल्याप्रमाणे पहाटे ला उठून आन्हिकं उरकली.सखाराम मामा सोबती येणार होते.सकाळी ला सूर्यनारायणाकडे पाठ करून पश्चिमेला जाणाऱ्या पायवाटेने निघालो.दोन डोंगराला वळसा घातल्यावर निसणीची खिंड नजरेस पडते.डावी निसणीची वाट सोडून सरळ जात एक वार्म अप चढ चढून बोचेघोळ-खानू वाटेवर पोहोचलो.खानू किंवा डिग्याला जायला इथून उजवीकडे वळावं.समोर दुर्गदुर्गेश्वर रायगड अन बोचेघोळ माथा दिसतो.बोचेघोळच्याच पायवाटेनं अजून १० मिनिटे खाली उतरल्यावर डावीकडे जंगलात शिरणारी वाट धरली.चांदर सोडल्यापासून साधारण तासाभरात आपण या ठिकाणी पोहोचतो.वेळ: सकाळी:.००
    चांदर-बोचेघोळ वाटेवरून निसणी घाटवाटेचा माथा  
भयंकर वाढलेल्या झाडोऱ्यातून वाट बनवत पदरातून १०-१५ मिनिटे चालल्यावर वाट साधारण चढाईला लागली.काही वेळातच बोचेघोळीच्या वरच्या अंगाला पोहोचलो.बोचेघोळीच्या समांतर पण वरच्या बाजूने डोंगराला वळसा घातल्यावर अप्रतिम असा नजारा खुला झाला.भव्य रायगड अगदीच जवळ भासतो इतका जवळ की जगदीश्वर मंदीर,महाराजांची समाधी,नगारखाना या वास्तू सहज ओळखता येतात.खोलवर वारंगी,वाघेरी,छत्री निजामपूर ही गाव बघून मागच्या राजगड ते रायगड डोंगरयात्रेच्या आठवणींना उजाळा मिळाला.डावीकडे डोंगराला वळसा घालत गायनाळेच्या माथ्यावर पोहोचलो.वेळ:सकाळी .३०
    गायनाळेच्या अलीकडे दिसणार रायगड,वारंगी गावाचे दृश्य
माथ्यावरून दक्षिणेला खोल दरीपलीकडे लिंगाणामाची,बोराटा नाळ,लिंगाणा अन रायलिंग पठाराचे सुंदर दृश्य पाहून थोड़ विसावलो.सखाराम मामांनी खाली बोट करून खिंड दाखवत त्या खिंडीतून पलीकडे उतरावं लागत असं सांगितलं.मामांनी त्यांच्या लहानपणी गायीचं छोटं वासरू उचलून आणल्याचंही त्यांनी सांगितलं.३५-४० वर्षाआधी चांगली मोठी गुरांची वाट होती हेही त्यांनी आवर्जून सांगितल्यावर याच जुन्या वाटेचा शोध घ्यायचं पक्कं झालं. सखाराम मामाही - दशकापूर्वी गायनाळेने गेले होते.
                               गायनाळ खिंड
गायनाळ खालचा टप्पा ...उजवीकडे खाली दिसणाऱ्या खिंडीतून गायनाळ खाली उतरते 
सहाजिकच आता गायनाळेची वाट मोडलेली असणार यात शंकाच नव्हती. मिनिटांत गायनाळेच्या  खिंडीत पोहोचलो.बरोबर मागे खिंडीत कोकणदिवा आपलं डोकं वर काढून दर्शन देत होता.भयंकर वाढलेल्या झाडीतुन रस्ता बनवताना चांगलीच कसरत करावी लागत होती अन नेहमीप्रमाणे प्रसाद आणि मामांनी ती जबाबदारी उचलली.मागच्या मंडळींनी वाट अजुन ऐसपैस करून अन योग्य दिशेला खडूने बाण करून  भविष्यात येणाऱ्यांची सोय करून दिली.
साधारण अर्धा-पाऊण तास जपून उतरत एका बारीक ओढ्यात उतरताच समोर ४०-५० फुटाचा कडा लागतो त्याच्याकडे दूर्लक्ष करून उजवीकडे जाणारी वाट प्रसादने बरोबर हेरली.उजवीकडे डोंगरकड्याला चिटकून अर्धा तासाची आडवी मारत गायनाळ माथ्यावरून पाहिलेल्या खालच्या डोंगराच्या खिंडीजवळ पोहोचलो.उजवीकडे पाने गाव अन रायगड दर्शन झाले.घसाऱ्याच्या वाटेने खिंड गाठली.मागे वळून पाहता गायनाळ खिंड गर्द झाडीत लुप्त झाली होती.वेळ दुपारी:१२.३०
                           खालच्या खिंडीतून गायनाळ माथा 
उन्ह तापली होती लागलीच खिंडीतून उजवी घेत तुंबळ घसाराच्या उताराने जपूनच उतराई सुरु केली.१५-२० मिनिटांनी खडकात खोदलेल्या पायऱ्या गतकाळी ही वाट चांगलीच वापरात असावी याची जाणीव करून देतात.पुढच्या १० मिनिटांत नाळेची वाट सोडून डावीकडे डोंगराला चिटकून जाणारी वाट धरली.पुढे वाट निबिड जंगलात शिरते इथेच पाने गावातील काही गावकरी रानडुक्करांची शिकार करायला आले होते.३० मिनिटे रानडुक्कर पकडा पकडी पाहून शेवटी जंगलात उतरलो.एका मोठ्या ओढ्यातून डावीकडे उतरत १५ मिनिटांत पाने-निसणीच्या मळलेल्या वाटेवर स्वार झालो. वेळ दुपारी:.२०
   गायनाळ-निसणीच्या वाटेवरून लिंगाणा,रायलिंग पठार 
कोकणातील दमटपणा अन उन्हाच्या तीव्रतेने काही वेळातच घाम काढला. १५ मिनिटांच्या मवाळ चालीनंतर उजवीकडे बोराटा नाळ-लिंगाणा,रायलिंग पठार अन डावीकडे उत्तुंग पर्वतरांगेच्या दृश्य पाहून उन्हाचा दाह कमी झाला.वाट आता जंगलात शिरते तरी लिंगाणा आपलं डोकं वर काढून दर्शन देतच राहतो.काट्याकुट्यातून १५ मिनिटांच्या वाटचाली नंतर सुंदर अशा पाण्याच्या झऱ्याजवळ पोहोचलो.निसणीच्या वाटेवरच्या झऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या झऱ्याची धार वर्षभर कमी होत नाही.थंडगार पाणी पिऊन शरीर थंड झाली.पोटोबा उरकण्यासाठी ह्यापेक्षा आदर्श जागा सापडून मिळणे कठीण म्हणून लागलीच शिदोऱ्या उघडल्या.घरून आणलेल्या पक्वान्नांवर येथेच्छ ताव मारून १० मिनिटे वामकुक्षी घेण्यात आली.वेळ संध्याकाळी:
                          उत्तुंग सह्याद्री 
                बारमाही पाण्याचा झरा 
वाट आता - डोंगराला वळसा घालत पुढे सरकते.उजवीकडे जाणारी पाऊलवाट चांदर वरून पाने गावासाठी शॉर्टकट आहे.सुंदर जंगलटप्प्यातून वाट चढणीला लागताच निसणी वाटेची चढाई सुरु होते.चढाई तीव्र असून वाट पूर्णपणे मळलेली आहे त्यामुळे चुकण्याची शक्यता नाही.निसणीच्या खिंडीजवळ पोहोचता-पोहोचता सखाराम मामा काठीने काहीतरी चेचत असल्याचे जाणवले.जवळ जाऊन पाहतो तर फुरसे.सखाराम मामांना आतापर्यंत दोनदा फुरस चावल्याची अन त्यातुन कसेबसे वाचल्याची कथा त्यांनी सांगितली.वाऱ्याची थंडगार झुळूक घेत निसणी माथा गाठला.एक टेपाड उतरत अन एक छोटस टेपाड चढत सकाळी गेलेल्या गायनाळेच्या वाटेला गाठलं.दोन डोंगरांना वळसा घालत दिवेलागणीच्या वेळेला चांदर गाठलं.
                              पायथ्यातून निसणी घाटमाथा 
                                                    
              निसणी घाटमाथ्यावरून चांदरकडे वाटचाल 
आवरा आवर करून लागलीच अंधार व्हायच्या आत अवघड असा चांदरचा मातीयुक्त घाट चढुन डिगा गाठला.मावळत्या सूर्यनारायणाबरोबर आम्हीही चांदरचा निरोप घेतला. पानशेत अन खडकवासला धरणाला वळसे घालत डोणजे गाठून रात्रीचा भोजन कार्यक्रम उरकून रात्री १० ला पुण्यनगरीत प्रवेश केला.

या संपूर्ण ट्रेकचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 




नोट:गायनाळेला कुठेही रोप किंवा टेक्निकल साहित्याची गरज नाही.योग्य वाटाड्या सोबत असेल तर गायनाळेच्या वाटेला कुठेही कडा लागत नाही.स्क्री अन दगड सांभाळून केली तर गायनाळ कुठेही अवघड नाही. 

महत्वाच्या नोंदी :

सुरवात :चांदर  शेवट :चांदर  
मार्ग: चांदर-खानूचा डिगा-गायनाळ-निसणी-चांदर
एकूण चढाई उतराई:८५० मीटर्स 
श्रेणी:मध्यम

चढाई उतराईतील टप्पे:

चांदर (६६२मीटर्स)-गायनाळ माथा(७२६मीटर्स)-गायनाळ खालील खिंड (५५६ मीटर्स)-गायनाळ पायथा(२८७मीटर्स)-निसणी पायथा(३०२ मीटर्स)-निसणी माथा -६७९(मीटर्स)-सर्वोच्च माथा(७९१ मीटर्स)

प्रसन्न वाघ 
वाईल्ड ट्रेक ऍडव्हेंचर 

7 comments: